कुमारिकांचे शाप : Page 9 of 33

मन्वादिकांच्या स्मृत्या खास संकुचित वृत्तीने लिहिलेल्या नाहीत. देशकालवर्तमानाप्रमाणे ब्राह्मविवाहाचे चक्र प्रचलित मन्वंतराच्या आसावर जर निमूटपणे बिनतक्रार चालत नसेल तर ते चाक फेकून देऊन त्याच्याऐवजी जुन्याच स्मृतींच्या स्टोअर्समधून गांधर्व (स्वयंवर) किंवा क्षात्रविवाहाचे चक्र आणून बसविण्याचा हिंदुसमाजाने उपक्रम केल्यास प्राचीन स्मृतिका त्यास वाटेल तितके पाठबळच देतील. चालू मन्वंतरांत इष्ट असलेली कोणतीही सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या कामी प्राचीन स्मृतीच्या क्षेत्राबाहेर आम्हाला पाऊल टाकावेच लागेल असे नाही. रूढींचे दास्यत्व एकीकडे मान्य करून दुसरीकडे स्मृतींतील एकांगी वचनाचा अक्षरशः कीस काढणा-या मंडळीनी आपले फाजील दुराग्रह आणि संकुचित कल्पना झुगारून देण्याइतकी मनाची समता मात्र दाखविली पाहिजे की इष्ट कार्यभाग धर्म न बुडता किंवा धर्माच्या मानेला फास न बसता अत्यंत सलोख्याने उरकता येणे शक्य आहे. जे रीतीरिवाज (रूढी म्हणा वाटेल तर) पूर्वी एका काळी आमच्या समाजात अस्तित्वात होते. त्यांचेच पुनरुज्जीवन व्हावे अशी जर नवमतवाद्यांची अपेक्षा असले, तर त्यात वावगे ते काय? आणि त्याला प्रतिकार करणे तरी न्यायाचे कसे ठरते? जुनी रूढी पुन्हा चालू करणे शक्य नाही असे नाही; परंतु त्या गोष्टीस दिवसगत फार लागते. म्हणून नवीन लोकमताची आकांक्षा करीत व सुलभ रीतीने पूर्ण करण्याकरिता सरकारी कायद्याचे शिक्कामोर्तब त्यावर पडले म्हणजे तेच रूढी पाडण्याचे कार्य सुलभ होते. पूर्वीच्या लोकानी हाच क्रम स्वीकारल्याचे इतिहासात नमूद आहे. आता, सांप्रत आमचे सरकार विधर्मी असल्यामुळे सामाजिक जुलमांच्या निराकरणाचा प्रश्न त्यांच्याकडे द्यायला आमची सोवळी मंडळी बाचकतात. परंतु परिस्थितीच जर अशी आली आहे, आणि राजमुद्रेच्या प्रतिज्ञेशिवाय लोकमताला जुन्या रूढीचे नवीन कालासाठी पुरुज्जीवन करण्याचे अंगी धैर्यच नाही, तर बाजूला सारून समाजहितासाठी विधर्मी सरकारची पायरी चढायला नको का? सोवळ्या विनयाचा बुरखा हिंदुसमाजात सध्या रूढ असलेली विवाह-पद्धत प्राचीन अष्टविवाहांपैकी एक आहे, एवढ्याच कारणाने ती आचंद्रार्क जशीच्या तशीच कायम रहावी असा वाद घालणा-या प्राण्यांची आण नुसती कीव करून पुढे जावे हे बरे. आजएवढे सर्वमतवादी कबूलच करतात ना की सांप्रतची विवाहपद्धती अनेक सामाजिक जुलमांनी सडून गेली आहे म्हणून? त्यातील त्या जुलमी रूढींचा नायनाट करून ती शुद्ध आणि सात्विक करण्याचा यत्न तरी केला पाहिजे एक, किंवा हे शक्य नसल्यास ती सबंध पद्धतच्या पद्धत साफ झुगारून देऊन नवीन पद्धतच सुरू केली पाहिजे एक. यांपैकी काहीतरी एक मार्ग अवश्यमेव शोधून काढण्याचा प्रसंग आज हिंदुसमाजावर येऊन धडकला आहे.या प्रसंगाची योग्य ती वासलाद लागेपर्यंत उन्नतीच्या मार्गात त्यांचे पाऊल पुढे पडणे बरचे दुरापास्त आहे. जोपर्यंत सामाजिक जुलमांचा निर्मूलन होणार नाही तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य मिळाले तरी ते मुळीच टिकणार नाही. राजकीय क्षेत्रांतील जुलमांचा निषेध किंवा प्रतिकार करण्याच्या कामी कास ठोकून दंड थोपटून सज्ज झालेल्या वीरांनी आपण सामाजिक क्षेत्रांत किती जुलमी अरेरावी गाजवीत असतो याचा क्षणभर विचार करणे अवश्य आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता*३ हा मंत्र आजकाल सगळेच पाठ म्हणतात. स्त्रियांच्या समसमान नैसर्गिक हक्कांबद्दल जाणीव उत्पन्न झालेल्या ब-याच सुशिक्षित लोकांनी तर हे वाक्य आपले ब्रीदवाक्यच (मॉटो) केले आहे. परंतु मित्रहो! फार खेदाची गोष्ट आहे, हेच सुशिक्षित लोक या लग्नसराईत स्वतःच्या किंवा मित्रांच्या वधूरीक्षणप्रसंगी अनेक कुमारिकांच्या इज्जति घ्यायला मागेपुढे पहात नाहीत! ‘मुलगी पहाणे’ हा एक आमच्या विवाह-पद्धतीतील पहिला ठळक सामाजिक जुलूम होय. वधुपरीक्षण कोणी केव्हाही अमान्य केलेले नाही किंवा त्याच्या अनावश्यकतेबद्दल कोणी केव्हाही प्रश्न विचारलेला नाही. जन्माची सोबतीण वाटेल त्याने नीट पारखून घ्यावी. त्याला कोणीही हरकत घेत नसतो. परंतु ही वधुपरीक्षणाची अलीकडची रीत पाहिली म्हणजे मात्र संताप आल्याशिवाय राहात नाही. पुरुषाच्या संसाराला स्त्रीचे महत्त्व किती आहे, हे वाटेल त्या संस्कृत, प्राकृत किंवा इंग्रजी तत्त्ववेत्त्यांच्या ग्रंथाधारे सिद्ध होण्यासारखे आहे. ‘‘धर्मप्रजासिध्यर्थ प्रतिगृण्हामि’’ अशीच आपल्या वधूजवळ वराची प्रतिज्ञा असते. ‘‘धर्मेच अर्थेच कामेच