खरा ब्राह्मण: Page 6 of 36

ब्राह्मणांनी हातात घ्यायचा? भडाग्नी : महत्पाप महत्पाप! अब्रह्मण्यं. गावबा : बामनं तेवढी रामपात्र, बाकीचे तुम्ही सगळे शौचपात्र. पटतं का पाटील तुम्हाला? म्हादबा : बामनं बोलत्याती गावबा. करायचं काय! यदाज्ञा म्हणजे देवाज्ञा. गावबा : (स्व.) तुझ्या अकलेला झाली खरी देवाज्ञा. विठू : मायबाप, महाराजा विटाळ असला, तरी त्या हाराला कसला देवा विटाळ? देवाघरची मुलं, तशी हो मोगऱ्या गुलाबाची पाक फुलं, मुलाफुलांना, मायबाप कसली जातपात, विटाळ न् चाण्डाळ? गंगामाईचं पाकपाणी, देवावर घालावं, अठरापगड जातींनी घ्यावं, आन् जीवन्मुक्त व्हावं. चव्हाटे : महारडा तर महारडा अन् आम्हाला ज्ञान शिकवतो? थोबाड फोडीन--- (अंगावर धावून जातो.) गावबा : (त्याला अडवून) हां हां हां शास्त्रीबुवा. थोबाड फोडाल तर विण्टाळ होईल, आन् सारा गंगेचा ङाट विटाळ्या शास्त्र्यानी भरून जाईल. थरकत घोडा भडकत निशाण. म्हादबा : बामनास्नी गिन्यान शिकावतू? आर ह्यो मनुक्षे मुंजूबा का म्हसूबा? विठू : मायबाप, मला वेसकराला कसलं आलंय ज्ञान. तुम्हा संताचे चार उष्टे बोल पडतात कानावर, इतकंच. म्हादबा : बामनावानी सुपास्ट बोलनं घावलं, म्हंजी काय बामनाची अकूल येताया व्हय! मुर्दाड खावा खावूनशान ही म्हारं लई मुर्दाड झाली पघा. विठू : मायबाप, मुर्दाड जन्माच्या मुर्दाड पापानं देवदर्शनाला मुकलो. पण गंगेवाणी निर्मळ फुलांचा हा हार तरी माझ्या रामरायाला पडू द्या कि मायबाप. महाराचं पाप हाराला का चिकटवता? चव्हाटे : महाराचा हार देवाच्या पायावर? भडाग्नी : देवळाच्या पायऱ्यावर नाही पडायचा, तर देवाच्या पायावर? पाजी. गावबा : पाजी नाही तर काय. देवाच्या गळ्यातला हार घटकेच्या आत, आनंद बाजारांतल्या गमनाजी जमनाजीच्या बुचड्यावर चढेल. पण महाराचा हार? थरकत घोडा भडकत निशाण. भंपक : ए गावबा, बस कर तुझा तो थरकत घोडा भडकत निशाण. आज देवळात हार गेला, उद्या महार जाईल. मंदिर-प्रवेश मिळाला की भोजनाच्या पंक्तीचा हट्ट न् पाठोपाठ लग्नासाठी आमच्या पोरींचा हात धरतील घट्ट. म्हादबा : बामना अदुगर म्हर्राठ्यांच्या पोरीवर टाकत्याल ही म्हारं हात --- भडाग्नी : आणि सनातन धर्माचे पडतील बत्तीस दात. गावबा : लग्नासाठी हात धरायला ब्राह्मण मराठ्यांच्या मुली म्हणजे मण्डईत मांडलेल्या कोंबड्या का लिलावातल्या हण्ड्या बांगड्या? हवी त्याने हवी ती उचलावी व लम्बे करावी. भंपकराव, तोंड आहे का घोड्याचा तोबरा? विठू : (गावबाला) मायबाप, या अभागी महारासाठी कशाला येता यांच्याशी वर्दळीवर. भंपक : महारड्या, तोंडाशी तोंड कशाला देतोस? गावबा : तोंडाला तोंड देण्याची तुमची रामपात्रे फुलपात्रे आनंदी बाजारात आहेत. हे या शौचपात्राला काय माहीत? हा महारडा! थरकत घोडा भडकत निशाण. चव्हाटे : त्या पाजी एकनाथाच्या पाठबळानं ही म्हारडी अलीकडं फार शेफारली. विठू : का उगाच सन्ताची निंदा करून जीभ विटाळता मायबाप. भडाग्नी : संत? तू संत का तुझ्या एक्या संत? विठू : आपण सगळे आमचे संत. तुमच्याशिवाय आमचा उद्धार कोण करणार? मायबाप, आम्ही हीन दीन दुबळे. जन्माचे अडाणी. पंढरीरायाचे माळकरी. हिंदुधर्माचे कडवे अभिमानी. शेकडो वेळा आमच्या तरण्याजवान महार-मांग बाण्डानी समरांगणावर प्राण देऊन, हिंदू धर्म राखला. नुकताच या अभागी विठ्यानं आपला पोटचा गोळा रामजी परनाळ्याच्या लढाईत बळी देऊन, स्वतःचा निर्वंश करून घेतला, मायबाप, आपण आम्हा दुबळ्यांचे धर्मबंधू, मग आमचा इतका तिटकारा का करता देवा? आम्हा रक्तपित्यासारखं का वागवता? आम्ही माणसं आहोत. आम्हाला थोडं माणुसकीनं वागवा. यापेक्षा अधिक आम्ही काही मागत नाही. देव सगळ्यांचा एकच. तुम्ही सगळे भाग्यवंत देवळात जाऊन देवाचं दर्शन घेता. त्याच्या भजन-पूजनाचा आनंद लुटता - भंपक : म्हणजे तुला काय देवळात जाऊ द्यायचा? विठू : कोण म्हणतं तसं मायबाप. गावबा : अरे बाबा, या देवळात लूत झालेली कुत्री-मांजरं जातात. घाणेरड्या रोगांनी सडलेले शेकडो संभावित जाता. मुंग्यांना साखर चारून माणसांच्या