हिंदुजनांचा –हास आणि अधःपात: Page 4 of 58

आणि किती अत्युत्तम! विश्वाच्या कोड्याचा निरास करून चिकित्सक व साधक मुमुक्षूंच्या हाती जन्ममृत्यूच्या गूढ तत्त्वनिरसनाची प्रत्यक्ष गुरुकिल्ली देण्याचा अग्रमान पटकविणारी ही आपली भारतमाता. या पुराणश्रेष्ठ जगन्माउलीलाल माझा प्रणाम असो. वन्दे मातरम्. मनुष्यप्राणी हा काही एकजात एकसारखा संस्कृत नसतो. कोणाची संस्कृती नीच, तर कोणाची स्वार्थी; कोणी जड असतात, तर कोणी विषयलंपट असतात; आणि कित्येकांच्या राक्षसी प्रवृत्तीमुळे त्यांच्यात आणि पशूत काही भेदच नसतो. असल्या वृत्तींच्या माणसांना काबूत त्यांच्या पाशवी संस्कारांना कधी चुचकारून तर कधी दपटशा दाखवून, आस्ते आस्ते त्यांना ख-या माणुसकीला आणून पोहचविण्याचे कार्य मोठे कठीण आहे. या साठी आत्मज्ञान, आत्मपरिणति (आत्मसंस्कृती), स्वावलंबन आणि उत्कटतम मीतिमत्ता या गुणांचा प्रकास त्या संस्कृत प्राण्यात मोठ्या कुशलतेने पाडावा लागतो. हा प्रकाश पाडण्याचे आणि वरील सर्व प्रकारच्या असंस्कृत वृत्तींना पद्धतशीर उन्नत करण्याचे धाडसी कार्य यशस्वी करून दाखविण्याच्या कामी – नराला नारयण स्वरूपाची आत्मप्रतीति आणून देण्याच्याय कामी – जगातील सर्व राष्ट्रांपेक्षा हिंदुस्थानानेच अखेर सर्वांवर मात केली आहे. तर सर्व गोष्टी सोडून दिल्या, तरी निदान या बाबतीत तरी आतापर्यंत हिंदुभूमीने `जगद्ज्ञानमाता’ ही आपली अद्वितीय आणि असामान्य श्रेष्ठता कायम राखिली आहे; मग तिचा कोणी कितीही विपर्यास करो! हिंदुभूमी ही गूढशक्तीची अधिष्ठात्री आहे. मग तिच्या मुखावर भविष्यकालदर्शक असे जे गंभीर विलक्षण हास्य अजूनसुद्धा चमकत आहे, त्याचे कारण काय? त्याचे कारण हेच कती कसेही बरेवाईट प्रसंग तिच्यावर येत असले, तरी `हेही दिवस निघून जातील’ हा तिचा अत्मविश्वास अत्यंत प्रखर आहे. प्राचीन काळी हूण, शक, जाठ, सिथिअन वगैरे रानटी व क्रूर संस्कृतीच्या लोकांच्या टोळधाडी हिंदुस्थानाला लुटून फस्त करण्याकरिता काय थोड्या थोडक्या येऊन कोसळल्या? परंतु त्या लोकांनासुद्धा चुचकारून व माणसाळून त्यांच्या रानटी प्रवृत्तीची नांगी अज्जिबात बोथट करण्याच्या कामी कोणाच्या उज्वल संस्कृतीचा पराक्रम यशस्वी ठरला बरे? हिंदुस्थानाचीच लुटालूट करण्यास आलेले हे रानटी लोक अखेर हिंदमाऊलीच्याच चरणी लागले, तिला त्यांनी आपली माता मानली आणि वैयक्तिक गुणकर्मानुसार चातुर्वर्ण्याच्या चार भव्य दरवाजांनी हिंदुसमाज – संघटनेत समरस होऊन जाण्यात त्यांनी धन्यता मानली. म्हणजे निराळ्या शब्दांत स्पष्ट सांगायचे तर ही परकीय मंडळी अखेर हिंदुसमाजाचे प्रत्यक्ष घटकांवयव बनले. मात्र येथे हे नीट लक्षात ठेवले पाहिजे की, त्यावेळी भिक्षुकशाही आताप्रमाणे कुत्सित व वर्णविद्वेशी बनलेली नव्हती, जात्यंधपणा, कुटीलपणा, ताठरपणा किंवा कूपमंडूकी संकुचितपणा तीत अजून घुसला नव्हता आणि विद्वत्ता संस्कृती व ज्ञान यांचे फायदे फक्त आपल्या विवक्षित जाती पुरतेच वंशपरंपरागत मर्यादित करम्याची नीट वृत्ती भिक्षुकशाहीत बोकाळलेली नव्हती. स्मृतीच्या कक्षेपार असलेल्या अत्यंत प्राचीन काळापासून हिंदमाता जगातल्या सर्व लेकरांना मोठ्या ममतेने हाक मारून बोलावीत आहे व म्हणत आहे की, `बाळांनो! या. तुम्ही सर्व माझीच लेकरे आहेत. विश्वात्मैक्य भावाचे प्रेम आणि मानवजातीची निरःसित निःस्वार्थी सेवा यातून निर्माण होणारे समाधान आनंद व शांतिमिश्रित दुग्धाचे स्तनपान, लेकरांनो, मी तुम्हांला करविते. अभेदभावाने खुशाल या.’ आशियाखंडस्थ जनतेलाच अशा प्रकारचे आव्हान हिंदमातेने केले असे नव्हे. तिचा साराच व्यवहार अभेदभावाचा. त्यात खंडभेदादि भेद यांचा वाससुद्धा यावयाचा नाही. आशियाखंडाप्रमाणेच ग्रीस व इजिप्त येथील जनतेला हिंदमातेने ज्ञान धर्म व संस्कृती याचे उदार मनाने घ्या घ्या म्हणून दान केलेले आहे. हिंदुस्थानात हातमागावर विणलेली सुताची व रेशमाची कापडे, नाना त-हेच्या कला कुशलतेच्या वस्तू, यांवर बादशाही रोम अथेन्स अलेक्झांड्रिया व आशियाखंडस्थ तर अनेक मोठमोठ्या देशांची मारे धूम उडी पडत असे. भूतकाळी हिंदुस्थान म्हणजे दुधाचे व मधाचे पाट वाहत असलेली सुवर्णभूमी होती. (या देशात सर्व प्रकारची संपत्ती व समृद्धी विपुल होती.) हिंदुस्थानरूपी नंदनवनाचा आस्वाद फक्त हिंदूच घेत होते असे नव्हे, तर वाटेल त्या परदेशस्थ चाहत्याली व रसिकालासुद्धा या नंदनवनाचे दरवाजे खुले असत. हिंदुस्थानाने सा-या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलेले होते.