हिंदुजनांचा –हास आणि अधःपात: Page 7 of 58

वैदिक धर्माने हिंदुस्थानच्या वैभवाचा पारा एकवेळ अत्युच्च बिंदूला नेऊन भिडविला होता, त्याच धर्माच्या ऐवजी आज प्रचलित असलेल्या भिक्षुकी धर्माचा परिणाम आपणांवर कसा काय होत आहे, याचीही चिकित्सा निःस्पृहपणे केली पाहिजे. असे आपण केले, तर माझी खात्री आहे की आपला अधःपात व –हास का झाला याची कारणे पद्धतशीर शोधून काढून त्यावर आपल्याला उपाय करता येणे शक्य आहे. बांधवहो, मला मार्क अँटनीच्याच शब्दात आपणापुढे हा विषय मांडावयाचा आहे. तो म्हणाला, ``मी सीझरला मूठमाती द्यायला आलो आहो,त्याची स्तुती करण्याकरिता नव्हे. माणसांची कुकर्मे त्यांच्या मृत्युनंतरही जिवंत राहतात, त्यांची सत्कृत्ये मात्र त्यांच्या हाडांबरोबरच गाडली जातात.’’ माझी विषयप्रतिपादाची शैली याच प्रवृत्तिबरहुकूम मी ठेवणार आहे. आत्मस्तुतीला अजिबात फाटा देऊन मी सत्य गोष्टी स्पष्ट बोलून दाखविणार आहे. आमचे वर्तन, स्वभाव, रीतीरिवाज, आमचा हलगर्जीपणा आणि राष्ट्रीयदृष्टय़ा आमचा परस्पर तुसडेपणा, यांचे उद्धाटण मी स्पष्ट स्पष्ट मोकळ्या मनाने, परंतु किंचित झणझणीत रीतीने करणार आहे. भूतकालची साम्राज्य-सत्ता हातची गमावून आज आम्हाला ही जी भिकारडी अवनत स्थिती आली आहे, तिची ग्यानबाची मेख आमच्या नैतिक अधःपातात आहे, हे विसरून चालणार नाही. आमचा भूतकाळ मोठा उज्ज्वल व चिरस्मरणीय असा होता; आमच्या भारतमातेच्या अध्यात्मगौरव वृद्धिंगत करण्याच्या कामी अनेक संतमहंतांनी व नृपतींनी आपल्या कर्तबगारीची पराकाष्ठा केली, या सर्व गोष्टी मला मान्य आहेत इतकेच नव्हे, तर त्यांच्या आदर व प्रशंसेच्या बाबतीत मी कोणासही हार जाणार नाही. आमचे निंदक म्हमतात की हिंदुस्थानाला इतिहासच नाही, किंवा इतिहासविषयक बुद्धी कधी आमच्यात परिणतच झाली नाही. पण ही गोष्ट अजिबात खोटी आहे. उठल्यासुटल्या आमच्यावर असला आरोप करणा-या शहाण्यांना आमचा इतिहास अभ्यासण्याइतकी प्रवृत्ती नसते किंवा संशोधनाची अक्कलही नसते. पुराणांची गोष्ट सोडून द्या. रामायण महाभारत ही आमची राष्ट्रीय महाकाव्ये मुळातून वाचण्याची कितीकांनी तसदी घेतलेली असते बरे? आमच्या देशाचा इतिहास व भूगोल, त्याचप्रमाणे प्रसिद्ध प्रसिद्ध राजघराणी व ऋषीकुळे यांच्या वंशांची माहिती पुराणात चांगल्याप्रकारे आढळते. अर्थात प्राचीन भारताचा संपूर्ण इतिहास व भूगोल पुराणग्रंथांत आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त होणार नाही. तथापि अजून बराच इतिहासाचा भाग उकरून काढावयाचा आहे. त्याचे बरेचसे तुकडे आमच्या धर्मग्रंथांतून व स्मृत्यांतून त्याप्रमाणे चिनी, तिबेटी, ब्रह्मी, सयामी आणि सिंगाली असा अनेक भाषांच्या ग्रंथात इतस्ततः पसरलेले आहेत. त्यांचे एकीकरण केले पाहिजे. शोधा म्हणजे मिळेल, या सूत्रानुसार आपले प्रयत्न झाले पाहिजेत. परंतु या निंदकांच्या निष्कारण निंदेमुळे तुमचे मायदेशावरील प्रेम विश्वास व शोधक वृत्ती यांचे पाय लटपटू देण्याचे काहीही प्रयोजन नाही. आमचे आक्षेपक आणखी असे सांगतात की या देशांत अनेक मानववंशांचे समूह राहत असल्यामुळे हिंदुस्थान ही नुसती भौगोलिक संज्ञा आहे. यावर माझा त्यांना जबाब असा आहे की, अहो! तुम्ही आंधळे आहात; तुमचे डोळेच फुटल्यामुळे भैदांतच अभेदाचे वैभव तुम्हाला कसचे दिसणार? काश्मीरपासून कामोरीनपर्यंत, जलालाबादपासून चितागांगपर्यंत आणि पलीकडे कुणीकडेही पाहा सर्वत्र हिंदू संस्कृतीचाच अंमल पसरलेला आहे. ही संस्कृती सध्या जरी अवनत स्थिती आहे तरीदेखील आमच्या अभिमानापुरतदीही काही लहानसहान गोष्ट नव्हे आजला हिंदुस्थान आणि हिदुत्व ही दोन्ही संक्रमणावस्थेत आहेत. मध्ययुगात त्यांच्या अंगावर वाढलेलेपापुद्रे आज खळखळ कोसळून पडण्यास सुरुवात झाली आहे; आणि आपण स्वतःशी किंवा आपल्या मायदेशाशी जर प्रतारणेचे पातक करणार नाही तर आत्मशुद्धीचा व आत्मोद्धाराचा उषःकाल व्हायला काही वेळ लागणार नाही. अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा सर्वत्र अंधार पसरल्यामुळे निरनिराळ्या भेदांची पिशाच्चे आज आपणांस भेवडावीत आहेत. परंतु आपण सर्व भारतवासियांनी प्रेमाने व निःस्वार्थ बुद्धीने खांद्याला खांदा भिडवून राष्ट्रकार्याची लगबग केली, तर ज्या शास्त्रीय ज्ञानाची व व्यापक दृष्टीची आपण मार्गप्रतीक्षा करीत आहोत, त्यांना बरोबरच घेऊन उगवणा-या प्रबोधनाच्या सूर्यप्रकाशामुळे त्या भुतांच्या भूतचेष्टा आपोआपच नष्ट होतील. `जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि’ हा उज्वल ध्येयमंत्र आमच्या अंतःकरणावर ठसठशीत कोरलेला