कुमारिकांचे शाप : Page 8 of 33

नाही ते आरोप केले, त्या जुलमांच्या पुष्टीकरणार्थ स्मृतीची वचने भडाभड बाहेर काढली आणि अशा रीतीने प्रत्येक विशिष्ट सामाजिक सुधारणेच्या वेळी आपल्या प्रतिगामी संकुचित मनोवृत्तींचे प्रदर्शन केले. वधूच्या विवाहकालाची मर्यादा वाढविण्याचा प्रश्न पुढे आला, शालजोडीवाले सरकले पुढे आपले जीर्ण स्मृत्यांचे गळाठे घेऊन, लागले प्रतिपादन करायला की जेहत्ते मनू काय सांगतात, ‘‘दशवर्षा भवेस्कन्या अतऊर्ध्व रजस्वला’’, काय कन्या ऋतुमति झाल्यावर तिचा विवाह? अब्रह्मण्यम्! अहो शास्त्र काय सांगते ते पहा. ‘‘प्राप्ते द्वादशे वर्षे यः कन्यां न प्रयच्छति मासिमासि रजस्तस्याः पिता पिबती शोणितम्’’ असे घाणेरडे महापातक माथ्यावर घेण्यापेक्षा शहाणे असाल, धर्म*१ बुडू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर अकलेच्या खंदकांनो, ‘‘दशवर्षोर्ध्व विवाहो निषिद्धः’’ या मनूच्या वचनाप्रमाणे अक्षरशः वागा. त्यावर नवमतवाद्यांने कितीही कंठशोष करून सांगितले की, अहो महाराज, हाच तुमचा मनु आणखी काय म्हणतो पहा – त्रीणि वर्षाण्युदीक्षएत कुमार्यृतुमती सती । ऊर्ध्वे तु कालादेतस्माद्विंदेत सदृशं पतिम् ।। [मुलीने ऋतुप्राप्तीनंतर तीन वर्षे वाट पाहून स्वतःस योग्य अशा वराशी लग्न लावावे.] तर ते काही त्यांना रुचत नाही व पचतही नाही; उलट प्रत्येक सामाजिक जुलमाचा प्रतिबंध करणारा त्यांना धर्माविरुद्ध बंडखोर असाच दिसू लागतो. असली मंडळी आपल्या निवळ धार्मिक (?) समजुतीसाठी आपल्या मुलीवरील अपत्यप्रेमाला राजीनामा देऊन मुलींची हाडे कशी तरी उजवलीच पाहिजेत म्हणून – अव्यंगेsपतितेsक्लीबे दशदोपविवर्जिते । इमां कन्यां प्रदास्यामि देवाग्निद्विजसन्निधौ ।। अशी देवता, अग्नि आणि ब्राह्मण यांच्यासमक्ष खोटी प्रतिज्ञा करतात आणि आपली कोवळी ८-९ वर्षांची मुलगी वाटेल त्या दशदोषपूर्ण नवरदेवाच्या गळ्यात बांधतात. असली उदाहरणे शेकड्यांनीच नव्हे तर हजारांनी दाखविता येतील. विधवांचा पुनर्विवाह प्राचीन शास्त्रांनीही अमान्य केलेला नाही. पण ज्या वेळी ‘पुनर्विवाहाचा कायदा’ अर्वाचीन ब्रिटीश स्मृतिकार मंजूर करू लागले तेव्हाही धर्म बुडाला! धर्म बुडाला!! म्हणून या जीर्णमतवाद्यांनी कोलाहल केलाच. नुकताच वसु बिलाचा प्रश्न निघाला होता तेव्हाही हीच आरोळी या लोकांनी ठोकली*२ होती. पुनर्विवाहाचा कायदा पास झाला, परंतु धर्म बुडाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्याचे अजून ऐकिवात नाही. विशेष वाईट वाटते ते हे की अमूक एक रूढी नको किंवा अमूक एका सामाजिक जुलमाचे उच्चाटन झाले पाहिजे असे स्पष्टोद्गार काढणारी बरीच नवमतवादी मंडळी एगदी ऐन वेळेस त्या रूढीच्या प्रतिबंधकास विरोध करण्याकरिता जीर्णमतवाद्यांच्या सुराशी आलाही सूर मिळवून घेतात. यावरून इतकेच सिद्ध होते की स्वतंत्र विचार करण्याची आमच्या लोकांत अजून पात्रता आलेली नाही. स्वतःच्या ठाम मतांना प्रामाणिकपणाने चिकटून राहण्याची अंगी धमक नाही, आणि सारासार विचार करून ठरविलेल्या किंवा प्रत्यक्ष अनुभवाने पटलेल्या सिद्धांतांना नाटकी प्रवचनकारांच्या स्वार्थी व खोडसाळ विधानांच्या प्लेगापासून अलिप्त ठएवण्याचे नैतिक धैर्यही नाही. वक्त्याच्या अनुकूळ किंवा प्रतिकूल वाटेल त्या मताला एकाच वेळी एकसारख्या टाळ्या देण्याला यदृच्छेने म्हणा, कळत म्हणा किंवा नकळत म्हणा आम्ही जोपर्यंत आमचे हात उचलण्यात तयार आहोत तोपर्यंत नुसत्या वक्तृत्वाच्या किंवा लेखनशैलीच्या भरारीने आमच्यावर वाटेल त्या विवक्षित मताभिलाषाचा आरोप करण्याची संधी आपमतलबी आणि स्वार्थसाधु वक्ते व लेखक यांनी वाया का घालवावी? नव्या मन्वंतरातील नवमतवाद्यांच्या मनाची ही दुर्बलता पाहिली की, जीर्मतवादी कितीही हट्टवादी असले तरी त्यांच्या स्वमताभिमानाबद्दल आणि निश्चित तत्त्वपुरस्काराबद्दल त्यांच्या पायांवर आदरपूर्वक मस्तकच ठेवणे योग्य होईल. जुन्या स्मृतीतील वचनांचा जर कोणी अभ्यास करील तर त्यांतही स्मृतिकारांच्या व्यापक दूरदर्शित्वाची साक्ष पटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे नवमतवाद्यांनाही त्यातील आज्ञांच्या आधारांवरून अपेक्षित सामाजिक सुधारणा घडवून आणण्याइतका अवकाश त्यात खास सापडेल. जीर्णमतवादी व नवमतवादी यांच्यात वास्तविक मतभेद का असावा हेच कळत नाही. जीर्णमतवाद्यांच्या संकुचित मताभिलाषाला जितके पाठबळ त्यात दिलेले आहे तितकचा व्यक्तिस्वातंत्र्याला व नवमत-पुरस्काराला त्याच स्मृतींतून पूर्ण मुभा ठेवलेली आहे. ब्राह्मविवाहाची पद्धत आज हिंदुसमाजात प्रचलित असली तर ती या पुढे आचंद्रार्क आहे तशीच राहिली पाहिजे इतका हट्ट धरण्याइतक्या आमच्या प्राचीन