हिंदुजनांचा –हास आणि अधःपात: Page 10 of 58

झाले की, एकदंर समारंभ पूर्ण आटपेपर्यंत एकसारखे धडधत असत. हे सार्वजनिक त्सवप्रसंग किंवा यज्ञ ही एक आमच्या आर्य पूर्वजांच्या व्यवहारातली अत्यंत महत्त्वाची संस्था होती. या प्रसंगी स्त्रीपुरुष एकत्र जमत, यथेच्छ खातपीत, मनसोक्त रीतीने नृत्यगायन वगैरे क्रीडा करीत, एकमेकांशी शृंगारविलास करीत व अशा अनेकविध आनंदाच्या निमित्तांनी त्या समारंभांत मोठ्या उत्साहाने भाग घेत असत. अर्थातच त्यांच्यामधील वृद्ध मंडळी आपल्या संघाच्या एकंदर स्थितीविषयी त्याचप्रमाणे बाहेरून काही संकटे येण्याचा संभव आहे की काय, असल्यास त्यांचे निवारण कसे करता येईल, वगैरे महत्त्वाच्या गोष्टींचा नीट खल करून आपले पुढील धोरण आखीत असत. राजनीति आणि पक्षभेद ही मानवी समाजाइतकीच पुरातन आहेत. आणि ज्या अर्थी हे समाज दांडग्या लढवय्या लोकांचे संघ आणि त्यांच्या जिंकलेल्या स्त्रिया यांनी बनलेले असत, त्या अर्थी असल्या समाजाचे नेतृत्व राजनीतिकुशल आणि रणशूर योद्ध्यांच्याकडेच असे, यात काहीच नवल नाही. असले उत्सव म्हणजे गायक, कवि, मांत्रिक, वैद्य भविष्यवादी, ज्ञानी, द्रष्टे, तत्त्ववेत्ते त्याचप्रमाणे ताज्या दमाचे तरुण आणि आपल्या सौंदर्याने मोहनी घालणा-या तरुण स्त्रिया यांना स्फूर्तिदायक आनदाच्या पर्वण्याच वाटत असल्यास काय आश्चर्य? असल्या नानिवध चळवळीतूनच वाटेल त्या प्रकारच्या संस्कृती निर्माण झाल्या. यांपैकी हिंदुस्थानातील संस्कृतीने कोणते विशिष्ट वळण घेतले ते आपण लवकरच पाहू. या उत्सवांना व्यवस्थित रूप देण्याकरिता त्यांनी लवकरच काही नियम तयार केले. काही काळाने हेच नियम धार्मिक विधी बनले. त्यांच्यात होऊन गेले मोठमोठे नामांकित पुढारी `देवता’ म्हणून पूजनीय मानले गेले. (`देवता’ याचा अर्थ प्रकाशमान, तेजस्वी एवढाच आहे. `देवता’ म्हणजे देव परमेश्वर असा मुळीच नव्हे.) त्यावेळी प्रचारात असलेली गाणी, प्रार्थना, आकांक्षा, आशा, त्यांचे सोमपानोत्सव यांचे वर्णन त्यांनी ज्या ऋचांत करून ठेवले, त्यांच्या संग्रहाला `वेद’ ही संज्ञा प्राप्त झाली. वेद हे माणसांनीच लिहून ठेवलेले आहेत परमेश्वराचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. आतापर्यंत आर्यांमध्ये विवाहसंस्था निर्माण झाली नव्हती; आणि स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा दर्जा प्राप्त झालेला नव्हता. ज्याप्रमाणे पुरुषांना उपनयनाच्या विधीने द्विजत्वाच्या श्रेष्ठ पदवीला; जाता येत होते, त्याप्रमाणे स्त्रियांना कोणत्याही विधीने पुरुषांच्या बरोबरीची योग्यता प्राप्त होत नव्हती. स्त्रियांना एकाच संस्काराची मोकळीक होती आणि तो संस्कार म्हणजे स्त्रीपुरुष-संयोग हाच. प्राचीन काळच्या इंडोआर्यन समाजव्यवस्थेत स्त्रिया म्हणजे `आव जाव घर तुम्हारा’ असल्या दर्जाच्या राष्ट्रीय मालमत्तेच्या वस्तू मानण्याची अधम चाल होती, असे मानण्याला पुष्कळशी जागा आहे. स्त्रीपुरुषांच्या समान योग्यतेचा जो आज मोठा बोलबाला आपण ऐकतो तो सर्व नव्या युगाचा नवा खेळ आहे. प्राचीन काळात त्याचा मुळीच मागमूस लागत नाही. जंगलात जाऊन शिकार करावी आणि मारलेली जनावरे शिजवून खाण्यासाठी घरी आणून टाकावी, ही पुरुषांची कामगिरी असे. घरचा विस्तव सारखा पेटलेला ठेवणे, आणलेल्या शिकारीचे अन्न तयार करणे आणि तर सर्व गृहव्यवस्था ठेवणे, ही कामे पकडून आणलेल्या स्त्रियांकडून चोपून करून घेण्यात येत असत. मानवी इतिहास म्हणजे एक `झाकली मूठ’ आहे. ती उघडून पाहिली तर सारा विद्रूप आणि विलक्षण शेणसडाच दिसायचा. त्याला नटविण्यासाठी वाटेल तितक्या सोन्याने मढवा किंवा हि-यामोत्यांनी अलंकृत करा. मनुष्याचा पूर्वेतिहास म्हणजे खादाडकरिता पशुंची शिकार आणि पशुंप्रमाणेच स्वतःची विषयसुखसेवनाची धडपड, यापेक्षा अधिक काही नाही असेच आढळून येईल. जो अरण्यात जाऊन जीवावर उदार होऊन पशुंची शिकार करी आणि घरी मुबलक अन्न आणि पाणी आणी तो अर्थातच घराचा मालक-स्वामी, आणि जे घरी स्वस्थ बसून ते अन्न शिजविण्याची व विस्तव पेटलेला ठेवण्याची वगैरे व्यवस्था करीत ते त्यांचे गुलाम. आमच्या अधःपाताचे मुख्य कारण जी विषारी भिक्षुकशाही तिचा मोठा आधारस्तंभ म्हणजे या गुलाम बनविलेल्या स्त्रिया. पंडित उमेशचंद्र विद्यारत्न यांच्या सिद्धांताप्रमाणे आपले हे अर्धवट संस्कृतीचे आर्य मंगोलियात वसाहतीसाठी उतरले असे आपण धरून चालू. या लोकांनी आपल्या गुलाम बायका उत्तरध्रुवाकडील प्रदेशातच टाकून दिल्या. अर्थातच मंगोलियात आल्यानंतर त्यांनी