कुमारिकांचे शाप : Page 10 of 33

नातिचरामि’ अशी सर्व विश्वदेवतांच्या समक्ष वरवधूजवळ त्रिवार शपथ घेतो. आमच्या विवाहविधीतील शपथांचे प्रमाण काढले तर वराच्या दहा शपथांशी वधूच्या एक शपथेचे प्रमाण पडते. यांवरून मानवी समाजातील या जीवनक्रांतिकारक विधीत वधूचे महत्त्व केवढे आहे हे समजून येईल. या सा-या गोष्टी कितीही ख-या असल्यातरी प्रत्येक लग्नसराईत सुशिक्षित म्हणविणारांच्यात हातून वधुपरीक्षणाचे जे फार्स करण्यात येतात, त्यांतील वधूंच्या विनयाची व शालीनतेची होणारी पायमल्ली पाहिली म्हणजे आमच्या समाजाची धार्मिक वृत्तीच नष्ट झाली असे म्हणणे प्राप्त होते. स्त्रियांच्या नाजूक मनोवृत्तीबद्दल वारंवार कैवार घेणारे आधुनिक वीर महावीर या ‘मुलगी पहाण्याच्या’ कामात इतके बेशरम आणि फाजील बनतात की त्यांच्या वर्तनाची कोणत्याही समंजस मनुष्यास शिसारीच आली पाहिजे. वरशोधन आणि वधूशोधन हे प्रकार पूर्वी होते; नाही असे नाही. सध्याही ते अस्तित्वात नाहीत असेही नाही. जुन्या काळचे काही आचार व विचार नव्या काळात जरी अगदी नामशेष झाल्यासारखे दिसतात, तरी त्यांतील काहींची विपरीत, काहींची विस्तृत आणि काहींची संकुचित स्वरूपे सांप्रत आढळून आल्यावाचून राहत नाहीत. लग्नविधीचा इतिहास पाहिला तर स्वसंतोषाने स्त्रियांस आजन्म कौमार्यात राहता येण्याची आणि स्वयंवराची जुन्या काळची जवळजवळ नामशेष झालेली चाल आता काही तुरळक तुरळक उदाहरणांनी पुनरुज्जीवित होत असल्याचे भासते, परंतु वास्तविकरीत्या ती नष्टच झाली असे समजण्यास हरकत नाही. वराकडून वधूला मागणी घालण्याची चाल नष्ट होऊन तिच्या ऐवजी तिच्या अगदी विरुद्ध अशी मुलीच्या बापाने अगर पालकाने वराकरिता गावोगाव हिंडून जोडे फाडण्याची चाल प्रचारात आली आहे. आर्यमहिलावर्गाला देवीसमान पूज्य असलेल्या पुराणप्रसिद्ध सावित्रीचेच उदाहरण घ्या. तिच्या सद्गुणसंपन्नतेचा आणि सौंदर्याचा महिमा इतका लोकोत्तर होता की मोठमोठ्या कुलीन आणि सर्वगुणसंपन्न राजपुत्रांनाही तिच्याबद्दल मागणी करण्याचे धाडस करवेना. बरे, तत्कालीन प्रचाराप्रमाणे वराकडून मागणी आल्याशिवाय तिच्या पित्याला तिच्या विवाहाची काहीच तजवीज करता येईना आणि मुलगी तर वाढत चालली. तेव्हा स्वयंवर पद्धतीचा अवलंब करून त्याने सावित्रीला स्वतःच वरशोधन करण्याची अनुज्ञा दिली. सध्या वरशोधन मात्र अत्यंत भ्रष्ट स्थितीत अस्तित्वात आहे आणि वधुशोधनाच्या ऐवजी वधुपरीक्षेचा एक भ्रष्ट आणि असभ्य प्रकार चालू झाला आहे. वरशोधन वधूच्या पित्याने करावयाचे. याचा स्पष्टार्थ इतकाच की ‘लग्न करावयास – मग ते दुसरे, तिसरे किंवा चवथे असले तरी हरकत नाही – तयार असलेल्या पुरुषाचा शोध करावयाचा! मुलीचे लग्न यंदा केलेच पाहिजे, नाहीतर जगात तोंड वर काढायला जागा राहणार नाही, असल्या भ्रामक आणि धर्माच्या किंवा व्यवहाराच्या संकुचित कल्पनेने त्रस्त झालेल्या बापाला शोधून काढलेल्या वराच्या पुरुषपणाखेरीज इतर कसल्याही गोष्टींची चवकशी करण्यास अवकाश नसतो; निदान तो तितक्या खोल पाण्यात शिरूच इच्छित नाही म्हणा, अगर त्याला या गोष्टींची आवश्यकता भासत नाही म्हणा; कीह तरी एक गोष्ट निर्विवाद आहे. ही असली शोचनीय परिस्थिती अलीकडील शेकडा ९५ लग्नांत आढळून येते. वरशोधनाची परीक्षण-दृष्टी आताच्याही पुढे एखादे पाऊल गेलीच तर वराच्या विद्याभ्यासाबद्दल किंचित् उडतउडत चौकशी करून तो नोकरदार असल्याचे खात्रीलायक पटले की कसेतरी मुलीचे पोट भरील एवढ्या भरवशावर तो गरजवंत म्हणून अक्कल नसलेल्या मुलीचा बाप विवाहेच्छू पुरुषाला वधूपरीक्षा करण्यासाठी आपल्या घरी येण्याची विनंती करतो. टिपण जुळवणे, वराच्या घराण्याच्या अनुवंशिक काही विशिष्ट माहितीचा शोध करणे, खुद्द वराच्या बौद्धिक व नैतिक संस्कृतीची अजमावणी करणे वगैरे गोष्टी पूर्वी जरी शुद्ध हेतूतूनच निर्माण झालेल्या दिसतात, तरी प्रत्यक्ष व्यवहारात त्या भ्रष्ट स्वरूपातच वावरत होत्या व आता तर त्या बहुतक फार्साप्रमाणेच पाळण्यात येतात, म्हणजे जवळजवळ त्या नष्टच होऊ लागल्या आहेत असे मानण्यास पुष्कळ आधार आहेत. मुलगा लग्नास तयार आहे, घरातील वडील मंडळीचा त्याच्या हेतूला ‘टेकू’ आहे आणि लग्न यंदाच ‘कर्तव्य’ आहे. एवढ्या सामुग्रीचा तीन पिळाचा धागा हाती येताच उपवर मुलींचे गरजू बाप त्या धाग्याच्या आधारावर वरप्राप्तीचा किल्ला सर करण्यास तेव्हाच कंबर बांधतात अर्थात्