कुमारिकांचे शाप : Page 4 of 33

आहे. अधार्मिक कल्पनांच्या सरपणात यथार्थाची चूड पेटवून भडकविलेल्या या लग्मसत्रांत लाखो कुटुंबांची आहुती पडलेली आहे आणि दरसाल पडत आहे. या सत्रांत कोट्यवधी अनाथ अबला कुमारिकांचे आणि तिच्याबरोबर तिच्या पित्याच्या कुटुबांचे बळी पडलेले आहेत.

आमच्या प्रचिलत व्यापार सट्ट्याच्या विवाहपद्धतीत मानापानाची, रुसव्याफुगव्याची, द्रव्यशोषणाची, अडीअडवणुकीची आणि वरपक्षाच्या फाजील लब्धप्रतिष्ठतेची जी सोंगेढोंगे अलीकडे घुसविली आहेत, त्यांच्या उर्मट पुरस्कर्त्यांनी आपले डोळे जरी ताणताणून फाडले, तरी विवाहपद्धतीत घुसलेल्या अनेक डाकेखोर व पठाणी रूढींचे समर्थन करणारा एकही प्राचीन शास्त्राधार त्यांना सापडणे शक्य नाही. या आपमतलबी, घातकी समाजसत्वविध्वंसक रूढी आमच्या कशा घुसल्या, याचे कोरडे इतिहास-संशोधन करण्याचीकाही जरूरी नाही; या दुष्ट राक्षसी रूढींचे आज आम्ही बंदे गुलाम झालो आहोत ही गोष्ट कोणीही अमान्य करणार नाही. अर्थात दिवसाढवळ्या दरोडे घालून आमच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचे शोषण करणा-या या रूढींचे ज्या अर्थी आम्ही दास झालो आहोत, त्या अर्थी आम्हास आता ‘आर्य’ म्हणवून घेण्याची लाजच वाटली पाहिजे, इतके आम्ही या विवाह-संस्कारांच्या बाबतीत नादान बनलो आहोत. विवाह करावयाचा का? तो एका विशिष्ट शास्त्रीय पद्धतीनेच करावयाचा का? विवाहसंस्काराचे महत्त्व काय आहे? विवाहामुळे कोणकोणत्या आध्यात्मिक जबाबदा-या आपणांवर येतात? विवाहविधीत वधूचे महत्त्व काय आहे? इत्यादि अत्यंत महत्त्वाच्या प्राचीन दूरदृष्टी ऋषींनी पूर्ण विचार करून जे सिद्धांत ठरवून दिले, त्या सिद्धांतांना लाथाडून देऊन ज्याअर्थी आम्ही इहलौकिक आणि पारलौकिक सौख्याची अपेक्षा करतो, त्याअर्थी उद्या कोणी त्रयस्थाने तुम्ही शुद्ध नर्मदेचे गोटे आहात असा आमच्यावर शेरा मारला, तर त्यात त्या त्रयस्थाचा कोणता दोष? प्राचीन ऋषिप्रणित विवाहसंस्कारांतील निरनिराळ्या मंगल प्रसंगाचे श्लोक, मंत्र व ऋचा वाचल्या म्हणजे विवाहविधीत वधूला व वधूपक्षालाच जास्त महत्त्व दिलेले आढळून येते. वरपक्षाचा उद्धार करणारी गायत्री वधू. वराचा वंश वाढविणारी वल्ली वधू. वराला ब्रह्मलोकाची प्राप्ती करून देणारी कामधेनूही वधूच. वधू नसेल तर नुसत्या सडेसोट बारगिरांची किंमत ती काय? परंतु विवाह-संस्काराबद्दलची ही धार्मिक किंवा आध्यात्मिक दृष्टीच फुटल्यामुळे, आजकाल विवाह म्हणजे सट्ट्याचा बाजार झाला आहे. वाग्दान कन्यादानादि विधि निखालस नाटकी थाटाचे बनले आहेत. उपाध्ये म्हणजे चरकावरचे शुद्ध नंदीबैल आणि वधूचा पिता म्हणजे वराच्या खाटीक बापाच्या हातातला गरीब बोकड! उज्वल विवाहसंस्काराला इतक्या नीचतम दुरावस्थेला आणून ठेवणा-या लोकांना सामाजिक किंवा राष्ट्रीय चळवळीत जर नेहमी अपयशाची खापरेच मिळत गेली तर त्याचा दोष परमेश्वराच्या माथी का म्हणून? आमच्या धार्मिक, सामाजिक व राजकीय जीवनाचा पाया या विवाहसंस्कारावरच मुख्यत्वेकरून उभारलेला आहे. तो जोपर्यंत नीट व्यवस्थित सांभाळण्यात आला होता तोपर्यंतच महाराष्ट्राच्या कर्तबगारीचा महिमा जिवंत होता. जेव्हा या पायावर रूढीभ्रष्ट विवाहसंस्काराच्या तमाशाचे जलसे सुरू झाले तेव्हापासून महाराष्ट्राच्या ऐहिक वैभवाला ओहटी लागली.

ज्या देशात किंवा समाजांत विवाहविधीची थट्टा करण्यात येते, विवाहसंस्काराला कंत्राटाचे स्वरूप देण्यात येते किंवा विवाहाचा खरा आध्यात्मिक उद्देश लाथाडून टाकण्यात येतो, ती राष्ट्रे किंवा ते समाज आर्थिक अभ्युदयाच्या कितीही उंच शिखरावर चढले, तरी नैतिक दृष्ट्या ती कमजोर असल्यामुळे, परिस्थितीचा नुसता चुटपुटता धक्का लागताच, त्यांच्या वैभवाचा डोला कसा घडघडून खाली कोसळतो, याची अनेक उदाहरणे सध्याच्या पाश्चात्य महायुद्धाने बरीच उघडकीस आणली आहेत. विवाहविधी सट्ट्याच्या किंवा कंत्राटाच्या स्वरूपात होऊ लागले म्हणजे त्यापासून जी संतती पुढे निर्माण होते, ती संकरापेक्षा क्षुद्र अशीच व्हायची; मग आईबाप-सध्याच्या भ्रष्ट वर्णाश्रमाच्या भाषेत बोलायचे तर – जरी एकाच जातीचे असले, सगोत्र, सपिंड, सप्रवर नसले, तरी त्यांच्या संततीवर शूद्रातिशूद्रत्वाचा शिक्का पडल्याशिवाय खास राहत नाही. धार्मिक ग्रंथांतील वचनांचा कीस काढून कोरड्या विद्वत्तेच्या दिमाखावर शालजोड्या फडकावणारे वेशासंपन्न ‘नन्दान्तं क्षत्रिय कुलम्’ म्हणून कितीही आक्रोश करोत, आज आमच्या हिंदु समाजाची सामाजिक स्थिती जर कोणी पृथःकरण केली जर आजला हा सारा समजा शूद्रातिशूद्रांनीच गजबजून गेला आहे, असा निकाल त्याला द्यावा लागेल. हिंदु समाजाची विवाहपद्धती व्यापारी