खरा ब्राह्मण: Page 4 of 36

गावबा, अझून तू पोर आहेस. गावबा : पोर? आई म्हणते तू घोडा आहेस. थरकत घोडा, भडकत निशाण, [आत] रघुपति राघव भजन, विठू ताल धरतो.] म्हादबा : त्यो पघा, लई उमाळ्यान् भजान करताया. चला त्येचं दरशाण घेऊ. त्योबि माळकरी अन् म्याबि माळकरी. (‘‘पुण्डलीक वरदा हाS Sरि इण्टाSल’’ म्हणून म्हादबा विठूच्या पायावर डोके ठेवतो. विठू दचकतो. उलट पाया पडतो.) विठू : मायबाप, काय केलंत हे! मी माळकरी खरा पSण ---- म्हादबा : माळकरी म्हंजी सगा. गावबा : (म्हादबाला हळूच) पण जातीचा आहे ना दगा. आता तुमचं तुम्ही बघा. म्हादबा : (गावबाला हळूच) आरं या माळेनं फोडला जातीचा फुगा, ऱ्हा गुमान उगा. भंपक : रामभक्ता, तू धन्य आहेस. विठू : धन्य? मी कसचा धन्य. जन्माला येऊन प्रभू रामरायाचं दर्शनसुद्धा या अभाग्याला नाही. मी कसचा धन्य! भंपक : तू आन्धऴा का आहेस ?(विठू नकारची मान हालवतो) नाही ना ? मग देवदर्शन घ्ययचं तर देवऴात जा. म्हादबा : देवऴात जा. बामनं बोलत्य़ात-देवऴात जा. गावबा : म्हादबा बि म्हंगत्यात, देवळात जा. हूं! थरकत घोडा, भडकत निशाण. विठू : देवळात जाऊ? देवळात कसा जाऊ? भंपक : देवळात कसा जाऊ? वेडाच दिसतो. अरे पायांनी चालत जा. गावबा : नाही तर डोक्यानी चालत जा. विठू : डोकी चालती, तर ही दशा कशाला असती. भक्त असून द्वदर्शनाला नि माणूस असून माणुसकीला मुकलेला मी एक अभागी आहे. मायबाप, गरीबावर थोडी दया करा. रामरायाच्या गळ्यात हा फुलांचा हार घाला. हा कापूर पेटवून देवाला आरती करा, अन् परत येताना देवा ब्राह्मणांचा उरला सुरला प्रसाद घेऊन या. गावबा : (स्व.) भंपकरावाच्या भगदाडातून वाचला तर! भंपक : अगत्य अगत्या. दे तो हार न् कापूर. वाहतो नेऊन देवाला (स्व.) माझी आयतीच सोय झाली. [विठूला शिवून त्याच्या हातचा हार न् कापूर घेतो. इतक्यात भडाग्नी व चव्हाटे देवळाबाहेर येतात व हा शिवाशिवीचा प्रकार पाहून मोठ्याने ओरडतात.] भडाग्नी व चव्हाटे : अब्रह्मण्यम् अब्रह्मण्यम्! हे काय, हे काय! अहो भंपकराव महार, भंपकराव महार! गावबा : भंपकराव महार? – काय झालं हो बाप मेल्याइतकं ठणाण बोम्बलायला? काय देऊन पेटलं, का घराला आग लागली? भडाग्नी : धर्माला आग लावलीन् या भंपकरावान. चव्हाटे : भंपकराव, महाराच्या हातचा हार शिवून घेतलास? भंपक : हा हार महाराच्या हातचा? विष्णवे नमः [हार फेकून देतो. टाणकन् उडी मारून दूर जातो.] काय रे म्हादबा, हा म्हार कायरे? अन् गाढवा, त्याला तू शिवलास? म्हादबा : (स्व.) पंचाईतच झाली! आता कसं करावं (उ.) आSSर इचिभन्! ह्यो कोन म्हार व्हय? गावबा : (स्व.) भटाला बिचकला हा टाळकुट्या! (उ.) म्हार असला म्हणून काय झालं! माळकरी माळकरी सगा. म्हादबा : माळकरी असला म्हून? आम्ही मर्राठं. म्हाराला शिवून काय धरम बुडवायचा? बामनं काय बोलत्याल? धुःत तिझ्या जिंनगानीवर मर्दा. मला इण्टाळ केलास व्हय? भडाग्नी : विटाळ झाला तुम्हाला भंपकराव. रामनवमीचा दिवस – उपवास -- गावबा : आणि भरल्या पोटी विटाळ? थरकत घोडा भडकत निशाण. चव्हाटे : सचैल स्नानाशिवाय तुम्हाला सुटका नाही. ब्राह्मण म्हणवता आणि महाराला शिवता? काय सगळी थट्टा समजता? हे पैठण आहे पैठण. गावबा : गावठम नाही, पैठण आहे, समजलात? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, या संन्याशाच्या कारट्यांना जन्मभर मसणवटी दाखवणाऱ्या धर्ममार्तंडांचं हे पैठण. थरकत घोडा भडकत निशाण. म्हादबा : (स्व.) म्हारडा लइ एडपा. घुसायचं देवळात. कोन वळाकत्? भंपक : म्हादबा, खूप अक्कल पाघळलीत. म्हादबा : म्या काय केलं भंपकराव. भंपक : अकलेच्या कांद्या, सगा म्हणून तू या गाढवाच्या पाया पडलास, म्हणून मराठा समजून याला मी शिवलो