खरा ब्राह्मण: Page 8 of 36

दे बये वाहू दे, या पापी महारड्याच्या रक्ताचा पाट असाच वाहू दे. सारी दख्खनची जमीन आम्हा महारमांगांच्या रक्तांनी चिंब भिजल्याशिवाय, बये महालक्ष्मी, माणुसकीचं बियाणं इथं नाही रुजणार. जगदम्बे, तुझं रासन्हाणं पुरे होणार नाही अन् आम्हा माणशी जनावरांना माणुसकीनं कुणी करवाळणार नाही! आई-आई, मात्र मी वाचत नाही. पोरी सीते, तुझा मी घात केला. या विठ्या कसायानं तुझा गाईआताचा गळा चिरला. तुला या दगडी काळजाच्या अफाट जगात एकटी सोडून मी जाणार!--- पण सीताबाय, तू एकटीच अभागी नाहीस. तुझ्याबरोबर अडीच तीन कोट अस्पृश्य जीव, माणुसकीच्या पाण्याच्या घोटासाठी शेकडो वर्षं टाहो फाडीत आहेत! – आई, आई, पंढरीच्या विठाई मावली, या विठ्या महाराचा बळी घेऊन ती बये आता सन्तुष्ट हो. आज शेकडो वर्षे – बया – आम्ही अनाथ, दुबळे तुझ्या नावानं धाय मोकलीत आहोत, कशी बये दिलाचे दरवाजे घट्ट लावून तू निधोर बसली आहेस! बयाSS आताकिती अंत पाहणार! आता अखेर झाली. कडेलोट झाली. आमच्या माणशी जनावरांच्या किंकाळ्या ऐक, बया ऐक. जितेपणीच झालो आम्ही ठार – आता उघड बया दार. बयाSS दार उघड. दार उघड बया । दार उघड बया ।।धृ.।। हरिहर तुझें ध्यान करिती । चंद्रसूर्य कानीं तळपती । गगनीं तारांगणे रुळती । तेवीं भांगी भरले मोती ।।बये.।। बया त्वां रणकुण्ड जबढा पसरला । रणवाद्य दुंदुभी दण् दण् दणकला । रथ घोडे कुंजर तुला । तारळे बया अर्पिली ।।२।। रक्त वाहे भडभडा। तेचि तेल तूप जळे धडधडा । पापांचा जुलमी अन्याय-रेडा । शेवटी आहुती घे त्याची ।।३।। (पुजेचे तबक घेतलेली गिरजाबाई कावरीबावरी प्र. क.) गिरजा : (स्व.) कुणाची किंकाळी ही? इथंच कुठं तरी जवळ ऐकू आली. शब्द चांगला ओळखीचा वाटतो. विठू : (शेवटच्या वाताच्या झटक्यात) दार उघड बये । दार उघड बये ।। अलक्षपूर भवानी । दार उघड बये ।। माहुरकर भवानी । दार उघड बये ।। कोल्हापूर भवानी । दार उघड बये ।। तुळजापूर भवानी । दार उघड बये ।। पंढरपूरच्या भवानी । दार उघड बये ।। गिरजा : कोण ते? विठूबाबा, विठूबाबा (हातातले तबक फेकून देऊन जवळ जाते.) काय झाले? विठू : (उमाळ्याने, डोळे फिरले असताना) कोण ते? आहा! माझी महालक्ष्मी आली? विठाई आली? आहाSSS जगदम्बा प्रसन्न झाली । भक्ति कवाडे खडाड उघडली । शंख चक्रांकित शोभली । कोटि चंद्र सूर्य प्रभावे बाळी । एका जनार्दनी माऊली । कृपेची कराया सावली । धावलीस का बये । धावलीस का बये ।।१।। गिरजा : विठूबाबा, मी महालक्ष्मी नाही. मी गिरजा. विठू : माझ्या एकनाथ सरदारांची गिरजा? गिरजा : विठू बाबांची मुलगी गिरजा. गंगेच्या डोहात बुडाली असता जिवाची तमा न करता उडी घेऊन जिला आपण जीवदान दिलंत ती मी तुमची धर्मकन्या गिरजा नव्हे का विठूबाबा? असे डोळे काय फिरवताऩ आन् हा रक्ताचा पाट कसला? [जवळ जाऊन शिवू लागते.] विठू : (दूर सारण्याचा यत्न करतो.) नको नको. गिरजाबाय-गिरजाबाय-नको नको. या विट्या म्हाराला तू शिवू नको. [गिरजा शिवते व त्याचे डोके मांडीवर घेऊन पदराने कपाळाचे रक्त पुसू लागते.] विठू : बये तू रामदर्शनाला आलीस न् कशाला मला अभाग्याला शिवलीस? गिरजा : मला विठूबाबा भेटले-हेच माझं रामदर्शन. (पदर फाडून जखमेवर पट्टी बांधते. रक्त थांबत नाहीसे पाहून) अगबाई! सगळा पदर भिजून चिंब झाला तरी रक्त थांबत नाही – काय करू मी आता! – विठूबाबा काय झालं हे असं?) विठू : गिरजाबाय, हे रक्त नाही. रामजन्माच्या उत्सवाचा हा गुलाल आहे गुलाल. गिरजा : छे! काही तरी सांगता विठुबाबा. कुण्या मेल्या चांडाळानं माझ्या बाबांना