कुमारिकांचे शाप : Page 3 of 33

लग्नसराइला दुव्वा देत आता आढ्याला तंगड्या लावून निवांतपणे झोपा ताणू लागले. थोडक्यात वर्तमानपत्री सांच्यात बोलायचे म्हणजे सालाबादप्रमाणे यंदाही लग्नसराई मोठ्या आनंदात गेली लग्नसराई आणि ती आनंदात गेली! या शब्दरचनेचा अर्थ तरी काय? लग्नसराई आणि आनंद, ही विचारसरणी जर बरोबर अर्थपूर्ण होत असेल, तर राघो हुज-याचे किंवा तात्या भिल्लाचे बंड आणि आनंद, ही विचारसरणी तरी अनर्थपूर्ण का मानावी? गेली शंभर वर्षे आत्मवंचक आयुष्यक्रमांत गुलामगिरीची रकटी पाळण्यात आनंद मानणा-या या नादान महाराष्ट्राला आजकाल कोणत्या गोष्टीत आनंद वाटेल ते काही सांगताच येत नाही. बारशाच्या घुग-या खातानाही याला आनंद होतो आणि तेराव्याचे लाडू झोडतानाही त्याला आनंद होतो. शुद्ध विवाह-संस्काराचा नुसता फार्स करणा-या आमच्या लोकांनी लग्नसराईत आनंद मानण्यासारखे आता काय राहिले आहे? आपल्या मुलीला ‘स्थळ’ शोधण्यासाठी जोडेफाड करीत वणवण हिंडणा-या आणि सरतेशेवटी शेकडो रुपयाची किंमत देऊन विकत आणलेल्या जावईबुवांच्या गळ्यात मुलीने माळ घातली म्हणजे ‘सुटलो’ म्हणून दीर्घ उसासा टाकून डोळ्यातून कोसळणारा अश्रूंचा लोंढा उपरण्याचे सावरणा-या बापाची परिस्थिती जाणणा-या किंवा तिचा प्रत्यक्ष अनुभव घेणा-या कोणत्याही इसमाला लग्नसराई म्हणजे आनंदाची पर्वणी ही साळसूद विचारसरणी क्षणभरसुद्धा पटायची नाही.

वरशोधासाठी घराबाहेर पडल्या घटकेपासून तो अखेर व-हाड्यांना यथास्थित लाडू चारून त्यांचा ‘या बरे’ म्हणून निरोप घेण्याच्या घटकेपर्यंत बिचा-याला ज्या हालअपेष्टा, अपमान, निर्भर्त्सना, पाणउतारा, फसवाफसवी, द्रव्यसोस, कर्जाचा फास इत्यादि अनेक आधिव्याधी भोगाव्या लागतात, त्या जर कोणी ध्यानात आणील, तर त्यालासुद्धा लग्नसराई म्हणजे शुद्ध भामट्यांचा बाजार आहे, असे वाटल्याशिवाय खास राहणार नाही. मुलीच्या जन्मातला अत्यंत महत्त्वाचा, मांगलिक आणि वंशोद्धारक असा तिचा विवाह घडवून आणणा-या आपल्या यजमानाचे होणारे सांपत्तिक आणि मानसिक धिंडवडे पाहून प्रत्येक मुलीच्या आईच्या – मग ती सख्खी असो वा सावत्र असो – आणि खुद्द मुलीच्याही आंतड्याला पडणारे ते निराशेचे आणि मानखंडनेचे पीळ पाहिले, तर राजकीय स्वातंत्र्यासाठी झडगडणारे आम्ही लोक सामाजिक क्षेत्रांत किती जुलमी आणि अरेरावी वर्तन करतो, हे आणखी स्पष्ट करून सांगण्याची जरूरच नाही. जाचक – नव्हे प्राणघातकच – अशा मारवाडी पद्धतीने वधूच्या बापाला हरएक बाबतीत पिळून काढण्याचे वरपक्षाचे नवे जुने मार्ग पाहिले म्हणजे राजकीय क्षेत्रांतील ब्युरोक्रॅटांच्या स्वच्छंदी जुलमांना हातबोटे चोळण्याचा आम्हाला काय अधिकार? विवाहसंस्कारासारख्या ईश्वरप्रणित मंगलविधीच्या सोवळ्या नावाखाली, असंख्य दात असलेल्या सामाजिक रूढींच्या करवतीने आपल्या प्रत्यक्ष सोय-यांचा गळा कापणा-या वरपक्षीय नराधमांच्या द्रव्यशोषणांच्या लीला पाहिल्या म्हणजे परकीय राजसत्ते देश पिळून काढला म्हणून निषेध करून हातपाय आपटण्यापूर्वी या स्वदेशी सभ्य टगांची प्रथम हद्दपारी करणे आवश्यक आहे.

आम्हां आर्याची विवाहसंस्कार-पद्धती अत्यंत शुद्ध, सात्विक आणि पारमेश्वरी इच्छेच्या मूलतत्त्वांबरहुकूम ठरविलेली अशीच असल्याबद्दलची कित्येक शतकांची साक्ष आहे. ख्रिस्तीशतकांपूर्वीपासून तो आजदीनतागायत या भरतखंडात- विशेषतः या महाराष्ट्रात – जे जे परदेशी फिरस्ते येऊन गेले, त्यांचे लक्ष या विवाहविधीने आकर्षण केल्याचे दाखवे ठिकठिकाणी सापडतात. आमच्या हिंदु समाजातील गृहव्यवस्थेचे, गृहस्थधर्माचे, गृहिणीच्या आणि गृहस्थाचे मनोवेधक चित्र रेखाटून, त्याच्या उत्कृष्टत्वाचे सारे श्रेय आमच्या विवाहपद्धतीला देण्यात अनेक पाश्चात्यांनी स्तुतिस्तोत्रांचा आमच्यावर अगदी वर्षाव केला आहे, आमच्या थोर प्राचीन पूज्य पूर्वजनांनी परमेश्वरतुल्य ऋषिप्रणित विवाहसंस्कार-पद्धतीचा पुरस्कार केला, त्या संस्काराचा मूळ आध्यात्मिक नीट जाणून आपालले विवाह केले आणि गृहस्थ-गृहिणी धर्म अक्षरशः पाळला, म्हणूनच आल्या अव्वल संस्कृतीने, अनुपमेय पराक्रमाने आणि ओजस्वी बलाने सा-या जगाला थक्क करून सोडणारी असंख्य नारी-रत्ने त्यांच्या पोटी निर्माण झाली. आमच्या राष्ट्राच्या सांप्रतच्या मृत्पिंडावस्थेला जी अनेक कारणे आणि पातके आमच्याच हातून घडली आहेत, त्या कर्माच्या शिरोभागी शुद्ध विवाहसंस्कारांची हेटाळणी दोष मोठ्या ठळक अक्षरांनी लिहून ठएवला पाहिजे. सांप्रतची कंत्राटवजा लग्ने हा एक सट्ट्याचा बाजार होऊन उठला आहे. आमची अलिकडची लग्ने हा एक मारवाडी व्यापार बनला आहे. आमची चालू विवाहविधी हा एक उचल्यांचा आणि भामट्यांचा राजरोस धंदा झाला