कुमारिकांचे शाप : Page 5 of 33

पद्धतीवरच येऊन ठेपल्यामुळे, सारी प्रजा ‘दे वाण घे वाण’ इतक्या क्षुद्र बुद्धीच्या कर्तव्याच्या कल्पनेने घेरलेली शूद्रप्राय अशीच दृष्टीस पडते. मित्रहो! हिंदुसमाज आजला शूद्रांपेक्षाही शूद्र अशा नीचतम दुरावस्थेला येऊन भिडला आहे, हे माझे विधान ऐकून तुम्हाला कदाचित राग येईल; त्याला माझा नाइलाज आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे याचे तुम्ही सूक्ष्म अवलोकन करा म्हणजे सांप्रत या हिंदुस्थानात पूर्वीचे चार वर्ण मुळीच अस्तित्वात नसून आता सारा एकच वर्ण उरला आहे आणि तो कोणता म्हणाल तर शूद्रवर्ण हा होय. हल्ली ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे जी नावे आपण ऐकतो, त्या नुसत्या जाहिरातीच्या पाट्या आहेत, पूर्वीच्या वर्णाश्रम-इतिहासाचे स्मरण करून देणारे ते निर्जीव ‘मेमोरियल स्टोर इन्स्क्रिपशन्स’ – शिलालेख आहेत; या पलिकडे आता त्यात काय अर्थ राहिला आहे? वर्णाश्रमपद्धतीचा कोरडा दांभिक अभिमान बाळगणारे बरेच आहेत परंतु त्या पद्धतीचे धर्म प्रत्यक्ष आचरणारे लोक कोठे आहेत? मित्रहो! धर्माचे आचरण करावे अशा सद् बुद्धीचा अंकुर हृदयांत जिवंत असलेले महत्वाकांक्षी लोक आजलाही मुळीच नाहीत, असे मात्र मुळीच नाही; आहेत-बरेच आहेत. परंतु अंतःकरणात उद्भूत होणा-या महत्वाकांक्षएला प्रत्यक्ष आचरणात आणण्याची आज त्यांच्या हातात शक्तीच राहिलेली नाही – म्हणजे थोडक्यात सांगावयाचे तर हृदयात जरी ब्राह्मणत्वाचा किंवा क्षत्रियत्वाचा अंकुर जिवंत दिसतो तरी हात मात्र शूद्रवत् आचरण करितात, इतकी ही जबरदस्त प्रतिक्रिया होण्याचे कारण काय? याचा, मित्रहो! जरा शांतपणाने विचार करा, म्हणजे मग तुमचे तुम्हालाच कळून येईल की सध्या हिंदुसमाज शूद्रवत झाला आहे की नाही तो! या सर्व भयंकर क्रांतीच्या बुडाशी एक दुर्जेत, घातुक आणि भयंकर महापातक आहे. या महापातकाच्या विषारी ज्वाला गेली कित्येक वर्षे आमच्या सामाजिक सौख्याची, सामाजिक आकांक्षांची आणि सामाजिक बंधनाची राखरांगोळी करून, आम्हाला राष्ट्रकार्यातही दिवसेंदिवस नालायक आणि कमजोर बनवीत आहे. या महापातकाच्या हलाहल विषाने आमचे सांपत्तिक वैभव शोषल्यामुळेच आज आम्ही निःसत्व, उच्छिष्ठभोजी आणि सर्वच बाबतीत परक्यांच्या तोंडाकडे पहाण्याइतके हीनदीन झालो आहोत. या महापातकाच्या तडाक्यात आमचे आम्ही होऊन गेल्यामुळे आमच्या कर्तबगारीची धार पार बोथट होऊन, कर्तव्याची मर्यादाही इतकी संकुचित झाली आहे की पुल्लिंग म्हणजेच पौरुषत्व इतक्या क्षुद्र भावनेमुळे आज पिढ्यान् पिढ्या सामाजिक आणि राष्ट्रीयकार्यात आमचा काडीचाही उपयोग न होता, जन्मा आला हेला, पखाली वाहतां मेला अशा रीतीने सरणाची वाट धरावी लागते. महत्वाकांक्षेने हृदयात जरा कोठे जोर करावा तो आमच्याच हातांनी आमच्याच मुस्कटात भडकावून घेण्यापलीकडे विशेषसे काहीच घडत नाही. या महापातकाचे जंतू आज आमच्या हिंदुसमाजात सर्वत्र अप्रतिबंध बोकाळत असल्यामुळे आमच्या शुद्ध बुद्धीला भ्रंश उत्पन्न झाला आहे; अर्थात् अवनति हीच उन्नती असल्या खोट्या कल्पनांच्या शाबरी मंत्रांनी आमच्या नसांतील रक्तात बिघाड झाला असल्यास त्यात काय नवल? या महापतकाचे समूळ उच्चाटन आजपर्यंत न झाल्यामुळे आजला सारा हिंदुसमाज विषम विवाहाच्या संततीने गजबजून गेला आहे. या विषम संसतीला ख-या स्वाभिमानाचा लवलेशही नसल्यामुळे, आपल्यामध्ये जी हल्ली आत्मवंचक परप्रत्ययनेय बुद्धि संचारलेली आढळते, तिची आजकाल मोठी चलती चाललेली आहे, आणि त्रयस्थ लोकांनी या चलतीचा फायदा घेऊन आमच्याच हातून आमच्या राष्ट्राचा द्रोह करविण्याचा आजपर्यंत खासा उद्योग केला. मित्रहो! किंचित् खोलवर विचार करा. संस्कारपूर्ण व प्रेमपूर्ण अशा पद्धतशीर विवाहाची आम्ही जर संतती असतो, तर आजकाल आमच्या समाजात जी – देशद्रोही लोकांची बजबजपुरी माजली आहे ती तशी कधीच माजती ना! नेपोलियन बोनापार्ट म्हणत असे की ‘‘A man who fights against his country is a child who would kill his mother.’’ (जो मनुष्य स्वदेशाविरुद्ध शस्त्र उचलतो, तो आल्या आईचा खूनही करायला चुकणार नाही.) यांतील तथ्य काय आहे? समरांगणात पोलादी अंतःकरणाने लाखो शत्रूंना चिरडून फस्त करणारे वीर महावीर ज्या मातृप्रेमाचे नुसते स्मरण होताच हात डोडून विनम्रतम भावाने त्याला प्रणिपात करतात, त्याच मातृप्रेमाची