कुमारिकांचे शाप : Page 2 of 33

to form matrimonial alliances with. If we cannot find them, our daughters will rather remain unmarried for life than be made over to people who value only money but cannot honour womanhood or realise the spiritual nature and value of love.’’ प्रस्तावना हुंडा विषयाच्या बाबतीत रा. केशवराव ठाकरे व त्यांचे बंधु रा. यशवंतराव हे कर्ते सुधारक आहेत. रा. केशवराव हे जितके निर्भीड व स्पष्टवक्ते आहेत तितकचे ते उत्कृष्ट मराठी व इंग्रजी लेखक आहेत, यासंबंधी येथे नव्याने सांगावयाची जरूरी नाही. हुंडा या विषयावर एक स्वतंत्र पुस्तक लिहिण्याचा त्यांचा बरेच दिवसांचा उद्देश होता व तो पूर्वी प्रसिद्धही झाला होता. गेल्या साली दादर येथे याच विषयाला धरून ‘‘कुमारिकांचे शाप’’ नामक त्यांचे एक विवेचनपूर्ण व्याख्यान झाले. ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध व्हावे असे काही तरुणांकडून सुचविण्यात आले व त्याप्रमाणे आम्ही त्यांस सुचविले. परंतु त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यामुळे त्यांस तसे करिता आले नाही. यंदाच्या प्राणघातक इन्फ्लूएन्झाच्या साथीनंतर लग्नसराईच्या अवधीत ‘हुंडा’ आपले उग्र स्वरूप तितक्याच भयंकर रीतीने दाखवू लागल्याची चिन्हे दिसू लागल्याकारणाने ‘कुमारिकांचे शाप’ याच संधीस बाहेर पडले पाहिजे असे आम्हास वाटल्यावरून आम्ही रा. केशवराव यांस पुन्हा एकदा आग्रहाची विनंती केली व ती त्यांनी शारीरिक अस्वास्थ्याची सबळ सबब बाजूस ठेवून वेळांत वेळ काढून मान्य केली म्हणूनच हे पुस्तक आम्हांस आमच्या महाराष्ट्रीय बंधुभगिनींच्या हाती देण्याची सुसंधी मिळाली. ज्यांनी हे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकले असेल त्यांना या पुस्तकांतील मजकूर अक्षरशः किती तंतोतंत उतरला आहे हे निराळे सांगण्यास नको. महाशिवरात्रीच्या व्रताचे फळ तात्काळ मिळते असे म्हणतात.

आमच्या या पुस्तकातील आशयाचा योग्य तो परिणाम आमच्या महाराष्ट्रीय तरुण बंधुभगिनींवर होऊन त्याचे दृश्य फल आम्हांस लवकरच लाभो अशी श्रीशंकराच्या चरणी अनन्यभावाने प्रार्थना करून अल्प प्रस्तावना पुरी करितो. आपला नम्र सेवक केशव सीताराम ठाकरे २० मिरांडाची चाळ, दादर – मुंबई ता. २८-२-१९ ।। कुमारी श्री स्नेहलतेचा जयजयकार असो ।। कुमारिकांचे शाप केशव सीताराम ठाकरे यांनी दादर-स्टुडंटस सोशल युनियन संस्थेच्या विद्यमानें ता. २३ जून सन १९१८ रोजी दिलेले व्याख्यान लग्नसराई संपली. सबंध वर्षभर घरोघर आणि दारोदार मुलींसाठी ‘स्थळ शोधीत भटकणा-या गरजवंत बापांच्या पायांना विश्रांति मिळाली. आपल्या ‘उरावरची धोंड’ निघाली म्हणून मुलींच्या आई हुश्श हुश्श करीत बसल्या. ‘यंदा कर्तव्य आहे’ म्हणणा-या कित्येकांच्या दोन हाताचे चार हात झाले आणि स्वतःच्या ‘हातापायांची काळजी’ कणा-या कित्येकांनी आपल्या द्वितीय किंवा तृतीय पुनर्विवाहाचा ‘बार उडवून’ पूर्वीच्या चार आणि सहा हातांचा गुणाकार अनुक्रमे सहांत आणि आठांत करून घेण्याची अमोल संधी वाया जाऊ दिली नाही.

कित्येकजणांनी हातांच्या या गुणाकार बेरजेत प्रत्यक्ष न पडता, ‘लग्न झाले नसले तरी मांडवाखालून गेलो आहे,’ ही फुशारकी मारण्याचा हक्क प्राप्त करून घेतला. ठिकठिकाणच्या लग्नाच्या मेजवान्या झोडून झोडून कंटाळलेली व-हाडी मंडळी ढेकर देत स्वस्थ पडली. केशरभात, बासुंदी, पुरी, बेसनाचे लाडू खातखात त्यांच्या मसाल्याचा हाताला लालेला खमंग वास घेत घेत कित्येकजण मेजवानीच्या थाटाची आणि व्याह्याच्या आग्रही स्वभावाची तारीफ करीत भाटांप्रमाणे घरोघरी पुराणे सांगत फिरत आहेत. कित्येक मध्यस्थ ‘लग्नाचा सौदा’ – नव्हे, ‘लग्नाचा योगायोग’ जुळवून आणण्यात यशस्वी झाल्यामुळे ‘नको नको’ म्हणत असताही दोन्ही बाजूंच्या सोय-यांनी आहेर केलेली पागोटी-उपरणी अंगावर घेऊन मिरवू लागले. कालच्या कारट्या आज ‘माझी बाई ती’ झाल्या. कालच्या कुमारिका आज खाली मान घातलेल्या सासुरवाशिणी किंवा वरमानेच्या पट्टराण्या झाल्या. मुलीची धोंड मानेवर बाळगून बाळगून वाकलेल्या बापाची पाठ आज ताठ होऊन, ते वर मानेने चार जौघांत हिंडू फिरू लागले. बगी ‘उजवली’ म्हणून तिची आईसुद्धा आजपासून ‘उजळमाथ्याने’ तांदळाचे चार दाणे ओच्यात घेऊन देवळांत जाऊ लागली. दाणेवाले, कापडवाले, सोनार, पटवेकरी, उपाध्ये, भटभिक्षूक, ताशेवाले, बँडवाले, वाजंत्री, नळेचंद्रज्योतीवाले झाडून सारे