कुमारिकांचे शाप : Page 6 of 33

पातृदेवीच्या त्या उज्वल भक्तीची – पर्वा न करणा-या राक्षसी कोटीतल्या इसमाची मनोवृत्ती कोणकोणत्या परिमाणूंची बनलेली असेल बरे? या एकाच मुद्दाचा आपण जर किंचितं निःपक्षपात बुद्धीने विचार कराल, तर त्या परिमाणूंचे अनॅलिसिस्-पृथःकरण करून आपण असा खास निकाल सांगाल की व्यापारी पद्धतीच्या लग्नांपासून निर्माण झालेल्या संततीच्या हातून माता किंवा पिता यांच्याबद्दलची कर्तव्ये कधीही पार पडणे शक्य नाही, आणि त्यांच्या हातून मातृप्रेमाची किंवा पितृप्रेमाची अपेक्षा करण्याचा आईला किंवा बापाला मुळी अधिकारच नाही. जेथे खुद्द आईबापांचाच संयोग बळजबरीच्या तत्त्वावर झालेला, जेथे त्यांच्या परस्पर प्रेमाची ग्रंथी व्यापारी धर्तीच्या चढाओढीच्या दोरांनी परस्परांच्या इच्छेविरुद्ध – विशेषतः वधूच्या इच्छेविरुद्ध – बांधलेली असते, आणि जेथे नाइलाजापेक्षा परस्पर प्रेमसंवर्धनाला किंवा प्रेमविनिमयाला दुसरा आधारच नसतो, तेथे त्या तसल्या आईबापांबद्दल – केवळ ते जन्मदाते एवढ्याच मुद्यावर – मुलांनी आपल्या कर्तव्याला कसे व का जागृत रहावे? या कर्तव्याची जाणीव त्यांना उत्पन्नच होण्याची पंचाईत. जेथे आई आणि बाप यांची जोडी रूढीच्या बेजबाबदार जुलमी चुंबकाने एकत्र जुळविलेली असते, तेथे कोणी कितीही मारून मुटकून वैद्यबुवाचा प्रयोग केला, तरी त्या दांपत्यात ‘खरा तो प्रेमा’ उत्पन्नच होत नाही; फक्त ‘पदरी पडले आणि पवित्र झाले’ एवढ्याच मुग्ध आणि निष्कपट वृत्तीने पत्नीला आपल्या नियुक्त पतीच्या जोडीने संसार करावा लागतो. अर्थात् जेथे मूळ पायाच विषमतेवर उभारलेला तेथली इमारत तरी समप्रमाणात कोठून उभारली जाणार? विषम विवाहाची प्रजा विषम मनोवृत्तीची निपजली नाही, तर मोठेच आश्चर्य होईल; मित्रहो, स्पष्टोक्तीचा राग मानू नका. आजकाल हिंदुसमाजांत या विषमविवाहाचीच संतती दृष्टीस पडत आहे; आणि यात संततीकडे बोटे दाखून ‘‘अहो राष्ट्राचे भावी स्तंभ हो! अहो उद्याचे राष्ट्रीय पुढारी हो! राष्ट्राच्या भवितव्यतेचे कारागीर हो’’ वगैरे मोठमोठ्या शेलक्या पाल्हाळीक संबोधनांनी वक्ते श्रोत्यांना आळवीत असताना पाहिले म्हणजे त्या वक्त्यांची आणि श्रोत्यांची कीव येते. प्राचीन आठ विवाहप्रकारांतून सांप्रत ८वा ‘ब्राह्मविवाह’ प्रकार काय तो शिल्लक उरला आहे आणि याच प्रकाराने यच्चावत हिंदूंची लग्ने अलिकडे लागत आहेत लग्नाचे हे आठ प्रकार प्रथम गौतम आणि बौद्धायन यांनी का निर्माण केले, कालवशात् त्यांतील सातांना गचांडी का, काय कारणाने व कोणी दिली आणि सध्याच्या कलियुगात हिंदु म्हणविणा-या लोकांसाठी हा ब्राह्वविवाहच का व काय कारणाने जिवंत राखण्याची काळाची मर्जी झाली, याचे इतिहाससंशोधन कोणी करील तर बरे! तसेच अगदी अलीकडे पृथ्वीराज चव्हाणाच्या इतिहासापर्यंत गांधर्वमिश्रित क्षात्रविवाहाची जी काही उदाहरणे दृष्टीस पडतात ती आता का आणि कोणच्या स्मृतिकाराच्या अनुज्ञेने बंद पडली? मुलीच्या बापाला पैसे देऊन बायको विकत घेण्याची मानुष उर्फ आसुरी विवाहाची जी पद्धत अजूनही कित्येक काठेवाडी-हिंदू-गुजराथी-वाणी लोकांत प्रचलित आहे, ती कोणत्या पुण्याईवर अजून तगली आहे? श्रुतिस्मृतींतील वाक्यांच्या वेलांटी मात्रेच्या बाहेर पाऊल टाकल्यास महापातकांची भीती घालणा-या जीर्णतवाद्यांना आपण असे विचारायला नको काय की विवाहाच्या या निरनिराळ्या सातआठ पद्धती जर नुसत्या त्यांच्या प्राचीनत्वावरून तुम्हाला मान्य आहेत, तर त्यातील काही पद्धती गाळण्याचा हिंदुसमाजाला केव्हाही काय अखत्यार होता? परिस्थिप्रमाणे त्यांतील दैव, आष, पैशाच्च या पद्धती जर तुम्हाला पूर्वी कधी काळी अजिबात निषेधपूर्वक बंद करणे प्राप्त झाले, तर आजला स्वयंवर (गांधर्व) पद्धती नको आणि ब्राह्मविवाह पद्धतीच काय ती पाहिजे किंवा असावी या विचारसरणीस तरी परिस्थितीचा किंवा देशकालवर्तमानाचा असा काय भरभक्कम पुरावा तुमच्यापाशी आहे? आमचे म्हणणे एवढेच आहे की श्रुतिस्मृतींच्या आधारावर आणि धर्मसंकटाच्या धाकदपटशावर जर प्राचीन तत्त्वांना चिकटून राहावयाचे असेल तर खुशाल रहा – घट्ट चिकटून रहा, या विसाव्या शतकातसुद्धा ख्रिस्तीशकापूर्वी हजारबाराशे वर्षांपूर्वीच्या श्रुताज्ञा आणि स्मृत्याज्ञा अक्षरशः आचरणात आणा. परंतु एकदा देशकालवर्तमानाची सबब पुढे आणून तरी एकदा प्राचीनातिशय वेदकालातल्या स्मृतींचा आधारक दाखवून या बोटवरील थुंकी त्या बोटावर उडविण्याचा निंद्य प्रयत्न करू नका. देशकालवर्तमानाच्या परिस्थितीप्रमाणे जुन्या स्मृतीतील निवडक आवश्यक