महामायेचे थैमान: Page 12 of 12

ठरता यथार्थ ठरेल. तब्बल दहा तास न डगमगता जिने क्रॉस तपासणीत प्रश्नांची उत्तरे खडाखड न कचरता दिली त्या बाईची गणना सामान्यात कोण करील? ‘ पट्टीस पावली ’ पैकी ही साधीभोळी मावली खास नव्हे. होळकरी डबो लांबविण्यासाठी प्रथमपासूनच ठिकठिकाणच्या पोलीस कमिशरांना स्वसंरक्षणार्थ गुप्त अर्ज पाठविण्याची मुमताझची धोरण कारवाई पाहिली की या महामायेच्या बुद्दिप्रभावाचे खरोखर कौतुक वाटते. ‘ चाबूक ’ स्वार म्हणतात ‘ इंदोरचे राजकारण म्हणजे रांड. ’ पण या रांडेला जी राजकारणी अक्कल आहे, ती ‘ चाबूक ’ स्वाराला कळायला दहा जन्म घ्यावे लागतील. केवळ स्वार्थासाठी बेईमान होण्याची अवदसा जर मुमताझला आठवली नसती, तर याच तिच्या ‘क्लिअर हेड ’ ची सर्वत्र तारीफ झाली असती. राजकरणी डावपेच लढविण्याइतकी चाणाक्ष बुद्धिमत्त हिच्यांत आढळल्यामुळेंच कदाचित् श्रीमंत होळकरांनी या तरीत तरुणीला आश्रय दिला नसेल कशावरुन ? पण अखेर ती आपल्या जातीवर गेली म्हणूनच तिच्या सर्व बुद्धिवैभवाची आत काळीकुट्ट माती झाली. आईचा सावत्र बापाचा आणि महमद्अल्ली सारख्या पोटभरु पागलांचा तिने आपल्या भोवती जो गुप्त गराडा घालून घेतला, त्यामुळेच तिला होळकर सरकारचा विश्वातघात करण्याची कुबुद्धि आठवली आणि अखेर बाजारबसवेपणाची दीक्षा घेण्यांतच तिच्या सर्व मनोरथांची अखेर झाली. जस्टिस क्रंप ज्यूरीला म्हणतात “ असल्या बाईच्या भोवती ( महमद अल्लीसारखे जे लोक जमा झाले होते, त्यांत त्यांचा काही उच्च उद्देश ( high motive ) असेल असे मानताच येत नाही. शिवाय मुमताझ आपल्या हातांतून निसटून बावलाकडे जावी, अशी तिच्या आईबापांची इच्छा असणेहि शक्य दिसत नाही.” यावरुन मुमताझ कितीहि तरतरीत डोक्याची असली , तरी डबोल्याचे घबाड पचविण्यासाठी तिने आपल्या भोवती जमा केलेल्या ‘ जिवाच्या माणसां’मुळेच तिचा जीव धोक्यांत पडून, आणखी आठ जीवांचा जीव गेला ! जिच्या तारुण्याच्या भर अंमदानीला इतक्या भयंकर नरमेघाची आहुती पडली , तिचे पुढील आयुष्य कसे काय जाणार हे – तुज ठावें ईश्वरा ! ओम शांति: शांति: शांति: