खरा ब्राह्मण: Page 2 of 36

प्र. क्र.]

भडाग्नि : (स्व.) यदन्येषां हितं न स्यात् आत्नमः कर्म पौरुषम् । अपत्रपेत वा येत न तत्कुर्यात कथंचन ।। (उ.) अरेच्चा हा महारडा! शिवशील. दूर हो. राण्डलेकानीं अगदी ताळ सोडला. [पंचपात्रांतले पाणी शिंपडीत] रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे । रघुनाथाय नाथाय-सुळावर चढवले पाहिजे रांडेच्याना. (चरफडत जाऊं लागतो, तोच सीता नजरेला पडते. तिला पाहून स्व.) ही कोण? उत्फुल्ल-कमल-वदन, बिम्बोष्टी, कुंजर-गण्ड-स्थळ नितम्बी, सरोज-नयना! वा! याचं नांव पात्र! नाहीतर आमची! वक्रतुण्ड महाकाय-रघुनाथाय नाथाय सीतापतयेनमः (जातो.) [चव्हाटे शास्त्री पुटपुटत प्र.क.]

चव्हाटे : (स्व.) पुनरपि जननं पुनरपि मरणं । पुनरपि जननी-जठरे शयनम् ।। (उ.) आं! अरे ए धेडा, डोळे आहेत का फुटले? आमचा जाण्यायेण्याचा रस्ता. बटकीच्या, पायरीला अगदीं खेटून उभा आहेस. लाज नाही वाटत. चल हो दूर. (पाणी शिंपडतो.) भजगोविंदम् भजगोपालम् मूढमते. हा सगळा त्या एक्याचा पाजीपणा! गाढवान् सगळा महारवाडा डोक्यावर घेतलाय्. (सीतेकडे लक्ष्य जाताच स्व.) यंवरे यंव! वेलाण्टीनं गोलाण्टी खाल्ली, नाहीतर महारीण होण्याऐवजी महाराणी होण्याच्या लायकीचं पात्र. (उ.) ही कोण रे विठ्या? विठू : जोहार मायबाप. ही दौलताबादच्या रंगनाक सुभेदाराची मुलगी नि माझी सून सीता, मायबाप.

चव्हाटे : तुझी सून? म्हणजे परवा परनाळ्याच्या लढाईत पडलेल्या त्या तुझ्या रामजी पोराची बायको वाटतं?

विठू : होय जी मायबाप.

चव्हाटे : (स्व.) गारगोटीच्या पोटी हिरकणीच म्हणायची! भज गोविंद भज गोपालं मूढमते. (जातो.)

सीता : मामाजी, हे येणारे जाणारे लोक असे काय हो माझ्याकडं रोखून रोखून पाहाताहेत?

विठू : त्यांना डोळे आहेत खरे, पण सारं जग त्यांना उलटं दिसतं. म्हणून ते असे रोखून पाहतात.

सीता : असं होय?

विठू : मुली, तू आता घरी जा. नीट जपून जा बरं. प्रसाद घेऊन आलोच मी पाठोपाठ. मग आपण दोघेजण उपास सोडू हं, जा.

सीता : लवकर या हं अगदी (जाते.) [आत सारंग रागाचे सूर घुमू लागतात व‘‘बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथ-नन्दना’’ हा पाळणा गातात.]

विठू : (स्व.) देवाला पाळण्यात घातला. भाग्याचे भक्त रामरायाला पाळण्यात घालून त्याला झोके देत आहेत. बाळा जोजोरे! देवा रामराया, तुझ्या पाळण्याला झोका देण्याचं तर राहिलंच, पण भाग्यवंतांनी दिलेले झोके, डोळे भरून पाहण्याचं भाग्यसुद्धा आम्हा महारा-मांगांच्या कपाळी नसावं ना?--- तुझ्या दर्शनाला आमचा जन्म आडवा यावा? देवा, तू निर्गुण, निराकार, हीन दीन दुबळ्यांच्या उद्धारासाठी सगुण साकार झालास, तरीसुद्धा तुझं सावळं ढवळं रूप आम्हा अभाग्यांच्या डोळ्याआड केलंस? भगवंता, भाग्यवंतांनी दगडधोड्यांच्या देवळात तुला दडवून ठेवला; पण रामा, आम्हा दीनदुबळ्यांच्या दिलाच्या देवळात तर तू आहेसना! [पुन्हा पाळण्याचे थोडेसे स्पष्ट शब्द, नंतर नुसता तंतुवाद्याचा कोमल ध्वनि, विठू त्या सुरावर डोळे मिटून ताल धरतो.] [भंपकराव भोजने व म्हादबा पाटील प्र. क.]

भंपकराव : (विठूला पाहून) म्हदबा पाटील, याचं नाव भक्ति बरं, वाहवा! भाताला चोपडलेल्या केशरी रंगाप्रमाणं, हा रामभक्त भक्तिरंगात अगदी एकतान रंगला आहे. म्हादबा : माळकरी दिसताया. व्हय, हायेच की त्येच्या गळ्यामन्दि अशी तुळशीची माळ. माळकरी म्हंजी आमचा सगा बरका भंपकराव. मग काय बि भेदभाव न्हाय. जात न्हाय न् पात न्हाय. निवरतीच्या ग्यानबा द्येवान् आमा गोरगरिबांच्या गळ्यामन्दी ही तुळशीची माळ, हातामन्दी भजनाचा टाळ, अन् पायामन्दी चाळ आडकवूनशान लइ उपकार केलाया, पगा, लइ उपकार केलाया.

भंपकराव : ज्ञानेश्वरानी भागवत धर्मचा पाया रचून, ब्राह्मणेतर गोरगरीब जनतेला मोक्षाचा एक नवीन दरवाजा उघडला. म्हादबा पाटील, पूर्वी आम्ही ब्राह्मण मराठ्यांनासुद्धा शिवत नव्हतो, मग पाणी पिण्याची गोष्ट कशाला? पण आता आम्ही खुशाल तुमच्या ओटीवरू बसून पान तम्बाखू फाकतोच की नाही? ही सुधारणा ज्ञानोबांनी केली. फार थोर पुरुष! पुरा अन्तर्ज्ञानी!

म्हादबा : अक्षी बराबर, बामनाचा बोल, कोन करनार त्येचं मोल! ग्येनबा