कुमारिकांचे शाप

प्रबोधनाचा बेलभंडार उचललेल्या प्रबोधनकारांनी हुंडा प्रथेविरोधात मुंबईत मोठी चळवळ उभारली. यादरम्यान बंगालमध्ये हुंडाबळीची एक घटना घडली. त्यानिमित्ताने प्रबोधनकारांनी त्या दुर्देवी महिलेची हृदयद्रावक गोष्ट कुमारिकांचे शाप मधून समाजासमोर मांडली.

श्रीमंत नामदार सर गंगाधरराव माधवराव चिटणवीस के. सी. आय ई. महाराज, देवाला फलपुष्प अर्पण करिताना ‘देवा, हे पुष्प तुला वाहण्याची मला परवानगी देतोस का?’ असे भक्त काही देवाला विचारीत नाही. त्याचप्रमाणे मोठ्यांचा मान करणे, वंदनीयांना वंदन करणे आणि श्रेष्ठांना आपली कृती मग ती लहान असो किंवा बिनकिमतीची का असेना – भक्तीभावाने अर्पण करणे, यात त्यांची परवानगी कशाला घ्यायची? ग्रंथार्पण करण्यापूर्वी तो करताना परवानगी घेण्याचा संप्रदाय आधुनिक आहे. मला त्यात काही तथ्यांश दिसत नाही. आधीच चिटणविसांचे घराणे अलौकिक बुद्धिमत्ता, निःस्सीम स्वराज्यनिष्ठा, अभूतपूर्व स्वार्थत्याग या बाबतीत महाराष्ट्राच्या इतिहासात गाजलेले आहे. छत्रपतींचे चिटणीस, महाराष्ट्राचे आद्य बखरकार आणि मुत्सद्दी ही कीर्ती यावच्चंद्रदिवाकरौ महाराष्ट्रीयांच्या हृदयांत कौतुकाच्या उर्मी उठविल्याशिवाय खास रहाणार नाही. राष्ट्रीय बाबतीत काय किंवा समाजिक बाबतीत काय चिटणवीस घराणे हे नेहमीच अग्रेसर असते. या लौकिकाला अनुसरून आपण आपल्या चिरंजीवाचा विवाह करताना आपले सन्मान्य व्याही रायबहादुर भाईसाहेब गुप्ते यांच्यापासून मुलीच हुंडा न घेता जे स्तुत्य व अनुकरणीय उदाहरण घालून दिले, याबद्दल मलाजो आनंद झाला, त्याचे दृश्य फळ म्हणून हे छोटेखानी पुस्तक, आपली परवानगी न घेता, अत्यंत आदराने व नम्रतेने आपणांस अर्पण करीत आहे, त्याचा स्वीकार व्हावा.

आपला नम्र सेवक केशव सीताराम ठाकरे २० मिरांडाची चाळ, दादर – मुंबई ता. २८-२-१९

पुरवणी - ‘‘कुमारिकांचे शाप’’ दादर ता. २८-२-१९१९ हुंडा राक्षसाने घेतलेला ताजा बळी प्रस्तुत पुस्तक जाहीर केल्याप्रमाणे आजच प्रसिद्ध व्हायचे, परंतु आजच्या इंदुप्रकाश पत्रात, ‘‘एक तरुणाचा आत्मयज्ञ’’ झाल्याची हृदयद्रावक बातमी वाचताच, एक दिवस प्रकाशनाला उशीर झाला तर आमचे सहृदय वाचक रागावणार नाहीत अशा उमेदीने, त्या ताज्या आत्मयज्ञाची – हुंडा राक्षसाने घेतलेल्या ताज्या बळीची – हकिकत कुमारिकांच्या शापांना पुरवणी म्हणून अगदी आयत्यावेळी दाखल करणे आम्हाला अवश्य वाटले. पुस्तक एक दिवस उशीरा प्रसिद्ध होत आहे त्याबद्दल आश्रयदात्यांनी आम्हाला क्षमा करावी. यशवंत शिवराम राजे मुंबई – इंदुप्रकाश, शुक्रवार, ता. २८ फेब्रुवारी १९१९ एका तरुणाचा आत्मयज्ञ [न्यू टाइम्स – कराची व लीडर अलाहाबाद ता. २६-२-१९ वरून] ‘‘शिकारपूर येथील एका २५ वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केल्याची एक हृदयद्रावक हकीकत कराचीच्या ’न्यू टाइम्स’ पत्राने प्रसिद्ध केली आहे. एका वधूबरोबर त्या तरुणाचे लग्न व्हावयाचे होते. त्या लग्नातत्याचे आईबाप वधूपक्षाकडून हुंडा घेण्यास प्रवृत्त झाले होते व ही गोष्ट त्या तरुणाला मुळीच पसंत नव्हती. मुलाच्या सात्विक इच्छेकडे दुर्लक्ष करून त्याचे आईबापांनी ही हुंड्याची अमानुष चाल प्रचारात रहावी म्हणूनच की काय, आपल्या मुलाच्या लग्नात हुंडा घेण्याचाच निश्चय केला. आपल्या समाजाला व देशाला विघातक असणारी ही चाल आहे, असे या तरुणाचे प्रामाणिक मत होते, यामुळे या अनिष्ट रूढीला मान वाकविण्यापेक्षा आत्मयज्ञ करावा, असे नाइलाजामुळे त्याने योजिले असे दिसते. हुंडा घेऊन लग्न करण्यापेक्षा मृत्यू बरा, हा त्या तरुणाचा निश्चय स्तुत्य होता, असे आम्ही म्हणू. परंतु २५ वर्षांच्या तरुणांना अशा प्रसंगी आत्महत्येशिवाय दुसरा व्यवहार्य असा कोणता मार्ग मोकळा आहे, ह्याचा निर्णय व्हावा, अशी आमची इच्छा आहे. असले स्वार्थत्यागी तरुण समाजात उपयुक्त सुधारणा घडवून आणण्याकरिता पुढे आले पाहिजेत.

आपल्या सुशिक्षित मुलांची लग्ने हा एक नफ्याच्या व्यापार आहे असे ज्या बापांना वाटते त्यांना ‘मॉडर्न रिव्ह्यू’च्या संपादकांनी सन १९१५ च्या मार्च महिन्याचे अंकात पुढील उत्तर दिलेले आहे - ‘‘We do not want Shylocks like you to be the fathers-in-low of our daughters. We can afford to wait till we fiad more highminded and gentlemanly people