खरा ब्राह्मण

प्रबोधनकारांचे हे सर्वात गाजलेले नाटक. संत एकनाथांच्या आयुष्यावर बेतलेल्या या नाटकाला काही समाजकंटकांनी प्रचंड विरोध केला. नाटक बंद पाडण्यापासून ते प्रबोधनकारांची अंत्ययात्रा काढणे, घरासमोर मेलेले गाढव आणून टाकणे, घरावर आगीचे बोळे टाकणे असे अनेक प्रकार झाले. पण प्रबोधनकारांनी त्याला भीक घातली नाही. समाजातील सर्वच स्तरांतून या नाटकाला तुफान प्रतिसाद मिळाला.

 

नवी सुधारलेली रंगावृत्ति [सन १९४८]

लेखक केशव सीताराम ठाकरे (प्रबोधनकार)

महाराष्ट्र ग्रंथ भांडार, मुंबई – ४

अल्प निवेदन

खरा ब्राह्मण नाटिकेला प्रस्तावनेची किंवा जाहिरातीची आता काही जरूरच उरलेली नाही. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाच्या इतिहासात या नाटिकेने निर्माण केलेला खळबळीचा एक छोटेखानी अध्याय सर्वश्रुत नि सर्वपरिचितच आहे. श्रीयुत नंदू खोटे यांच्या रेडियो स्टार्स नाट्यसंघाने ता. १२ एप्रिल १९३३ बुधवारी रात्री १० वाजता, मुंबई येथील बॉम्बे थियेटरात, या नाटिकेचा पहिला आणि लागोपाठ दररोज ७५ प्रयोग केले. पुढे पुणे, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी वगैरे महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी रेडियो स्टार्सनी या नाटिकेचे ५०च्या वर प्रयोग केले. शिवाय, गावोगाव अनेक हौशी नटसंघ गेली १२ वर्षे सालोसाल कितीतरी प्रयोग अखंड करीतच असतात. पुस्तकाची पहिली पाचहजारी आवृत्ती आता मिळेनाशी झाल्यामुळे, ही दुसरी रंगावृत्ति छापली आहे. रंगभूमीवर प्रत्यक्ष प्रयोग करताना या रंगावृत्तीचा योग्य तो उपयोग व्हावा, अशी आता मांडणी केली आहे. नर्तिकेच्या पात्राची पुष्कळांना अडचण पडते. म्हणून हिरकणीच्या प्रवेशाऐवजी रंगभूमीवर वठवून पाहिलेले दोन बदलीप्रवेश पुरवणी भागात मुद्दाम छापले आहेत. गावबा नि एकनाथ या पात्रांना दोन तीन नवीन पदे घातली आहेत. केवळ गद्यातच नाट्यप्रयोग करणारांनी पदे गाळली तरी रसहानी कोठेही होणार नाही, असा अनुभव घेतलेला आहे. माझे स्नेही श्रीयुत नंदू खोटे यांनी नुकतीच आपल्या रेडियो स्टार्स नाट्यसंघाची पुनर्घटना केली आणि महाराष्ट्र ग्रंथ-भांडाराचे मालक श्रीयुत शंकर वामन कुळकर्णी यांनी शुद्ध आपुलकीच्या भावनेने प्रकाशनाचे कार्य पत्करले, म्हणूनच ही रंगावृत्ति रसिकांच्या हाती द्यायचा मला योग लाभला. जोशी बिल्डिंग नाट्यरसिकांचा कृपाकांक्षी रानडे रोड एक्स्टेन्शन केशव सीताराम ठाकरे मुंबई नं. 28 रामनवमी ता. १० एप्रिल १९४६ या नाटिकेसंबंधी सर्व प्रकारचे हक्क माझ्या स्वाधीन आहेत. प्रयोग करण्यापूर्वी नाट्यसंघानी माझी लेखी परवानगी मिळविणे अगत्याचे आहे.

- के. सी. ठाकरे

खरा ब्राह्मण नाटिका अंक १ला] [प्रवेश १ ला

[पैठण शहरातील श्रीराम-मंदिरात रामनवमीचा उत्सव. स्त्रीपुरुष व मुले देवळात जात आहेत. बाहेर महाद्वारावर पिठू महार व त्याची तरुण विधवा सून सीता उभी आहेत. नांदी चालू आहे.]

नान्दी. (राग – पिलु, ताल - त्रिताल)

उधळि गुलाल यशाचा ।। खुलविशि । जनमना सतत नवरस- सिंचनी ।।उधळि. ।।धृ.।।

मानव-तनुच्या रंगभूवरीं । हृदयाचे नव पडदे वितरी। रंगवुनी त्या विविध विकारीं। सुत्रधार आत्मा नवलाचा ।।उधळि. ।।१।।

तुडवि विषम कल्पना । बुडवि विफल जल्पना । फुलवि सदय भावना । खुलवि रसिक सन्मना ।। स्फुरवित ममता । पसरित समता । रमाकान्त सेवक रसिकांचा ।।उधळि. ।।२।।

[नांदी पुरी होताच राम-मंदिरात बार होतात, ‘‘त्रिलोक प्रतिपालक श्रीरामचंद्रजीकी जय’’ असा त्रिवार जयघोष होतो. गुलाल उधळला जातो. टाळ्यांचा कडकडाट. ]

विठू : सीताबाय, बोरी, श्रीरामरायाचा जन्म झाला बरं. (देवळाला नमस्कार करतो.)

सीता : (मनस्कार करते.) मामाजी, आज कित्ती कित्ती युगं लोटली कोण जाणं, दरसाSल देवाच्या रामनवमीचा उत्सव होतो. पण दर खेपेला वाटतं, आजच-आत्ताच-रामराय जन्माला आले. असं काहो वाटतं आपल्याला, मामाजी?

विठू : मुली, ज्यांचा आत्माराम जागा आहे, त्यांनाच असं वाटतं बरं. ज्यांचा आत्माराम निजला आहे, त्यांना दिवसा अंधार नि चालती बोलतीजिती माणसं दगडधोंडे वाटतात. [दूर पाहून] अशी बाजूला उभी राहा. ब्राह्मण देवळात जात आहेत. त्यांच्यावर आपली सावली पडेल.

सीता : सावली? सावली तर आपल्या पायाखाली. अन् त्यांच्यावर कुठून पडणार मामाजी? [भडाग्नि बोजवारे गीता पुटपुटत