महामायेचे थैमान: Page 4 of 12

चारित्र्याची कीर्ति अजरामर करण्यासाठी जगविख्यात ताजमहल आजहि यमुनेच्या तीरावर उभा आहे. ती शहाजानची मुमताझ कोणाकडे! नखरेलपणाच्या जादूने श्रीमान तरुणांना भुरळ घालून आपली पोतडी भरणा-या ज्या उलट्या काळजाच्या धाडसी स्त्रिया असतात, त्यांतलीच ही एक छिनाल तरुणी आहे. हिच्या आईप्रमाणे हिला गातां नाचतां येते की नाहीं, हे आम्हांला माहीत नाही; पण आज तरी या महामायेने तिघांना फासावर, चौघांना हद्दपार करुन अनेक मोठमोठ्या लोकांना रडत नाचावयास लाविलें आहे खास जात्याच वेश्या-खाणीतली हिरकणी असल्यामुळे ‘ही कामाची तलवार, करिल ज्या वार, ठार तो समजा’ हे प्रत्यंतर कधी काळी येणारच येणार, हे होळकर महाराजांना व बावलाला कळू नये, या धुंदीलाच प्रेमाची आंधळी कोशिंबीर म्हणतात. जिच्या प्रेमाची सरकगांठ फक्त लाखों रुपयांच्या जडजवाहिराच्या डबोल्याला चिकटलेली, तिला ईमानाची ती पर्वा काय? ‘एकावरि मन ठेउनि नेलें खूण करिती दुस-याला’ असल्या वृत्तीच्या साहसी स्त्रियांच्या प्रेमपाशाचे फास धनकनक संपन्न तरुणांच्याच गळ्यांत अचूक पडत असतात.

असल्या फांसात काश्मीरचे हरिसिंग, इंदोरचे तुकोजीरावकिंवा इतर धनाढ्यांनी न अडकावे तर कोणी? मुमताजच्या तारुण्याची कळी होळकरांच्या राजवाड्यांतच प्रथम उमलली, आणि तेथेच ही बेगम कमलादेवी बनून महाराजांच्या प्रेमलिंगास पात्र झाली. सर्वसामान्य नर्तकी नायकिणीच्या अपेक्षेपेक्षांहि हा राजाश्रय मुमताझला पुष्कळच किफायतशीर झाला असावा असे मानण्यास चिंता नाही. पण बोलून चालून वेश्येची अवलाद ! तिचा पाय एक ठिकाणी कसा काय ठरणार ? वेश्येच्या बाबतीत निष्ठेचा किंवा इमानाचा प्रश्नच येत नाही. होळकरांची स्वारी दौ-यावर असताना काही गुप्त बातबेत ठरवून ही कमलादेवी डबोल्यासह दिल्लीच्या स्टेशनांत महाराजांच्या क्षीरसागरी आश्रयाचा त्याग करून पळाली आणि अखेर मुंबईस येऊन बावला नामक एका धनाड्य खोजा तरूणाच्या गळ्यात पडली. ती आपले पूर्वचरित्र विसरली आणि आता उघड माथ्याची गांवभवानी बनली. मुमताज बेगमच्या प्रसिद्ध झालेल्या हिंदु पेहरावांतील पोषाखावरुन ती कोणी मोठी उर्वशी मेनका रंभा असावी असें मुळीच वाटत नाही. तारुण्याच्या सहजसिद्ध टवटवीवर ‘एकनूर औरत तो दसनूर कपडा’ यापेक्षां विशेष आकर्षक काही दिसत नाही. तरी पण तिने आज आपल्या चवचाल प्रवृत्तीला बळी दिलेल्या व देऊ घातलेल्या नरमेघाची कल्पना डोळ्यापुढे उभी राहिली की तिच्या राक्षसी आकर्षणाकडे सा-या जगाचे डोळे कां वेधूं नयेत? तिच्या राक्षसी आकर्षणाकडे सा-या जगाचे डोळे का वेधू नयेत? तिचा ‘दिल्दार यार ’ बावला ‘असता औक्ष‘ ठार व्हावा अशी तिची इच्छा असणे केव्हाहि शक्य नसले, तरी तिच्या कृतकर्माचा विपाक केव्हा ना केव्हा असाच व्हावा, एवढी तरी तिची व खुद्द बावलाची कल्पना नव्हतीच असे मात्र नव्हे.

सारांश- मुम्ताज बेगम चरित्र अपूर्व साचें । ते भाग्यखेलन विचित्रचि बावलांचे ।। त्या चारचक्षु नृपराज नरोत्तमातें.। जे ना कळे, कुठुनि ते जड पालिसाते ।। पोलीस येऊन जाऊन खुनी इसमांचा शोध लाऊन त्यांना न्यायाधीशाकडून शासन करवतील. पण मुम्ताजच्या चवचाल प्रेमाच्या आखाड्याचे रहस्य-शोधन ते करणार नाहीत. ते त्यांचे क्षेत्र नव्हे. हतभागी बावला. एखाद्या अपघातामुळें किंवा ह्रदयद्रावक मृत्यूमुळेच प्रसिद्धीस येण्याचे ज्या व्यक्तींचे नशीब असते, त्यांपैकी बावला ही एक तरुण व्यक्ती होय. बावलाचा खून झाला नसता तर या क्षुद्र व्यक्तीला कधीच काही महत्त्व आले नसते.बावला म्युनिसिपल कारपोरेशनचा सभासद होता. म्हणजे एवढ्यावरुन तो मोठा विद्वान, जनहितकर्ता आणि लोकप्रिय फिरोजशा मेहता होता असे नव्हे. संपत्तीच्या जोरावर वाटेल तो ऐदी रेम्याडोक्या कारपोस्टर किंवा कौन्सिलर होऊं शकतो. मुन्सिपालट्या लोकल बोर्डे किंवा कौन्सिलें यात केवळ पैशाच्या जोरावर व्हट्ट मिळवून घट्ट बसलेले शेणाचे मठ्ठ गोळे काय कोणाला दिसत नाहित? असलाच हा एक मठ्ठ गोळा होता. मुंबईत तर याचे नाव बहुजनसमाजाला खून झाल्यावर कळले. केवळ नुसती श्रीमंती ही काही बावलाच्या थोरवीची वीमापॉलीसी नव्हे. कदाचित तो मोठा व्यापारी असेल, त्याच्या जातीत मोठा वजनदार असेल अथवा कारपोरेशनच्या क्लबांत तो मोठा जॉली फ्रेंडहि