खरा ब्राह्मण: Page 5 of 36

न हार घेतला. (विठूच्या अंगावर धावून जातो.) गाढवाच्या लेका, महारडा कारे तू? लाज नाही वाटत? विठू : जन्माची नि जातीची कसली लाज? जोहार मायबाप जोहार, सूर्यवंशी रामाजी बाजीचा मी महार, तुमचे गावचा वेसकर खबरदार, धन्याच्या रजेने सारा कारभार, करतो की जी मायबाप. भंपक : चुलीत गेला तुझा मायबाप, मसणातल्या म्हसोबा हे आधी सांगायला तुझं तोंड काय हुण्डलं होतं? गावबा : आणि भंपकराव, तुमच्या डोळ्यावर सडक्या रताळ्याचा कीस बांधला होता, कुझक्या भुइमुगाची भगर थापली होती, का नासक्या केळ्यांची लोंगरं लटकली होती हो? थरकत घोडा, भडकत निशाण. भंपक : गावबा, तू सुद्धा उलटलास कारे? गावबा : उलट्या जगात उलटू नको, तर काय सुलटा चालून सालटे सोलवून घेऊ? थरकत घोडा भडकत निशाण, भंपकरावांची दाणादाण. भडाग्नी : चला गंगेवर जाऊन प्रायःश्चित्त घ्या. चव्हाटे : सचैल स्नान करून पंचगव्य घ्या, जानवे बदला --- गावबा : शेंड बदला -- चव्हाटे : अन् व्हा मोकळे. गावबा : चला गंगेवर नेऊन गंगाराम न्हाव्याकडून सक्षौर मोकळे करवतो. उपासाच्या दिवशी भरल्या पोटी विटाळ झाला. आधी चांगली खळखळून बस्ती घ्या. नाही तर धोब्याच्या भट्टीत कोठ्या धुवून आणा. विठू : मायबाप, मी पंढरीनाथाचा माळकरी आहे. शाकाहारी आहे. तुमच्यासारखा तुमच्याइतका स्वच्छतेनं राहतो. मग माझ्या नुसत्या हाराचा स्पर्श तुम्हाला कसा बाटवतो मायबाप? भंपक : स्पर्शच काय, नुसती सावली नाही आम्हाला खपायची म्हारड्या. गावबा : आमचा हिंदुधर्म फार उदार! फार मोठं पोट त्याचं! असंच ना हो भंपकराव? म्हादबा : आरं टाळमाळीच्या, म्हर्राट्याना न्हाय तुझी सावली खपायची तर बामनांना रं कशी खपनार मैन्दा? गावबा : अहो म्हादबा पाटील, तुमच्य गेनबाच्या भआगवत धर्मात तर जातपात नि विटाळ मानीत नाहीत. ज्याच्या हाती टाळ, त्याचा फिटला विटाळ, मग आताच तुम्हाला कसा विटाळाचा पान्हा फुटला हो? म्हादबा : इण्टाळ हाय न् न्हाय. धर्मांत मस्स लिवलय. पन बामनं काय बोलत्याल? गावबा : बामनं काय बोलत्याल! पंढरीचे टाळकुटे न् गंगेतले गोटे, छान जमले साटेलोटे! बामनं काय बोलत्याल! भंपक : म्हादबा पाटील, तुझ्यामुळं राण्डलेका या क्षेत्रस्थ पंडितावर आंघोळीची पाळी आली. (एक फकीर आत दोहा ललकारतो.) जिन आपकू धोया नहीं । तनमनसे खोया नहीं मनमैल को धोया नहीं । आंघोल किया तो क्या हुवा ।। अल्लाके प्यारे । तेरे नगरीमें बोलता है कौन ।। भडाग्नी : (बिकट हास्यमुक्त थट्टेने) आंघोल किया तो क्या हुवा! (चव्हाटे हास्याचा दुजोरा देतो.) गावबा : अहो भडाग्नी, अहो चव्हाटे, ‘मनमैलको धोया नहीं. आंघोल किया तो क्या हुवा’ कळतं का काही कळतं? चव्हाटे : महिन्या महिन्यात यांची न् पाण्याची भेट नाही नि म्हणे आंघोळ किया तो क्या हुवा. म्हादबा : आसं कवा झालया राव. अंगोळी धवल्या बिगार कन्दि कोन सूद झालाया? बामनं काय बोलत्याल? भडाग्नी : हे फकिरी तत्त्वज्ञान ब्राह्मणाला काय होय! भंपकराव भोजने स्नान करून प्याश्चित्त घेत नसाल, तर वाळीत पडावं लागेल. चव्हाटे : हे पैठण आहे पैठण, समजलात? गावबा : वाळीत पडावं लागेल, काळीत रहावं लागेल, जाळीत बसावं लागेल. विचार करा. थरकत घोडा भडकत निशाण. चव्हाटे : महाराला शिवलात. महार झालात. आता कोण तुम्हाला ब्राह्मण मानणार? गावबा : अहो चव्हाटे, ब्राह्मण महाराला शिवला तर तो महार होतो. पण महार जर एकाद्या ब्राह्मणाला शिवला तर तो ब्राह्मण होईल का हो? चव्हाटे : आचन्द्रार्क असं घडणार नाही. म्हादबा : असं कसं घडल गावबा, आसं कसं घडलं. याद काय लिवत्यात. बामनं काय बोलत्यात. चव्हाटे : एकाच धातूची निरनिराळी पात्रं असली तरी रामपात्राची योग्यता कुणी शौचपात्राला देत नाही. हा विठ्या-महार, म्हणजे शौचपात्र. त्याचा हार