खरा ब्राह्मण: Page 9 of 36

मारलं, त्या मेल्याच्या हाताचे कोळसे होतील. विठू : बये बये, कुणाला शाप देऊ नकोस. माझ्या रामजीनं लढाईत रक्त सांडून पैठणच्या देवदेवळांचं न् हिंदु धर्माचं रक्षण केलं. या विठ्यानं आपल्या अडीच कोट जातभाईंच्या वतीनं, रामरायाला रामनवमीचा फुलवरा चढवताना हा पाहिलास हार-माझ्या सीतेन् मुद्दाम गुंफलेला हार- माझ्या रक्तानं कसा लालेलाल रंगला आहे तो! गिरजा : अगंबाई! साराहार रक्तानं माखलाय. विठू : बये, महार भंगला, पण माझ्या पोरीचा हा हार नाही भंगला. लालेलाल रंगला. गिरजा : पण तुम्हाला मारलं कुणी? ही जखम कशानं झाली? सांगा सांगा – मला घेऊ येऊ लागली. नाही हा रक्ताचा पाट आता मला बघवत. (डोळे मिटते.) विठू : [खेदयुक्त विकट हास्य] आज शेकडो वर्षे पांढरपेशांनी आम्हाला जनावरासारखं राबवून, काळाजाला पाडलेल्या शेकडो जखमांपेक्षा, गिरजाबाय, ही जखम तुला तकी भयंकर वाटते? अगं आहे काय या जखमेत – हिच्यामुळं कदाचित फार तर मी मरेन -- गिरजा : विठूबाबा, असं बोलू नका. शपथ माझ्या गळ्याची. विठू : एक विठ्या म्हार मेला, म्हणून अस्पृश्यता थोडीच मरणार आहे! एरवी तरी आम्ही जिते मेले सारखेच नव्हत का? बये, रामदर्शन आम्हा पाप्यांना नाही तर नाही, पण म्हाराचा हा निष्पाप हार दिखील रामरायाच्या चरणावर जाऊन पडायला नापाक ठरला अं? गिरजा : हा हार रामरायाला का वाहायचा आहे? द्या, आत्ता मी देवळात जाऊन वाहून येते. [हार घेते.] विठू : (तिला अडवीत) नको नको माझे बये, या हाराच्या पायीं हा महार जखमी झाला. नको बये तू या धाडसात पडू. गिरजा : यात कसलं आलंय धाडस? आत्ता मी हा हार देवाला वाहून परत येते. कोण मला मज्जाव करतो, अन् माझ्या अंगावर हात टाकतो, ते मी पाहून घेईन. [आत भडाग्नी प्रभृती - ‘‘ए केरोबा कळसुत्र्या, ए नारोबा मळसुत्र्या, अरे रांडलेकांनो देवळातले तुम्ही बडवे ना? बाहेर या बाहेर या.’’ उत्तर ‘‘आलो हो आलो’’] विठू : गिरजाबाय, ऐकलीस या भुतांची आरोली. पाया पडतो. तू देवळात जाऊ नकोस, रंजल्या गांजल्यांच्या काकुळतीच्या किंकाळ्या वेळी देवळाच्या दगडी तटांना आरपार फोडतील, पण या भटांच्या पाषाण हृदयाचा पापुद्रासुद्धा हादरणार नाही बरं. बये, थांब, जाऊ नकोस पुढं. गिरजा : [पायऱ्याकडे जाताना] मी जाणार. ही मी चालले. देवदर्शनासाठी तळमळमाऱ्या भक्ताच्या रक्तानं माखलेला हा हार – [भडाग्नी, चव्हाटे, भंपकराव, केरोबा व नरोब प्र. क.] सर्वजण : देवळाच्या पायऱ्या चढू देणार नाही. गिरजा : आSस्सं! विठूबाबाला जखमी करणार चांडाळच का मला आडवीत आहेत? पद. (राग – शंकरा, ताल – त्रिताल) (ऐसो धीट लंगर.) ऐसि नीच करणि करि मुख काळे । पाशवि चाळे । कुटिल कपट मज ना माने ना माने ना माने ।।धृ.।। रुधिर-कलंकित सुमन-मालिका । श्रीपदिं वाहिन । जनन सफल मम या मानें या मानें या मानें ।।१।। चव्हाटे : गिरजाबाई, पायऱ्या चढू नका. तुमच्यासारख्या आक्रस्ताळी बाईच्या हातून देव देवळे बाटवण्यापूर्वी, आम्ही पैठणकर या पायऱ्यांवर आमचा जीव देऊन. भडाग्नी : नाहीतर, हवा त्याचा जीव घेऊन. खाली उतरा. भंपक : बाईमाणूस पडल्यात म्हमूनच तुमची आम्ही गय करतो. नाहीतर विठ्यासारखी कणीक तिंबवायला कमी करणार नाही. गिरजा : तोफलखानाचा धुव्वा उडवणाऱ्या सरदाराच्या या पत्नीवर हात तर उगारून पहा --- विठू : (त्वेषाने) त्या हातांची खांडोळी करून कोरड्या भाकरीशी खाईन. (भट दबतात.) गिरजा : या मर्दांची कणिक तुम्ही तिंबवणार? हा एकटा सगळ्या पैठणची मसणवटी करायला समर्थ आहे. पण बिचारा पडला जित्या आईचं दूध प्यालेला वारकरी. तो तुमच्यासारख्या नेलेल्या मुदर्यावर नाही कधी वार करायचा. ---ही मी अशी हा हार घेऊन देवळात जाणार. (पुढे सरते.) (भट हाताची साखळी करून ‘हां