कुमारिकांचे शाप : Page 7 of 33

तत्त्वांचा पुरस्कार करणे, स्मृतीतील प्राचीन कालच्या वचनात प्रचलित मनुनुरूप अवश्य ते फेरफार करणे किंवा जुन्या आसावर नवीन मानवी जीवनाचे चक्र बसत नसल्यास तो जुना स्मृतिवचनाचा किंवा धर्मशास्त्राचा दांडाच बदलणे, इतके नैतिक धैर्य, मनाचा सरळपणा, औदार्य आणि देशकालवर्मानाप्रमाणे मानवी चरित्राला सहाय्यभूत होण्याइतका तुमच्या सद् बुद्धीचा लवचिकपणा तुमच्यात नसेल किंवा आम्ही आज अशीही पृच्छा करू की तितका उदारपणा तुमच्या त्या जुन्या पुराण्या स्मृत्यादि ग्रंथांत नसेल तर बाबांनो! तुम्ही आणि तुमचे ते श्रुतिस्मृत्यादि ग्रंथ प्रचलित मनूच्या कालौघापासून बरेच दूर रहाल तर बरे!! तुमची जुनी स्मृती लाख गोष्टी सांगत असेल, पण त्यांतली एकही जर आजच्या काळाच्या आकांक्षेला आणि समाजस्थितीला अनुरूप आणि अनुकूल नसेल, तर तुमच्या त्या जरठ ग्रंथांच्या बाडांतील तत्त्वज्ञान काय कोळून प्यायचे आहे? जुने म्हणून सोने एवढ्याच भोळसर कल्पनेच्या भांडवलावर वर्तमान काळाचा व्यापार निभणे शक्य नाही. पूर्व आणि पश्चिम गोलार्धातील सर्व मानवी प्राण्यांच्या निरनिराळ्या ऐहिक संबंधाच्या दो-या ज्या सांप्रतच्या मनुस्मृतीत एकत्र निगडित झालेल्या आहेत, त्यांच्याशी जर प्राचीन स्मृत्यादि ग्रंथांतील आज्ञा प्रतिकूल किंवा आकांक्षाविरोधी असतील, तर त्या केवळ याज्ञवल्क्याच्या किंवा मनुच्या किंवा पराशराच्या आहेत, एवढ्याच सबबीवर त्यांचे ढोलके पिटीत राहणे म्हणजे नवीन मन्वंतरात जिवंत राहण्याइतकी आमच्यात लायकीच उरलेली नाही, अशी स्पष्ट कबुली देणेच होय. मित्रहो! यावरून असा मात्र कोणी आपला समज करून घेऊ नये की प्राचीन स्मृतींबद्दल आम्हाला मुळीच आदर वाटत नाही. आदर आहे, अभिमान आहे, त्या स्मृतिकारांच्या व्यापक आणि विशाल बुद्धिमत्तेबद्दल मोठे सप्रेम कौतुकही वाटते; परंतु त्या स्मृतीतील तत्त्वे अक्षरशः जशीच्या तशीच हिंदुसमाजाने आचंद्रार्क पाळलीच पाहिजेत असा जेव्हा जीर्णमतवाद्यांचा आग्रह ऐकू येतो तेव्हा त्यांच्या संकुचित मनोवृत्तीची कीव करतानाच त्यांच्या दांभिकपणाचा निषेध करणे प्राप्त होते. प्राचीन स्मृत्याज्ञा अक्षरशः पाळण्याबद्दल जर या शालजोडीवाल्यांचा इतका हट्ट उर्फ आग्रह आहे तर प्राचीन चालीरीतीचे पुनरुज्जीवन करण्यास तरी त्यांची समंती आहे का? तीही देण्याइतके मनौदार्य स्मृतिग्रंथांची पारायणे करणा-या या पंडितांच्या आणि त्यांच्या शालजोडीच्या जरीकाठी फल्ल्याचा कोरडा अभिमान बाळगणा-या त्यांच्या बगलबच्च्या वावदुकांच्या स्वप्नीही नाही! विद्वान वरास सालंकृत कन्या दान करण्याची ब्राह्मविवाह पद्धती ही एकच पद्धती आजला महाराष्ट्रांतील पांढरपेशा हिंदुसमाजात प्रचलित आहे, आणि तीच सरकारदरबारी मानली जाते, म्हणजे सरकारी स्मृतीने हिंदुसमाजाच्या शिफारसीवरूनच तिच्यावर आपल्या मान्यतेचा एकदा शिक्का मारलेला आहे. अर्थात् प्रचलित मन्वंतरातील स्मृतिकाराचा अधिकार परंपरेला अनुसरूनच या देशातील सरकाराकडे गेला आहे. तथापि – अन्यधर्मी भूपाल आर्यभूचा ।। आर्यधर्मा अनुकूल नसायाचा ।। धर्मगुरु ते निःसत्व दंडधारी ।। वर्णगुरु ते मनसोक्त कर्मचारी ।। ‘‘देवल’’ अशी चमत्कारिक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जुन्या मोडक्यातोडक्या आकुंचित साच्यातल्या साच्यात कुचंबत पडण्याचा घोर प्रसंग हिंदु-विवाहपद्धतीवर आज ओढवला आहे. त्यातून हा ब्राह्मविवाह तरी पद्धतशीर आणि प्राचीन तत्त्वांबरहुकूम पार पडतो का? कालवशात् धर्माच्या पांघरुणाखाली त्यांतही इतक्या अनेक घातकी रूढींचा समावेश होत गेला आहे की सांप्रतची आमची विवाहपद्धती म्हणजे अनेक सामाजिक जुलमांचे बंड होऊन राहिली आहे. प्रचलित स्मृतिकार म्हणजे सरकार हे आमच्या कर्मांची जबाबदारी घेण्यास तयार आहे, पण धर्मात हात घालू इच्छित नाही. विवाहविधीची एक ठोकळ कल्पना त्यांच्या दप्तरात नमूद आहे, त्याबरहुकूम भटाने शुभ मंगल सावधान म्हटले की विवाह झाल्याचे या अर्वाचीन स्मृतिकारांना मान्य होते. मग त्या विवाहविधीतील निरनिराळ्या पोटविधींत शेकडो पोटव्याधी किंवा मूळव्याधींची जुलमी आणि सामाजिक बंडे उद्भवली असली, तरी ते त्याकडे पहातसुद्धा नाहीत. बरे, या बंडांचे निर्मूलन करण्याकरिता समाजाची याचना करावी, तो स्वतः याचकच बंडखोर आहे असे समाज ठरवितो आणि खुशाल त्या सामाजिक जुलमांच्या लाथा कण्हत कुंथत निलाज-याप्रमाणे खात पडतो. सामाजिक क्षेत्रांतील जुलमांचा प्रतिकार व प्रतिबंध करण्याकरिता आजपर्यंत जे जे वीर पुढे आले, त्यांचा त्यांचा समाजाने छळ आणि उपहासच केला. त्यांच्यावर नाही