खरा ब्राह्मण: Page 33 of 36

ही किंकाळी? काहीतरी दगा दिसतो. गावबा धाव धाव. गावबा : पाहून घ्या आता या गावबाखानाचा तडाखा. माझा होरा चुकायचा नाही. गिरजा : सीतेचीच किंकाळी ही. (दोघे लगबगीनं जातात.) (दुलीचंद मारवाडी नि भंपकराव भोजने येतात.) मारवाडी : साला येची घरामंदी मिसिलमान बी रेते? भंपक : सगळा भ्रष्टाचार मांडलाय रांडलेकानं! काल सगळ्या महार-मांग-धेडाना श्राद्धाचं भोजन घातलं, नि पितर म्हणून हा एकनाथ त्यांच्या पाया पडला. मारवाडी : अने ते धेडलोगला दिच्छिना बी दिली? अगे बालाजी, बंकटजी, गनछोडगायजी, ए तग धगमला डुबवते साला. भंपक : पाहून घ्या. स्वतःच्या डोळ्यांनी पाहून घ्या. खात्री करून घ्या. आम्हाला सगळ्यांनी ठरवलंच आहे म्हणा कानफाटे. तशात आम्ही तुम्हाला चिथावलं, असा नसता आरोप नको बुवा आम्हा गरिबांच्या माथ्यावर, पैठण म्हणजे दक्षिणेतली काशी-- मारवाडी : तिला ए हिकनाथ देते फांसी. भंपक : अशा पवित्र क्षेत्रात असा भ्रष्टाचार होऊ लागला तर सारी दुनिया आमच्या तुमच्या तोंडात—काय हवे ते घालील. मारवाडी : घालेल घालेल – मूमंदी शेन घालेल. भंपक : तर मग या बाटग्याला पैठणातनं नको का उखडन टाकायला? विचार करा, तुम्ही तर आमचे पुढारी-नगरशेट-सारा व्यापार तुमच्य हातीं. धर्माचे तुम्ही कट्टे कैवारी. तुम्हीच मनावर घेतलं नाहीत, तर आम्ही पळीपंचपात्रवाले काय हो करणार? कलियुग् म्हणून पोटाची दामटी चोळीत बसणार! मारवाडी : असे ईसा कसाला घाबरते. तुमी शानालोक काय आमाला खोत्ता सांगते, ए हिकनाथजीणे सम्दा बॉतेगिगीचा बेपाग चालवूनशी हिंदु धगमला ऑग लावली ऑग. भंपक : लावली ना? पाहिलीत ना? मारवाडी : हामसा तो दोका भडकला! भंपक : हां! धर्म भडकला, तरी डोकं भडकू देऊ नका. शीर सलामत तर धर्म पचास. डोक्याचा धर्मच धर्माचं डोकं वाचवील. मारवाडी : धगम गेला मंजी काय राला?तमे न हमे? शेटजी ने भटजी? भंपक : ही जोडगोळी हवा तो धर्म पैदा करील. पण टिकली पाहिजे कशी? अश्शी! अगदी कडीत कडी. बोला. पैठणची अब्रू वाचवता, का हा भ्रष्टाचार मेल्या मुदर्यासारखा उघड्या डोळ्यांनी पाहता? मारवाडी : कसाला पाहेल – कसाला पाहेल. साला ए हिकणाथजीला उखडून टाकेल. भंपक : मग काढा तुमचं उघराणीचं शस्त्र बाहेर नि आणि रांडलेकाची हंडी-मडकी चव्हाट्यावर. मारवाडी : ए भंपकराव, असा नको तू बोल. तेनी तग आमचा सम्दा पीसा कवाच देऊनशी टाकला. भंपक : अहो पण अजून तुम्ही पावती कुठं दिली आहेत? पावतीशिवाय पैशाची फेड कायद्यानं होत नाही. मारवाडी : अगे ते इठू नि गावबा हामसी छातीवग बसला मजी कॉयदा बॉयदा सम्दा— (आत गावबा ओरडतो -- ‘‘जोड्याखाली फटकावतो हरामखोराला’’) मारवाडी : अरे भागो भागो---ते गावबाच हिकडशी आला. बालाजी बंकटजी. (भंपकराव नि मारवाडी पळून जाता. सीतेसह गिरजा प्र.क.) गिरजा : आमच्या बगिच्यात येऊन असला हलकटपणा करायला या मेल्याला लाज कशी वाटली नाही. तुला काही दुखापत तर झाली नाही ना सीताबाई. चांडाळ मेले गावगुंड! तुझ्या अंगावर हात टाकण्याइतका हा केऱ्या कळसुत्र्या पाजी असंल, असं नव्हतं बाई मला वाटलं. मेले देवाचे बडवे म्हणवतात--- (गावबा केरोबाला कान पकडून खेचीत आणतो. तो ओरडत असतो.) गावबा : अन् गावाचे शेतखाने उपसतात. काय बडवे महाशय, देवाच्या काकड आरतीची वेळ नि इकडं कुठं क्कल पाजळायला चुकलात. चोरांनो, पुजारी म्हणून मिरवता, अस्पृश्यांना अन्नदान केलं म्हणून एकनाथजीला महार म्हणता. त्यांना वाळीत टाकण्याच्या खटपटी करता. गंगेच्या घाटावर मुसलमान गुंडाला चिथावून त्यांच्या अंगावर थुंकायला लावता. अन् इकडं गोरगरीब पाक पोरीच्या अब्रूवर धाड घालता. केरोबा : गावबा, कान सोड म्हंजे करतो सगळा खुलासा. गावबा : आधी आठवली अवदसा नि आता करतोय खुलासा. गिरजा : आमच्या बागेत एकटी गाठून, सीतेसारख्या अनाथ अश्राप पोरीवर हात टाकलास? मेल्या