खरा ब्राह्मण: Page 10 of 36

खबरदार’ म्हणत आडवे होतात. ) भडाग्नी : गिरजाबी, तुम्ही महाराला शिवलात तर शिवलात अन् हा रक्ताभरला हार देवाला वाहण्यासाठी देवळात घुसता? काय हा अत्याचार! चव्हाटे : ब्राह्मणाच्या बाईला तरी हा बाटगेपणा शोभत नाही. चला व्हा मागे---नाहीतर--- गिरजा : नाहीतर? नाहीतर काय? भंपक : हात धरून खाली ढकलून देऊ. देवदेवळे भ्रष्टवण्यापूर्वी बाईमाणसाचा अपमान झाला तरी परवडला. गावबा : गिरजाबाईंचा हात धरणारांची तोंडे तर मला पाहू द्या. थरकत घोडा भडकत निशाण करून टाकतो. गिरजा : गावबा, तू हो बाजूला, मी आहे चांगली खबरदार या भ्याड मांगांना जाब द्यायला. सर्व भट : काय! आम्ही मांग? आम्ही मांग? गिरजा : हो, हो, या रामभक्त विठूबाबाला जखमी करणारे सारे मांग आणि हा खरा ब्राह्मण. या खऱ्या ब्राह्मणाच्या रक्तानं माखलेला हा हार देवाच्या गळ्यात जाऊन पडलाच पाहिजे. चला व्हा दूर. होता की नाही? भंपक : अहो गिरजाबाई, अशा वर्दळीवर येऊ नका. अस्पृश्यांच्या स्थितीबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही, असा का तुमचा समज आहे? फार फार वाईट वाटतं. डोळ्यांतून टिपे येतात; पण करायचं काय? ते आमचे धर्मबंधू त्यांचा आपला देव एकच. अखेर सगळ्यांना एकाच रामरायाच्या पायाशी --- एकाच मसणवटीत जायचं आहे ना? गावबा : मसणातही लेकाच्यानो तुमचा सवता सुभा. ब्राह्मणांची मसणवटी निराळी, ब्राह्मणेतरांची निराळीं आणि अस्पृश्यांची त्याहून निराळी. एकाच ठिकाणी सगळे पेटलात तर काय नरकाला जाल? थरकत घोडा भडकत निशाण. भंपक : अरे, पण सगळ्याच सवलती त्यांना एकदम कशा मिळतील? चव्हाटे : आज हजारो वर्षे चालत आलेला धर्माचार एकदम कसा मोडता येईल? म्हणे म्हार मांगांना देवळात घुसवा. गिरजा : घुसवा म्हणून कोण म्हणतो? पण भक्तिभावानं त्यांनी आणलेला हार सुद्धा देवळात जाऊ नये, हा कुठच्या गावचा धर्म? चव्हाटे : हा पैठण गावचा धर्म, हे पैठण आहे पैठण, समजलात? गिरजा : मी पण पैठणचीच आहे. अन् पैठणकरांचा भ्याडपणा मला चांगला ठाऊक आहे. इमादशाहीचा वाघ तोफलखान आमच्या सरदारांनी पर्नाळ्यात कोंडला नसता, तर पैठणचं आज एलीचपूर झालं असतं. गावबा : आनं तुमच्या टाळक्यावरच्या शेंड्या हनवटीवर उगवल्या असत्या, समजलात? भडाग्नी : पैठणचं एलीचपूर नि देवळांच्या मशिदी होईपर्यंत तरी आम्ही अस्पृश्यांना देवदेवळांचे हक्क देणार नाही. गिरजा : मुसलमानी तुमच्या उघड्या डोळ्यांसमोर देवळे जाळलीं न् मूर्ति फोडल्या--- भंपक : तरी आम्हाला पत्करतील. पण अस्पृश्याचा नुसता हार देवावर पडलेला नाही आम्हाला खपायचा. [सरदार एकनाथ प्र. क.] एकनाथ : (गिरजेला) फिरा पाहू मागं. क्षेत्रस्थ महाजनांशी असं वर्दळीवर येऊ नये. त्यांच्या संरक्षणासाठीच ना आम्ही तळहातावर शिरं घेऊन मोहिमा झुंजवतो? देशातल्या लढाऊ तरुण पिढीच्या आहुति देऊन, परचक्रांच्या चढाया उधळून लावतो? ब्रह्मकर्मांच्या जोडीनेच क्षात्रकर्माची शिकस्त करतो? असल्या धर्ममार्तण्डांची अवहेलना करून का अस्पृश्यांच्या उद्धाराचा प्रश्न सुटणार आहे? चला, फिरा मागं. आधी विठूबाबाच्या जखमेचा बंदोबस्त करूया – कुठं आहे विठऊ. (विठूजवळ जातात.) विटोबा, विठ्ठला --- विठू : कोण? सरदार एकनाथजी? मायबाप जोहार, सरदार, माझा रामराया—राम—रामजी (रडू लागतो.) एकनाथ : [त्याला उठवून पोटाशी धरतो] विठोबा, विठूबाबा, आजच तुझ्या समाचाराला विठ्ठलवाड्यात मी येणार होतो. विठोबा, हिंदुधर्मावरील गंडातर टाळण्यासाठी परनाळ्याच्या मोहिमेत मेलो तो एकनाथ ब्राह्मण, नि तुझ्याजवळ आलाय, तो विठू वेसकराचा मर्द रामजी महार. विठू : देवा माझ्या रामानं माझ्या महार समाजाचं तोंड उजळ केलं. माझ्या घराण्याचं नाव राखलं. एकनाथ : रामजीनं क्षात्रकर्माची कमाल केली. मर्दुमीची शिकस्त केली. अखेरपर्यंत माझ्या उजव्या बाजूलाच तो सारखा लढत होता. तोफाच्या घडेबाजीनं किल्ल्याचा दरवाजा फोडून आम्ही आत घुसलो नि तोफलखानाला गिरफदार करण्याचा मुकाबला चालू असतानाच, गनिमाच्या एका फलटणीनी बंदुकांची फैर झाडली. त्यात आपला रामजी गारद झाला. देशधर्म देवासाठी त्यांन आपल्या जिण्याचं