हिंदुजनांचा –हास आणि अधःपात: Page 5 of 58

त्याच्या स्वर्गतुल्य ऐश्वर्याच्या कीर्तिदुंदुभीचा दणदणाट आशियाखंडाच्या उंच उंच पर्वतांवरून व मैदानांवरून रोंरावत थेट पाश्चिमात्य युरोपच्या ओसरीवर जाऊन धडकला. त्या दणदणाटाचा प्रतिध्वनी, हिंदुस्थानावर –हासाचा भयंकर पगडा पडल्यानंतर ब-याच काळाने, दिल्लीच्या मोंगल बादशाहीच्या ऐश्वर्यात पुनश्च व्यक्त झाला. याचे प्रत्यंतर पाहणारांना दिवाण—खास या बादशाही इमारतीच्या भिंतीवर `पृथ्वीवर जर स्वर्ग असेल तर तो येथे आहे, येथे आहे, येथेच आहे.’ अशी रत्नजडित अक्षरांनी लिहिलेली साक्ष आज घटकेलाही पाहावयास मिळेल. आपल्या थोर मातृभूमीच्या या हृदयंगम उत्कृष्ट चित्राच्या जोडीने, त्याची हृदयविदारक निःकृष्ट अशी दुसरीही बाजू मला आपल्यापुढे मांडली पाहिजे. हिंदमातेच्या पायांपाशी घोटाळणा-या तिच्या मुलांची स्थिती आज काय आहे? कोणाच्या तोंडावर तेज नाही, क्षणोक्षणी मरणाच्या भीतीने गांगरलेले, दारिद्र्यामुळे पाठपोट एक झालेले, नानाविध दुःखांनी होरपळलेले, भलत्याच फंदांत भडकलेले. अशी आजच्या हिंदुची स्थिती होऊन बसली आहे. कोणी त्यांना होंडस म्हणतो, कोणी इन्डोस म्हणतो, कोणी जेन्दु म्हणतो (जन्तु किंवा हैदोस असे अजून म्हणू लागले नाहीत हे नशीब!) माझी अशी खात्री आहे की (सध्याप्रमाणेच जर हिंदुजन आपले हात पाय पोटाशी आवळून स्वस्थ बसतील तर) असले वाक्प्रचार जगातल्या सुधारलेल्या राष्ट्रांच्या शब्दकोशांतून आणि ज्ञानकोशातून बिनधोक प्रगट होतील आणि त्यांना खालच्यासारखे काहीतरी विलक्षण अर्थ देण्यात येतील – हिंदू म्हणजे कोण? (1) हिंदुस्थानात सापडणारी द्विपादांची एक जात. (2) हिंदुस्थानात सापडणारी श्ववृत्तीची (अगदीच कुत्रा नव्हे,) बेवकूफ अशा दोन तंगड्या असलेल्या बावळटांची जात. (3) एक प्रकारचा हिंदुस्थानी राक्षस. ही एक रानवट माणसांची पैदास आहे. त्यांना लाजलज्जा, मानापमान, सदाचरण आणि स्वातंत्र्य यांचे वारेसुद्धा लागलेले नसते. (4) अल्पवयातच मातृपद भोगणा-या स्त्रियांचे पोटी जन्माला आलेली नैतिक दुबळ्यांची एक जात. ही फक्त हिंदुस्थानातच सापडते. (5) रानवट हिंदु संस्कृतीच्या नैतिक षंढांची एक जात. अशा प्रकारची घाणेरडी माहिती सर्व संस्कृत राष्ट्रांनी एक मताने जर जगभर पुकारली तरत्यांच्या कवटलेल्या कलमांच्या फटक-याने सर्व हिंदू जनांना वर्तमान युरोपियन संस्कृतीच्या क्षेत्राबाहेर गचांडी मिळण्यास अवकाश आहे का? दुर्दैवाने खरोखरच अशी स्थिती आली तर आम्हा शिक्षणाकरिता, व्यापारधंद्याकरिता किंवा चैनीकरिता, जेव्हा जेव्हा पाश्चात्य देशांत जाण्याचा प्रसंग येईल, तेव्हा तेव्हा तिकडचे सारे लोक आमच्याकडे बोट दाखवून `हे पाहा गचाल हिंदू आले’ असे म्हणू लागतील. हिंदू गचाळ अं? अवनत हिंदू? सा-या संस्कृत जगाचा हाच शेरा जर आमच्या कपाळी पडावयाचा आसेल तर जगातल्या कोणत्या हाय पिनलकोडमध्ये या पेक्षा अधिक जलाल शिक्षेचा प्रकार सापडणे शक्य आहे? या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की प्राचीन ग्रीक, एट्रुस्कन्स, रोमन्स, त्याचप्रमाणे नॉर्वे स्वीडन डेन्मार्क देशात राहणारे जर्मन संस्कृतीचे लोक आणि महायुद्धपूर्वकाळी जर्मन साम्राज्याच्या बराच मोठा भाग व्यापणारे जर्मन लोक, ज्या मूळ हिंदू – आर्य (Indo-Aryan) मानव वंशापासून आपल्या उत्पत्तीचा हक्क सांगतात, त्याच उगमापासून आम्हा हिंदुंचाही जन्म झालेला आहे. हिंदुसमाज हे एक राष्ट्र आहे. एक मोठा विस्तीर्ण मानवसमूह आहे, आणि त्याची एक विशिष्ट परिणत संस्कृतीही आहे. अशा राष्ट्राचा समंजस जगाच्या न्यायमंदिरात अपमान व्हावा, त्याची मानखंडना व्हावी, त्याला तुसडेपणाने वागविण्यात यावे, न्यायाच्या घणाच्या एकाच ठोकरीने एकजात सर्व हिंदुंना शिद्ध्यांच्या, नरमांसभक्षकांच्या आणि रानटी लोकांच्या पंक्तीला बसण्यास झुगारून देण्यात यावे आणि त्यांच्या शीलांवरही डांबर फासण्यात यावी; अन्यायाची केवढी ही परमावधी! राष्ट्रीय अवनती व राष्ट्रीय अपमानाच्या या दुःसह प्रसंगी, हिंदुस्थान देश हीच आपली जन्मभूमी- हीच आपली थोर माता ही भावना जागृत असणा-या सर्व हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन, बौद्ध, शीख जनांनी या गोष्टीचा एकमताने विचार केला पाहिजे. आमच्या किंवा आमच्या पूज्य पितरांच्या हातून काय अशी पातके घडली की ज्या मुळे आमच्या शीलावर ही नामोशी फेकण्यात येत आहे; याचा सर्वांनी नीट काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. बांधवहो, एकाच मातृदेवतेच्या सत्पुत्रांनो, हिंदु आणि मुसलमान, ख्रिस्ती आणि पारशी,