महामायेचे थैमान: Page 3 of 12

की या लव्हाळ्याच्या त्रांगड्यात एक खून पडला. नुसती बाचाबाची किंवा मारामारी होती तर मुंबईच्या पोटभरु व भांडकुदळ इंग्रजी मराठी दैनिकांची दोन चार दिवस चंगळ उडाली असती; यापलीकडे कांही नाही. पण येथे तर खून पडला. छिनाल तरुणीच्या पायी मुंबईत व इतरस्त्र काय कधी खून पडलेच नाहीत? का आज पडत नाहीत? का पुढे कधी पडणार नाहीत? मुंबईसारख्या गोचिड वस्तीच्या बकाली शहरांत लव्हाळ्याच्या लांडग्याचे खून नेहमीच पडत असतात. त्यांची योग्य ती व्यवस्था लावण्यास पोलीस खाते आहेच. मग या मुमताज प्रकरणाचाच एवढा गवगवा कां? खून होताच टाईम्ससारख्या आंग्लपत्रकारांनी जो एकदम मोठ्या तारस्वरांत गिल्ला केला, त्यांत त्यांची एवढीच चिंता स्पष्ट दिसत होती की मलबारहिलवर ज्या ठिकाणी हा खून झाला ती जागा म्हणजे युरोपियन क्लबच्या अगदी शेजारी, सायंकाळी पासून मध्यरात्रीपर्यंत हवाखाऊ गुलहौशी लोक आषुकमाषुकें आणि लव्हाळी पात्रें या ठीकाणावरून हँगींग गार्डनकडे नेहमी जात येत असतात, मलबार हिलवर राहणा-या युरोपियन लोकांच्या मोटारी जाण्याचा हमरस्ता, तेव्हां खुनासारखे प्रकार जर तेथे होऊं लागले, तर या सर्वांवर मोठाच अनवस्था प्रसंग! एरवी सा-या मुंबईच्या नाक्यानाक्यावर पठाणांची सोटेबाजी भरदिवसा चालली तरी लोकांच्या चिंतेचा घामसुद्धा ज्या या आंग्लपत्रकारांना कधी फुटायचा नाही. त्यांना या अनावस्था प्रसंगाची एवढी दहशत कां? तर तो रस्ता म्हणजे युरोपियन लोकांच्या जाण्यायेण्याचा हमरस्ता म्हणून! खुनाबद्दल कोणी झाला तरी तीव्र संतापच व्यक्त करील आणि इतर देशी पत्रांप्रमाणं या पत्रांनीहि केला यांत नवल नाही. पण सुरवातीलाच चवथ्या सप्तकांत चढविलेला यांचा सूर मध्येच खर्जात कां घसरला देव जाणे! बरे, ज्याचा खून झाला तो तरी असा कोण मोठा गृहस्थ होता की, त्याच्या मृत्यूमुळें सारें हिंदुस्थान एकदम हादरुन जावे? बावला म्हणजे कांही इजिप्तचा सरदार सर लीस्टॅक नव्हे की नाशिकचा कलेक्टर जॅक्सन नव्हे. बावला मोठा धनाड्य असेल. मुंबईचा शेरीफ व नगरशेट द्वारकादास धरमसी काय कमी श्रीमान होता? पण त्याचा खून झाला त्यावेळी असा दणदणाट कांही उडाला नाही. मह या प्रकरणांतच एवढा भयंकर गाजावाजा का? तर या खुनाला कारण झालेली चटोर चिमणी मुमताज ही पूर्वी इंदोरचे तुकोजीराव होळकर यांच्याजवळ होती, हा संबंध त्यांत प्रामुख्याने पुढे आला म्हणून. विलायतेस चाललेल्या राँबिनसन केसमध्ये काश्मिरचे युवराज हरीसिंग यांना लव्हाळ्याच्या लफड्यांत पिळून काढणा-या इंग्रजी हरामखोरांचा कट नुकतांच जनजाहीर झालेला होता. त्यांत होळकर सरकारच्या या ख-याखोट्या लफड्याची भर पडली. मग काय विचारतां? आधीच मर्कट असलेल्या काही पत्रांना ही लफड्याची दारु पथ्यावरच पडली. त्यांना या बावला-मुमताझ-होळकर प्रकरणावर वाटेल ते खरडून आपली मनिषा तृप्त करुन घेतली.

अझूनही हा शिमगा चालूच आहे. कै. शिवाजीराव होळकराव ‘न्हाणवली भादरल्याच्या‘ आरोपाचा बेशक मारा करणा-या ‘भूत‘ ‘गुराखी’ ‘विक्षिप्त’ प्रसृति माजी पलांची संतति आज उमाप पिकलेली असल्यामुळे आज २५-३० वर्षांनी होळकरांची होळी करण्याचा आलेला सिंहस्थ योग कोण धूर्त पत्रकार गमाऊन बसेल? ज्यांचे जीवनच कुचाळ्यांवर चाललेलें, त्यांनी ही संधि म्हणजे अमूल्य पर्वणीच नव्हे तर काय? पण आपला हा मुख्य मुद्दा नव्हे. खून झाला आहे. त्याचा योग्य तो तपास लावून मुद्द्यापुराव्यानिशी गुन्हेगार ठरतील त्याला शासन होणे आवश्यक आहे आणि तें काम सरकारच्या न्यायमंदिरांनी योग्य रीतीने केलेच आहे. त्रयस्त दृष्टीने या भयंकर प्रकरणांतून आपल्याला काय बोध घेता येईल तो पहावा, एवढाच या लेखाचा उद्देश आहे. यासाठी या नाटकांतील प्रत्येक मुख्य पात्रांचे स्वभावपरीक्षण व त्यांची परस्पर नाती यांचा प्रथम विचार केला पाहिजे. या कामी लागणारा तपशील अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या माहितीवरुनच घेतला आहे, बाजारगप्पांवर विश्वास ठेवणें योग्य होणार नाही. जिच्यामुळे हें लव्हाळें नाटक रक्तलांछित झाले ती नायिका मुमताझ बेगम उर्फ कमलादेवी. नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा असे या नायिकेचे, नव्हे, नायकिणीचे चारित्र्य आहे. जिच्या उज्वल