हिंदुजनांचा –हास आणि अधःपात: Page 3 of 58

००० अकाली तुटलेला तारा प. वा. रामचंद्र वामन ऊर्फ बापूसाहेब चित्रे, बी.ए. यांच्या दिव्यात्म्यास अर्पण ।। वन्दे मातरम् ।।

-------------------------------------

 

प्रस्तुत निबंधाचा मथळा वाचताच `गिबनकृत रोमन साम्राज्याचा –हास व अधःपात’ या महाग्रंथाची वाचकांना आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. हाच मथळा माझ्या या निबंधाला मी का घेतला, अशी कोणी पृच्छा केली तर त्याला उत्तर हेच की माझा यत्न अल्पमतीचा असून अल्प सामुग्रीवर जरी उभारलेला आहे, तरी त्याचे धोरण काय असावे, याची या मथळ्यामुळे वाचकांना स्पष्ट अटकळ व्हावी. हाती घेतलेल्या विषयप्रतिपादनाच्या मार्गांत अनंत अडचणी आहेत, याची जाणीव मला नाही असे नव्हे. विषयाचा व्याप तर इतका दांडगा आहे की कोणाचीही क्षणभर तिरपीट उडाल्याविना राह्यची नाही. परंतु रसिक वाचकवृंद माझे म्हणणे शांतपणाने, इतकेच नव्हे तर अत्यंत कळकळीने ऐकून घेईन, अशी मला खात्री असल्यामुळेच, मनात आलेले विचार दडपून टाकण्यापेक्षा स्पष्ट बोलून दाखविण्याचे धैर्य मला येत आहे. सुप्रसिद्ध इतिहासकार गिबन यांचे ग्रंथकर्तृत्व त्याच्या अगाध बुद्धिसामर्थ्यास व लेखनकौशल्यास साजेशोभेसेच आहे, यात तिळमात्र शंका नाही. परंतु गिबन हा रोमन नसल्यामुळे किंवा रोमन साम्राज्याच्या अधःपाताशी त्याचे काहीच सुहेरसुतक नसल्यामुळे, हा इतिहास आपल्या ओजस्वी लेखनकौशल्याने त्याने जरी अजरामर करून ठेवला, तरी तो लिहीत असताना गिबनच्या अंतरात्म्यास आत्मत्वाचा चटका लागण्याची काहीच कारण नव्हते. हे आपण विसरता काना मये. बोलून चालून गिबन पडला उत्तरदेशस्थ युरोपियन; तथापि जात्याच कुशाग्र बुद्धीचा असल्यामुळे अधःपतना पावलेल्या रोमन साम्राज्याकडे त्याची इतिहासभिज्ञ विवेचन दृष्टी वळावी यात काही नवल नाही. ऐतिहासिक दृष्ट्या हा इतिहास गिबनला कितीही जरी जिव्हाळ्याचा वाटला तरी तो त्याचा जिव्हाळा एखाद्या रसायनशास्त्रवेत्त्याच्या जिव्हाळ्यासारखाच असणार; अंतरात्म्याला आत्मत्वाचा पीळ पाडणारा जिव्हाळा नव्हे! एखाद्याच्या मुलाने विष खाल्ले व त्या विषाचे पृथक्करण करण्यासाठी त्याला रसायनशाळेत आणले, अशा स्थितीत ते विष कोणत्या प्रकारचे आहे, हे समजावून घेण्याची रसायनशास्त्र्याची जी जिज्ञासा व जिव्हाळा, तोच त्रयस्थपणाचा जिव्हाळा रोमन साम्राज्याचा इतिहास लिहिताना गिबनच्या अंतःकरणात होता; आत्मत्वाचा जिव्हाळा काही नव्हे! रोम किती झाले तरी गिबनला परकेच. माझी हिंदुस्थानाविषयी तशी भावना असणे शक्यच नाही. भारतीय हिंदुजनतेचा आज कितीही –हास आणि अधःपात झालेला असला, तरी हिंदुस्थआन ही माझी प्यारी मातृभूमी आहे, मी तिचा एक रहिवाशी आहे – नागरिक आहे, ही माझी भावना जागती ज्योत जिवंत असणारच. अर्थात माझी मातृभूमी अधोगतीच्या व अवनतीच्या दुर्गंधीने नासून सडली आहे, असा कोणी परकीयांनी कितीही गिल्ला केला तरी त्याकडे लक्ष देण्याचे मला काय प्रयोजन? या परक्यांचे काय घेता? बेटे उद्या चंबुगबाळे खाकेत मारून खुशाल आपल्या मायदेशाला सूंबाल्या ठोकतील! पण माझ्या मातृभूमीचा सत्पुत्र म्हणून कोणत्याही अवस्थेत मला येथेच राहणे भाग आहे. अशा भावनेने वर्णन केलेली हिंदुजनांच्या –हासाची व अधःपाताची कहाणी अर्थातच निराळ्या मनोभूमिकेत रेखाटली जाणार, हे सांगणे नको. हिंदु-भारत सा-या जगाच्या सुधारणेची क विलक्षण शक्ती आहे. तिचा परिणाम इतरांप्रमाणेच माझ्या कोट्यवधी देशबांधवांवरही होत आहे, या दृष्टीने त्या शक्तीचा योग्य संदेश काय आहे, त्याची व्याप्ती केवढी आहे, यांचा मनःपूर्वक अभ्यास करणे मला अत्यंत आवश्यक आहे. हा प्रश्न असा तसा नव्हे, माझ्या जिव्हाळ्याचा आहे. –हास पावलेल्या व नामशेष उरलेल्या रोमन साम्राज्याबद्दल गिबनला या भावनेची जाणीव असणे शक्यच नाही. आपल्या परमप्रिय हिंदुस्थान देशाचे प्राचीन ऐश्वर्याचे चित्र पाहिले तर काय दिसते? युगानुयुगाचा हिंदुस्थान. संतमहंतांचा हिंदुस्थान. त्याच्या प्राचीन धवलतम चारित्र्याने हिमालयाच्या उत्तुंग धवलगिरीशीच स्पर्धा करावी. वेदोपनिषदांची ही जगन्माता. याच मातेच्या प्रेमश हृदयातून सांख्य आणि योग या आध्यात्मिक शास्त्रांच्या दुग्धधारा निर्माण होऊन, त्यांचाच पुढे बुद्ध आणि शंकर या महर्षीच्या उत्कृष्ट व उदारतम तत्त्वज्ञानाशी बिनतोड त्रिवेणी संगम झाल्यामुळे, नीतिप्रचुर अशा बिनमोल अध्यात्मशास्त्राची उत्पत्ती झाली. या शास्त्राचे स्वरूप तरी किती युक्तिसिद्ध, किती सर्वव्यापी