हिंदुजनांचा –हास आणि अधःपात: Page 8 of 58

असताही मातृभूमीच्या प्रेमाच्या बाबतीत इतर राष्ट्रांनी आमच्यावर वरचढ करावी काय? हे जर खरे असेल, तो मंत्र आमच्या हृदयातून साफ पुसून गेला असेल आणि आमच्या मातृभूमिप्रेमात खरोखरच जर विरजण पडले असेल तर मग - तर मग काय? – झाला, संपूर्ण अधःपातच झाला! या लोकी मोक्ष तर नाहीच, पण परलोकी सुद्धा नाहीच नाही! मला एक दिवस असे स्वप्न पडले की मला कोणी उचलून हिंदमातेच्या मांडीवर ठेवले. मी तिच्याकडे पाहतो तो तिला मूर्छना येत असलेली दिसली. मी चटकन उठून प्रेमाच्या झटक्याने तिला पाठुंगळी मारली आणि चिंताक्रांत स्थितीत दवाखान्याकडे धावत सुटलो. तेथे बरेच डॉक्टर लोक होते. माझ्या आईला त्यांना काही उपचार करावा म्हणून मी तिला त्यांच्यासमोर टेबलावर हळूच निजविले. ते काही उपचार करणार तोच तिने एक दीर्घ श्वास सोडला आणि मी जागा झालो. आज आपल्यापुढे मी ठेवीत असलेल्या ह्या निबंधाचे लेखन मी जागा होताच तात्काळ हाती घेतले. आपल्या अधःपातासंबंधाने विचार करताना काही आध्यात्मिक बिनमुर्वत तत्त्वांचा आपणांस अवश्य विचार करणे प्राप्त आहे. या तत्त्वांचे मी दहा विभाग पाडले आहेत. ते असे – (1) `जमका अजब तडाखा’ जसा कोणास टालता येणे शक्य नाही. तसे कर्मन्यायाच्या चरकातून कोणास निसटचा येणे शक्य नाही. तुमचा दोष कितीही क्षुल्लक असो, त्याबद्दल यथातथ्य प्रायश्चित्त द्यायला कर्मन्याय तुम्हाला वाटेल तेथून हुडकून काढील. (2) जेस पेरावे तसे उगवते. (3) जसे करावे तसे भरावे (4) राष्ट्राचे जीवित असो किंवा व्यक्तीचे जीवित असो, त्याला अचेतन अशी स्थिरावस्था प्राप्त झाली की त्याच सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. (5) सत्य नीति आणि न्याय मिळून धर्म होतो. या धर्मावरच मानवी समाजाचे धारण होत असते. (6) ढोंगीपणाच्या दंभोक्तीची सूत्रे अनीतिमत्तेची फार वेळ तरफदारी करू शकत नाहीत. किंवा नीतिमत्तेचे पांघरलेले सोंग या सूत्रांना फार वेळ झेपतही नाही. (धर्माच्या नावावर रचलेली दांभिक सूत्रे नीतिमत्तेचे समर्थन करू शकत नाहीत.) (7) धर्मपालनाच्या भरती ओहोटीप्रमाणे राष्ट्रांचे व साम्राज्याचे अस्तोदय होत असतात. (8) या जगात केलेल्या पातकाच्या प्रायश्चित्तापासून सवलतीची सूट मिळविलेले एकही राज्य, राष्ट्र, जात अथवा व्यक्ती सापडणे मुष्कीलीचे आहे. (9) काळाचे चक्र हळूहळू फिरते; कोठच्या दिशेने वारा येऊन त्याला केव्हा कशी गति मिळेल त्याची कोणाला दाद नसते, परंतु त्याची घरटी एकदा फिरू लागली की त्यात सापडेल त्याचे मात्र वस्त्रगाळ पीठ पडते. (10) घराचे वासे एकमेकांशी आडवे तिडवे वागू लागले की त्या घराचा डोलारा जमीनदोस्त झालाच समजावे. आतापर्यंत नमनालाच घडाभर तेल जळल्यामुळे वाचकांना कंटाळा आला असेल. परंतु मूळ विषयाची इतकी प्रस्तावना करणे भागच असल्यामुळे वाचकांनी या लांबलचक उपोद्धाघाताबद्दल मला क्षमा करावी. यापुढे होता होईल तो मी माझे विषयनिरूपण ऐतिहासिक कालक्रमानुसार रेखाटण्याचा निश्चय केला आहे. ००० एखाद्या वाहत्या झ-याचे पाणी जर गढूळ झाले तर खालपासून आपण तपास काढीत काढीत त्याच्या उगमाकडे जातो. पण प्रस्तुतच्या बाबतीत हा नेहमीचा क्रम आपण जरा उलट करू आणि कदम थेट उगमापाशी किंवा जेथपर्यंतचा प्रदेश आपल्या आटोक्यात आला आहे तेथपर्यंत जाऊन एकंदर स्थितीची पाहणी करू. तर मग आता प्रथम अगदी प्राचीन वेदकालाकडे नजर फिरवून तेथे या सर्व परंपरेचे काही विषबीज सापडते की काय, हे एकदा नीट पाहू या. या निबंधातील विचारसरणीकरिता आपण श्री. टिळक यांनी आपल्या Aretic Home in the Vedas या विद्वत्ताप्रचुर ग्रंथांत प्रतिपादल्याप्रमाणे आर्यांचे मूल वस्तीस्थान उत्तर ध्रुवाकडील युरोपएशियन किंवा युरेशियन भागाकडे होते असेच गृहित धरू. त्याचप्रमाणे इ.स.पू. ७००० वर्षे ही त्यात दिलेली वेदकालमर्यादाही आपण मान्य करू. कोणत्या का कारणाने होईना, पण ही उत्तरध्रुवाकडील आर्यांची वसाहत विस्कळीत झाली आणि तेथून टोळ्यांमागून टोळ्या नवीन नवीन प्रदेश धुंडण्याकरिता व तेथे नवीन वसाहती स्थापन करण्याकरिता दक्षिण,