महामायेचे थैमान: Page 2 of 12

आहेत. एकजात स्त्रियांना बेइमान ठरवणारे पुरुष तरी एकजात इमानी असतात काय? व्यवहारात जी मानकापी व दंडादाडी सदैव चालू आहे, त्यात बेइमान पुरुषांचीच दंगल बेमाफ भडकलेली आपण नित्य पहातो. इतकेच नव्हे तर पुरुष बेइमान झाला तरीहि आमरण इमानी राहण्यात स्त्रियांचा निश्चयी असलेल्या आढळतात. एखादी सटवी बाजारबसवी निघाली म्हणजे ‘स्त्रीजात तेवढी बेइमान’ म्हणावी, तर दररोज एकमेकांबद्दल कारस्थाने लढविणारे पुरुष शेकडा 75 आढळल्यास सर्व पुरुषांची कत्तलच उडविणे रास्त होईल. एवढी गोष्ट मात्र खरी की इहलोकी स्त्रीजात आकर्षणाचे एक विलक्षण मानसचुंबकी केंद्र असल्यामुळे, स्त्रीचरित्राचा परिणाम जगाच्या इतिहासावर ब-याच दणक्याने उमटला आहे. एवढे मोठे पराक्रमी रजपूत लोक, पण केवळ स्त्रियांच्या पायी नामोहरण झाले. त्यांचे ते जोहार, त्यांनी कसल्याहि उदात्त भावनेने केलेले असोत, तो त्यांच्या नामर्दाइचा किंवा रानटीणाचा कळस म्हणा अगर दुसरे काय वाटेल ते नाव द्या, त्यातहि स्त्रीचरित्रच प्रधान होते. मानवी सृष्टीत स्त्रियांचे आकर्षण इतके बलवत्ततर आहे की केवळ त्यांच्यासाठी होत्याचे नव्हते नव्हत्याचे होते होते. स्त्रीजात तेवढी बेइमान म्हणणारे एखाद्या इमानी मर्द पुरुषाच्या उदरातून न जन्मता, बेइमान स्त्रीचाच कुसवा वन्य करतात, हे एक नवलच म्हटले पाहिजे.

जेथे मानवानची उत्पत्ती स्त्रीच्या पोटी, स्थितीसुद्धा स्त्रीसहवासातच, तेथे त्यांचा लयही स्त्रीसाठीच झाला, तर स्त्रीया बेइमान कशा? पुरुष स्त्रीयांना कितीहि क्षुद्र लेखोत, स्त्रियांची निसर्गदत्त मोहनीच अशी पराक्रमी आहे की स्त्रियांच्या सहवासाशिवाय माणूस केव्हाच आत्महकत्या करुन मोकळा होईल. आईशिवाय मूल आणि बाईशिवाय बुवा, ही स्थिति आणि मसणवटी यात काय भेदं? मुलाची आई मेली तर दुसरी एखादी बाईच त्याला वाढविते. बुवांचा उपयोग काही नाही. नाटक कादंबरी सिनेमा काय वाटेल ते घ्या, त्यात जर स्त्री नसेल तर त्याला कोणी ढुंकुन सुद्धा पाहत नाही. स्त्रियांची ही विश्वव्यापी मोहिनी काय करणार नाही? तोंडातून ब्रहि न काढता ती वाटेल त्या रंगाचा राव करील व रावाला धुळीला मिळविल. या मोहिनीने नसेल त्याला अब्रू दिली, व असेल त्याची चव्हाट्यावर फुंकली. या मोहिंनीने आजपर्यत शेकडो धनुर्धरांना नुसत्या नेलकटाक्षाने षंढ केले आणि शेकडो षंढांच्या हातून राज्यकारभार चालविणे. ही मोहिनी फाटलेली अत:करणे जशी बेमालूम जुळविते, तशी बेमालूम जुळलेली ह्रदये केवळ एका फणका-यात टराटरा फाडते. दारिद्र्याच्या क्लेशांना सुखकर करणारी शशिज्योत्स्ना हीच आणि अलोट संपत्तीच्या वैभवाला रखरखीत निखारे बनविणारी विद्युताही हीच. वैधव्याची कु-हाड कोसळली असतां अन्नान्न अनाथ दर्शेत स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन एकुलत्या तान्ह्याला जगविणारी हीच आणि राणीपदरावर असूनही राजकरणी डावपेचांसाठी पोटच्या पोराचा खून करणारी हीच. असे कोणते महाकाव्य आहे की ज्याची स्फूर्ती या मोहिनीने दिलेली नाही? सीतेसाठी रामायण झाले, द्रौपदीसाठी महाभारत जन्माला आले आणि हेलनसाठी होमरचे इलियड सप्त स्वरांची ललकारी फोडू लागले.

सारांश, स्त्रीचरित्र असे सर्वांग-पराक्रमी आहे. या पराक्रमाचे मूळ त्यांच्या ईश्वरदत्त मोहनीत आहे. या मोहनीत कोणकोण गद्धे शहाणे बंनतात, आणि कोणकोण गद्धे शहाणे ठरतात, हे सांगणे कठीण आहे. एका संस्कृत कवीने म्हटले आहे की, स्त्रियश्चरिंत्र पुरुष्यस्य भाग्यं । देवो न जानाति कुतो मनुष्य: ।। ता. १२-१-२५ ला मुंबईस मलबार हिलवर बावला नावाच्या एका धनाड्य मुसलमानाचा खून झाल्याचे वृत्त आता सर्वांना माहीतच आहे. हा खून मुमताज बेगम ऊर्फ कमलादेवी नामक एका चटोर पोरीमुळे झाला आणि ही चटोर नार पूर्वी होळकर सरकार जवळ होती. प्रस्तुत खुनामुळे मोठमोठ्या लोकांच्या धरपकडी वगैरे धामधूम व खटल्याच्या सुनावण्या होऊन तिघे फासावर व चार हद्दपारीवर चढले. या सर्व धामधूमीचा शांतपणे विचार करीत असतां स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यं कीं मरणं? हा विचारार्थ पुढे आला आणि, मुमताजचरिंल बावलस्य मरणं । होळकर ना जानाति कुतो मनुष्य: ।। असे वाटू लागलें. या प्रकरणाला जो इतका भडक रंग चढून त्याचा एवढा भडका उडाला त्यांचे कारण इतकेच