खरा ब्राह्मण: Page 32 of 36

प्रवेशाऐवजी] स्थळ : एकनाथाच्या घराची ओसरी. [स्थिती : पठाचा वेष घेतलेला गावबा एक बाजून येतो नि दुसऱ्या बाजून जातो. पाठोपाठ त्याच्याकडे पाहत गिरजा प्रवेश करते.] गिरजा : हा काय मेला चमत्कार? कोण रे तो. होतोस का नाही बाहेर, का श्रीखंड्याकडून घालू खेटर मारून बाहेर. पैठण क्षेत्राचं अझून काही हिंदुस्थान नाही झालं. श्रीखंड्या-अरे गावबा, मारा रे याला मोजून दहा धक्के नि न्या पकडून तिकडच्या समोर म्हंडे दाखवतील उर्मटाला दौलताबादचा तुरुंग, श्रीखंड्या - गावबा : [प्र. क.] श्रीखंड्या पानी भरता है मायजी. मैं गावबाखान हूं. तशरीफ उठनेके लिय बन्दा एक छोडके दो पावर खडा है, आलेकम सलाम. गिरजा : काय चमत्कार तरी! गावबा, दिसंदीस तू फारच आचरटपणा करू लागलास. गावबा : आचरटपणा हा सध्याच्या युगाचा महिमा आहे. मायजी. त्याशिवाय उगाच का हलकेसलके गावगुण्ड देवकळा पावतात नि रंकाच राव होतात? मला पुरुषोत्तम व्हायचं आहे ज्ञानदेव नामदेवावर ताण करायची आहे. गिरजा : आस्सं! मुसलमान बनून का तू पुरुषोत्तम होणार? गावबा : मी कुठं मुसलमान बनलोय? भलतेसलते आरोप नका करू बुवा. गिरजा : तुला आता मुसलमान नाही म्हणायचं तर काय हिंदू? गावबा : पेहराव बदलला का धर्म बदलता, तर आपल्या विठू वेसकराला मराठे मंडळींनी मराठा मानून, शुद्ध करून, केव्हाच पंक्तिपावन केला असता. राजकर्त्यांचा राजमान्य पेहराव पांघरला म्हणजे काय चमत्कार होतो, माहीत आहे?--नाही?—चालू जमान्यात थोड्याशा बदलान---पगडीपालटानं-चारचौघात मानमान्यता मिळते. नाक्यावरले—चावडीवरले शिपायी मुजरे करतात. अडाणी लोक टरकून दूर होतात. शेकडो नंदी महादेवाच्या गाभाऱ्यावर देवकळा पावतात. असे किती तरी फायदे होतात. गिरजा : हां, अन् उचल्या भामट्यांना राजरोस खिसे कापता येतात-दात काय काढतोस? तिकडून तुला असं पहाणं झालं, तर काय म्हणतील. गावबा : का-ही म्हणायचे नाहीत. बाहेरच्या रंगाढंगावरून अंतर्यामाची किंमत करणारी कोती कावळी दृष्टी स्वामींना असती, तर, मायजी, संत म्हणून एकनाथजींचा डंका काशी ते रामेश्वर झडलाच नसता. गिरजा : अरे, पण आमच्या थेट घरात मुसलमान वावरताना पाहून लोक काय म्हणतील? गावबा : लोक काय म्हणतील! गिरजाबाई, फुकट फुकट स्वामींच्या अर्धांगी झालात! अझून तुम्ही लोकमताला भिताच आं? आमच्या लोकांना खरोखरच काही मत असतं, तर अस्पृश्यतेसारखी बेमाणुसकीची रक्तपिती हिंदुसमाजाला लागलीच असती कशाला? हा महारोग समूळ नाहीसा करण्यासाठी, एकनाथजींनी हातात वीरकंकण बांधलं, ते काय या पिसाट लोकमताची पर्वा करूनच वाटतं? गिरजा : आहा गावबा, तुझ्या वेडाचाराचा राग येतो खरा. पण कित्येक वेळा तुझे हे असले खडे तात्विक बोल ऐकून कौतुक वाटतं. कुठं रे हा इतका शहाणपणा शिकलास? गावबा : शहाणपणाचा गड्डा शहाण्यांच्या पागोटीत, माझ्या खाकोटीत थोडाच असणार? मला सगळ्यांनी ठरवलाच आहे वेडा. ढिल्या डोक्याचा नि ठिसूळ मेंदूचा. अधिक बोलायची मला लायकी नाही. कारण, गावबा म्हणजे पैठणचा सार्वजनिक गाढव. थरकत घोडा भडकत निशाण. गिरजा : ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेनं रेडा जसा वेद बोलू लागला - गावबा : तसा मात्र हा गाढव जुन्या वेदांची रकटी चघळणार नाही हां, ख्याल रखो. माझा खाक्या थरकत घोडा भडकत निशाण. नित्य नवे गावबाला हवे. काल आपल्या घरी श्राद्धाच्या ब्राह्मण भोजनाऐवजी, म्हार-मांगादि अस्पृश्यांना मुक्तेद्वार सुग्रास भोजन घातलं, तुम्ही स्वतः त्यांना पंक्तीत वाढलं-आग्रह केला. त्या बिचाऱ्यांना केवढा बरं आनंद वाटला! एकनाथजींच्या डोळ्यातसुद्धा ब्रह्मानंदाच्या हिरकण्या-कशा चमकू लागल्या-पाहिल्यात ना? रेड्यामुखे वेद बोलाविणाऱ्या ज्ञानोबानीसुद्धा असल्या आनंदाचा हेवा करावा. मग तुम्हीच सांगा. अस्पृश्यांच्या पंक्तीला, जोडीला जोड म्हणून,एकादा वकठलेण्डमुण्डखान किंवा गावबाखान मांडी ठोकून बसला असता, तर काय तुम्ही श्रीखंड्याकडून त्याला गचांड्या दिल्या असत्या? गिरजा : मुळीच नाही. सर्वांभूती सम, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. (लांबून ‘‘धाव धावा, कुणीतरी धावा’’ अशी सीतेची किंकाळी ऐकू येते.) गिरजा : अगबाई! कुणाची