खरा ब्राह्मण: Page 7 of 36

मुंड्या मोडणारे नगरशेट जातात. गोमुखीत हात घालून आनंदी बाजाराची वारी करणारे वारकरी जातात. घरांगना जातात. वीरांगना जातात, वारांगना जातात --- विठू : पण माझा गरिबाचा फुलांचा नुसता हारसुद्धा रामरायाच्या पायापर्यंत जात नाही! तो असा धुळीत पडतो! बापहो, विचार करा --- विचार करा -- भंपक : तुझा हा हार मी असा पायाखाली तुडवून टाकतो. [लाथ वर उचलतो इतक्यात विठू हार उचलून पोटाशी धरतो.] विठू : महाराला तुडवा, पण देवाच्या हाराला तुडवू नका मायबाप. भडाग्नी : किती मदोन्मत्त महारडा हा. दीड दमडीचा हार, पण तो सुद्धा तुडवू देत नाही आम्हाला. विठू : प्राण गेला तरी देवाच्य हाराला कोणाचा पाय लागू देणार नाही. चव्हाटे : म्हादबा, अहो तुम्ही शूर मराठे, वारकरी न धारकरी. महारानं ब्राह्मणांचा अपमान करावा आणि तुम्ही तो उघड्या डोळ्यांनी पहावा? म्हादबा : मैन्दा, बामनांचा पानोतारा करतुस व्हय? ह्या म्हादब्याशी गाठ हई. दण्डुक्यानं टक्कुरं फोडीन. टाक त्यो हार खाली-टाक-टाक- विठू : महार खाली पडेल, पण हार पडणार नाही. भडाग्नी : ब्राह्मणाची निंदा? म्हादबा, पाहता काय, तुडवा—लोळवा— भंपक : ठोका जमीनदोस्त करा. चव्हाटे : म्हादबा : (स्व.) काय करावं इचिभन! बामन सांगत्यात! ठोकतोच या म्हारड्याला. [म्हादबा काठीचा तडाखा मारून विठूला घायाळ करतो. कपाळावर मोठी जखम होते. ‘‘अयाई’’ करीत रक्तबंबाळ विठू झीट येऊन पडतो. सर्वजण घाबरतात. ब्राह्मण दुरून विठूची पाहणी करतात.] चव्हाटे : कायहो म्हादबा, हा काय अनर्थ केलात? म्हादबा : म्हजी? चव्हाटे : असे म्हजी म्हजी काय करता? वेसकर म्हाराचा खून. प्रकरण फार जड जाईल म्हादबा. गावबा : बामनं काय म्हनत्यात म्हादबा? म्हादबा : अब असव्ह काय करता बामनानू. तुम्ही समदं म्हंगालात ‘‘ठोका येला.’’ म्हून म्या ठोकला. गावबा : त्यात तो मेला. आता सुळावर कोण चढणार? म्हादबा का बामनं? भंपक : म्हणजे? विठू महार मेला का काय? गावबा : ठार मेला. गार झाला. भंपकराव, महार मेला, विटाळ गेला. खुशाल आता सगळे घरी जाऊन पुरणपोळ्यावर उपास सोडा. गंगेवरच्या प्रायश्चित्ताची आता गरज नाही. अखेरच्या प्रायश्चित्तासाठी चावडीवर जाऊन मी या खुनाची वर्दी देतो. म्हादबा, बामनं का म्हनत्यात? संभाळून असा. थरकत घोडा भडकत निशाण. (जातो.) भंपक : या अनाडी मरगठ्यानं केला खून. जाईल आता राण्डलेक सुळावर. भडाग्नि, चव्हाटे, चला. या म्हादबाच्या नादाला लागून धर्म करता कर्म पाठीस लागायचे.चला (जातो.) चव्हाटे : या विकत श्राद्धाचं फुकट तर्पण करतो कोण लेक. [भडाग्नीसह जातो.] म्हादबा : (स्व.) लइ वंगाळ झालया. आSSर जानविच्यानू. पावण्याच्या टाळक्यान् इचू ठेचुनशान पलता व्हय? आता मला उमगला तुमचा कावा. भावावर भाव घालून, उलटा हे. चोर साव म्हून गावामदी फिरत्यात. गावातल्या समद्या भानगडी ह्येच ह्येच करत्यात, आन् म्हराट्यावर म्हराटा न्हायतर म्हार घालून, दानं टाकून कोंबड्याच्या झुजा खेळतात. आन् सवता मातूर झटाक् उपरणं झटकून फटाक् निसटल्यात. पन म्हंगावं, आता या म्हादबा पिळवण्याशी गाठ हाई! आक्षि तरकातल्या उसापरमान पिळूनशान चिप्पाSSडं करतो या समद्यांची. (तडफडत जातो.) विठू : (अर्धवट सावध होतो) आई-आई-कुठं आहे मी. आई-पंढरीचे विठाबाई-बये, तुझ्या नावाची माळ घातली, सारा भरिभार तुझ्यावर टाकला. सारी हयात तुझ्या पायाची भक्ति केली. जोगवा मागितला. पायी वाऱ्या केल्या. अखेर बया माझ्या संसाराच्या कवड्या झाल्या! दहा वर्षं झाली. महारवाड्याच्या आगीत जन्माची सोबतीण जळून मेली. तरी, एकुलत्या एका पोराच्या संसाराकडं पाहून आनंद मानला. तोही माझा रामजी-रामजी-देशधर्म देवासाठी-परवा-लढाईत मर्दाच्या मरणानं मोक्षाला गेला. माझी अश्राप पोर सीता, बये, रंडकी झाली. तिचे चुडे वाढवून तुला भरले न् तिच्या कपाळाच्या कुंकवानं, बये, तुला घवघवीत मळवट भरला! [जखमेच्या रक्तानं भरलेला हात पाहून] घाव मर्मी बसला! अबबब, रक्ताचा पाट थांबत नाही. वाहू