कुमारिकांचे शाप : Page 11 of 33

वरशोधन याचा अर्थच आता ‘वराचा शोध लावणे’ इतका अक्षरशः होऊन बसला आहे. पण ज्या मुलीची त्याच्याशी जन्मगाठ ठोकून द्यावयाची असते, तिला तो वर पसंत पडेल की नाही; त्याचे गुणावगुण तिच्या गुणावगुणांशी किंवा रुचीअरुचीशी कोणत्याही प्रकारचा जाचक भेद उत्पन्न होऊ न देता समतोल प्रमाणात राहतील किंवा नाही; किंवा या दोघांचा संयोग खुद्द त्या दोघांना तरी सर्व दृष्टींनी सुखकारक होईल की नाही, या गोष्टींचा कोणीही तिळमात्र विचार करीत नाही. मुलीचे लग्न म्हणजे घरात वाढलेली धोंड एदा दुस-याच्या गळ्यात कशीबशी बांधून लौकिकी दृष्ट्या आपण स्वतः मात्र कर्तव्यमुक्त म्हणून नाक वर काढून जगात मिरवायला तयार होणे. येथे पित्याचे कर्तव्य बहुतेक खलास होते. वधुपरीक्षेच्या लॉटरीतून पसंतीचा शिक्का मिळाला आणि वराच्या किंमतीबद्दल देण्याघेण्याचा सौदा पटला म्हणजे विवाहाच्या श्रीगणेशाची मेलगाडी लाईन क्लीअर मिळून चालू लागते. सांप्रतची शोधनपद्धती इतकी जुलमी आणि असभ्य बनलेली आहे की वराने मात्र वधूला चारचौघांच्या बैठकीत आणून तिची तोंडी लेखी वाटेल तशी कस्सून परीक्षा घ्यावी आणि वधूने मात्र वराच्या गुणावगुणांद्दल चकार शब्दही न काढता निमूटपणे बिनतक्रार त्याच्या गळ्यात माळ घालावी. मग तो अक्षरशून्य टोणपा असो, व्यसनी कुरूप असो किंवा वयातीत असो, तोच पति तिने मान्य केला पाहिजे. जास्त बोलण्याचा तिला अधिकारच नाही. स्वयंनिर्णयाचा डंका पिटणा-या या विसाव्या शतकांत कुमारिकांचा वरपसंतीचा नैसर्गिक हक्कसुद्धा न जुमानण्याइतके जुलमी लोक स्वराज्याची अपेक्षा करतात, इतर राष्ट्रांच्या खुर्चीला खुर्ची भिडवून समसमान हक्काचा वारसा मोठ्या आवेशाने प्रतिपादन करतात, हे आश्चर्य नव्हे काय? वरपसंती कोण करणार? तर मुलीचा बाप आणि त्याचे नातलग व मित्र. सृष्टीनियमाप्रमाणे वृद्धिंगत होणारे आपल्या मुलीचे सौंदर्यमिश्रित तारुण्य पाहून आनंद मानण्याऐवजी संकटाची हैबत खाणारा आणि मुलीने माळ घालताच ‘सुटलो’ म्हणून तिच्या विषयीच्या सर्व जबाबदारीतून अक्षरशः सुटणा-या बापाने वरपसंती करावी आणि मुलीने गुपचुप त्या पसंतीला मुग्ध संमती द्यावी, हा प्रकार पूर्वीच्या अंधा-या रानटी युगात प्रचारात असला तर खुशाल असो, परंतु सध्याच्या स्वातंत्र्ययुगात तोच प्रचारात अस्तित्वात असावा ही गोष्ट आमच्या संस्कृतीवर डांबर ओतणारी नाही, असे म्हणणारा इसमसुद्धा सध्याच्या मन्वंतरात फार दिवस जिवंत न राहील तितके बरे! भावी संसारसुखाची अत्यंत मनोरम आणि हृदयविकासी चित्रे लहानपणापासून आपल्या हृदयफलकावर कोरून ठेवण्यात जिची सारी कौमार्यावस्था खर्च झालेली असते, तिने ऐन उमेदीच्या घटकेला मनोराज्यांतर्गत त्या सर्व उत्कृष्ट कल्पनाचित्रांना साफ पुसून टाकून केवळ आपल्या बापाच्या किंवा पालकाच्या वरपसंतीच्या निर्णयाला बिनतक्रार आपली मान द्यावी आणि तो गळ्यांत दावे बांधून देईल त्याच्या मागोमाग एक ब्रहि न काढता निघून जावे, ही पद्धत वैवाहिक संकाराच्या दृष्टीने अघोर आणि राक्षसी तर ठरेलच ठरेल, पण प्राचीन भारतीय संस्कृतीच्या लंब्याचौड्या गप्पा मारणारांच्या आणि स्वातंत्र्याचे पोवाडे गाणारांच्या तोंडाला काळीमा लावणारी मात्र खास आहे. स्त्रियांच्या विद्वत्तेचा शौर्याचा व पावित्र्याचा प्रश्न निघताच जुनी पुराणांची बाडे हुडकून गार्गी, मैत्रेयी, कुंती इत्यादी स्त्रियांची उदाहरणे प्रतिपक्षियांच्या तोंडावर भडाभड फेकणारे आमचे शालजोडीवाले आणि पाटलूणवालेसुद्धा स्वतःच्या कन्याकुमारिकांच्या वराभिरुचीचा खून करून कालवडीप्रमाणे त्यांना वाटेल त्या बैलोबाच्या गळ्यात जखडून बांधण्यात मागेपुढे पहात नाहीत, ही अत्यंत शरमेची गोष्ट नव्हे काय? या बळजबरीच्या पद्धतीने सारा हिंदूसमाज आजला विषमविवाहाचा पुरस्कर्ता बनवून सोडला आहे. वर्णव्यवस्थेच्या कुचक्या विरळ पडद्याखाली विषम विवाहापासून निर्माण झालेली शूद्र वृत्तीची प्रजा बोकाळू लागली आहे. असंख्य अबला कुमारिकांच्या मनोरथांचे टोलेजंग किल्ले आम्ही आमच्या क्षुल्लक स्वार्थी इच्छेच्या बांबगोळ्यांनी धडाधड कोसळवून धुळीस मिळविले आहेत. आमच्या या जुलूमी वरपसंतीच्या रूढीने त्यांच्या सोन्यासारख्या महत्त्वाकांक्षांची, त्यांच्या उदयोन्मुख चारित्र्याची, फार काय त्यांच्या सर्वस्वाची आम्ही राखरांगोळी करून टाकली आहे, याबद्दल त्या असंख्य कुमारिका आम्हाला कितीतरी तळतळून शाप देत असतील याचा जोपर्यंत आम्ही विचार करीत नाही तोपर्यंत आम्हाला ऐहिक सौख्य तर नाहीच नाही, पण पारलौकिक