हिंदुजनांचा –हास आणि अधःपात: Page 9 of 58

ईशान्य व नैऋत्य या दिशांकडे उतरू लागल्या. मृगशीर्ष (Orion) या तारकापुंजाला, विद्वानांच्या मते, त्या काळी अत्यंत महत्त्व असले पाहिजे, व म्हणूनच ही फाटाफूट होण्यापूर्वी, किंवा कदाचित त्याच वेळीही असेल, या तारकापुंजातील वैशिष्टयदर्शक चिन्हे जी कमरपट्टा आणि बाण ती आर्यजातीची एक विशिष्ट खूण किंवा एक प्रकारचा शुभदायी ताईत म्हणून त्यांनी अंगिकारली असावी. आर्यवंशातील या प्रवासी टोळ्यांनी या मेखलेचे जानव्यात आणि बाणाचे हातात धरण्याच्या दंडात रूपांतर केले. हाच आमच्या उपनयन किंवा पैताविधीचा उगम होय. जे जन्मतः ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य असतील त्यांच्यामध्येच हा उपनयनाचा संस्कार रूढ आहे. हे सर्वांना माहीत आहेच. हिंदुस्थानातील भिक्षुकशाही ज्यावर उभारलेली आहे त्याचा हा एक मोठा आधारस्तंभ आहे. म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या उपनयनविधिचा कसा उपयोग करून घेण्यात आला आहे हे लवकरच आपल्या निदर्शनास मी आणणार आहे. पण तत्पूर्वी एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगितले पाहिजे ती ही की, आज या देशात ब्राह्मणधर्म या नावाखाली धिंगाणा घालणा-या, परंपरागत चालत आलेल्या व त्यामुळेच तुम्हाला अत्यंत पूज्य वाटणा-या बिनकाळजाच्या `भिक्षुकशाही’ संस्थेला या निबंधात मी चांगलाच तडाखा देण्याचा प्रयत्न करणार आहे. कमरेचा कमरपट्टा आणि हातात दंड, ही उपनयन विधीची मुख्य चिन्हे, एट्रस्कन, रोमन, इजिपशियन, क्रीटन, ग्रीक इत्यादी प्राचीन लोकांतही दिसून येतात, ही विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे. या लोकांच्या निरनिराळ्या ठिकाणी वसाहती वसल्या. हवा, पाणी, अर्थोत्पादनाची साधने, प्रतिकारार्थ शत्रूंशी करावे लागलेले झगडे, या सर्व भानगडींना तोंड देऊन त्यांनी आपली निरनिराळी राज्ये उभारली. राज्ये अस्तित्वात आली की महत्त्वाकांक्षेचे क्षेत्र विशाळ झालेच. यच्चयावत नागरिक व्यक्तीला लष्करी आटारेट्याचा खणखणाट आणि सांपत्तिक वैभवार्थ उलाढालींचा धडपडाट याशिवाय दुसरी बात माहिती नाहीशी झाली. अर्थात, या गोष्टींपुढे भिक्षुकशाहीप्रणित विकृत धार्मिक कल्पना, भरमसाट पारलौकीक आकांक्षा, कसली तरी जपजाप्ये व चिंतने विधिकर्मे, ही माजी पडून गतीला लागली. प्राचीन असिरियन व बॅबिलोनियन, त्याचप्रमाणे सध्याच्या पारशी लोकांचे पूर्वज, यांच्यामध्ये ही उपनयनाची चाल होती; आणि पारशी समाजात ती अजूनही चालू आहे. हिब्रूंच्याही धार्मिक विधीत तिचा अंतर्भाव झालेला होता. या पारशी आणि हिब्रू समाजात हिंदुंच्यापेक्षाही भिक्षुकशाहीचे प्रस्थ फार माजले होते; आणि त्याचमुळे शेवटी त्यांची फाटाफूट होऊन त्यांची सामाजिक संघटना उद्ध्वस्त झाली. उत्तर ध्रुवाकडील हिमाच्छादित प्रदेशात सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असतो, हे सर्वांना माहीतच आहे. तेव्हा अशा ठिकाणी राहणा-या आपल्या आर्यपूर्वजांना सहा सहा महिन्यांच्या गुडूप अंधःकारानंतर प्राप्त होणारा सूर्याचा पहिला किरण, सर्वत्र पसरलेल्या अंधःकाराचा थोडासा तरी भेद करणारा आकाशातील तारकांचा लुकलुकता प्रकाश, एवढेच काय पण, कृत्रिम रीतीने निर्माण केलेला अग्निज्वालेचा प्रकाशमय स्फुल्लिंग हासुद्धा मोठा आनंदाचा शुभ प्रसंगच वाटावा, यात काहीच आश्चर्य नाही. सर्वत्र पसरलेल्या घनदाट अंधःकाराची, त्याचप्रमाणे भयंकर रोगराईंच्या साथींची भीती, म्हणजे जवळजवळ मृत्यूचीच धास्ती. या धास्तीमुळेच प्रकाशाच एकच किरण म्हणजे उत्तर ध्रुवस्थ आर्यांना आनंदाची पर्वणी वाटे. या धास्तीच्या आणि आनंदाच्या संमिश्र भावनांतूनच आमच्या धर्मकल्पनांची उत्पत्ती झालेली आहे. थंडीच्या भयंकर कडाक्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना आरोग्याचे नियम धाब्यावर बसवून अत्यंत गचडीने राहणे भाग पडत असे. असल्या मेंढरी गचडागचडी पद्धतीच्या टोळ्या करून राहिल्यामुळे अर्थातच वैषयिक निर्बंध व नीति त्यांच्यात यथातथाच राहिली. आरोग्यनियमांचे उल्लंघन आणि स्त्रीपुरुष संबंधातील शिथिलता यांचा यथाप्राप्त परिणाम म्हणजे महारोग आणि उपदेश यांचा त्या समाजात जारीने फैलाव झाला. उष्णता आणि मांस – विशेषतः गोमांस आणि सोमरस यांची त्यांना दररोजच्या जीवनाकरिता अत्यंत आवश्यकता होती. प्रत्येक ऋतू बदलण्याचे वेळी, जे त्यांचे सार्वजनिक स्वरूपाचे उत्सव व मेजवानीचे प्रसंग किंवा यज्ञ दिवसांचे दिवस चालत असत, तेव्हा तर या खाद्यपेयांचा समारंभ फारच थाटाने होत असे. थंडीचा कडाका टाळण्यासाठी आणि मारलेल्या पशुंचे मांस भाजण्यासाठी हे यज्ञातील होमाग्नि एकदा प्रज्वलित