हिंदवी स्वराज्याचा खून: Page 8 of 9

दुस-या दिवशी मागोमाग महाराजांची राणी, कन्या सौभाग्यवती गोजराबाई वगैरे कबिले येऊन दाखल झाले. गाई म्हशीच्य गोठ्यात हिंदूंचा बादशहा हरामखोर ब्राम्हणांच्या कारस्थानामुळे अस्ताव्यस्त स्थितीत पडलेला पाहून राजवैभवात वाढलेल्या त्या राजस्त्रियांच्या अंतःकरणाची स्थिती काय झाली असेल याची कल्पना करवत नाही! पण कल्पना कशाला? इतिहास काही मेला नाही. राजहत्येबरोबर बाळाजीपंत नातूला भ्रूणहत्येचे पातक कमवायचे होते. त्या पातकाचा फोटोग्राफ इतिहासात उमटलेला आहे. नातूच्या वंशजांनी आणि त्याच्या स्वराज्यद्रोही राष्ट्रीय सांप्रदायिकांनी आपल्या बेचाळीस बापजाद्यांची पुण्याई जरी खर्ची घातली तरी तो ऐतिहासिक पुरावा नष्ट होणे शक्य नाही.

आपला प्रियकर बाप, साता-याचा छत्रपति, हिंदी स्वराज्याचा हिंदू बादशहा गाई म्हशीच्या गोठ्यात वस्त्रांशिवाय बसलेला पाहून गोजराबाईने एक भयंकर किंकाळी फोडली व ती बेशुद्ध पडली. बांधवहो! यापुढील प्रकार अत्यंत भयंकर. गोजराबाई आठ महिन्यांची गरोदर होती. बेशुद्ध पडताच तिचा गर्भपात झाला. चहूकडे जंगल, वै-याच्या कैदत माणसे सापडलेली, अशा स्थितीत त्या बिचारीला कसले औषध आणि कसला उपचार! दैवाची खैर, म्हणून बिचारीचा जीव तरी वाचला. येथून मुक्काम हालताच तिकडे बाळाजीपंत नातूचे विचारयंत्र सुरू झाले. या महात्म्याने असा विचार केला की छत्रपतीच्या बरोबर बाळासाहेब सेनापती असणे ही मोठी घोडचूक. चिटणीसाला जसा अचानक उचकून फेकून दिला, तशी बाळासाहेब सेनापतीची वासलात लावली पाहिजे. नाही तर हा छत्रपति त्याच्या साहाय्याने एकादे नवीन स्वराज्य देखील निर्माण करायचा! म्हणून बाळाजीपंताने आपला कुळस्वामी ओव्हनसाहेब याच्याकडून सेनापतीला पकडण्याचे वारंट सोडले. वारंटातील मजकूर असा होता की, साता-यात तुम्हाला लाखो रुपयांचे देणे आहे ते फेडल्याशिवाय तुम्हाला साता-याबाहेर जाता येत नाही. हा आरोप बनावट होता हे सांगणे नकोच. तथापि दुस-या मुक्कामावर वारंटाची टोळी येताच सेनापतीने आपल्या व सेवकांच्या अंगावरील उरलेले काही दागदागिने देऊन त्या शिपायांचा काही तरी समजूत करून (कारण हे शिपाई पूर्वी सेनापतीच्या हुकमतीखाली होते व त्यांना ख-या गोष्टी माहीत होत्या.) त्यांना साता-यास परत रवाना केले. मुक्काम दर मुक्काम घोडदौडीची पायी चाल करून वाटेत बाळासाहेब सेनापतीला आमांशाचा रोग जडला व रक्त पडू लागले. म्हणून औषधोपचारासाठी वाटेत मुक्काम करण्याबद्दल छत्रपतींनी क्रिस्टॉल साहेबाची नानाप्रकारे विनवणी केली.

ओव्हन्स रेसिडेंट हा जसा त्या वेळचा ओडवायर होता, तसाच त्याचा साथीदार हा नराधम क्रिस्टाल त्या वेळचा डायर म्हटला तरी चालेल. त्याने विनंतीचा अवमान करून मुक्कामाची दौड चालूच ठेवली. मात्र बाळासाहेबाला त्याने का स्वतंत्र मेण्यात चालविले होते. परंतु औषधोपचाराची तर गोष्टच राहूद्या पण विचा-याच्या नुसत्या अन्नपाण्याचीही कोणी व्यवस्था पाहिली नाही. अखेर एका मुक्कामावर क्रिस्टॉल साहेबांची सहज लहर लागली म्हणून मेणा उघडून पाहतात तो बाळासाहेबांचे प्रेत कुजून त्याला घाण सुटलेली! बाळासाहेबांचा मृत्यू होताच त्यांच्या पतिपरायण पत्नीने एक दोन दिवसांतच प्राणत्याग केला. अशा रीतीने बाळाजीपंत नाते आपल्या ब्राम्हण कारस्थानाच्या तिरडीवर आप्पासाहेब भोसल्यांच्या हातून बांधलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मुडद्याची प्रेतयात्रा बनारसला पोचेपर्यंत वाटेत अनेक हत्या घडल्या. बनारसला छत्रपति ह्यांना तुरुंगात ठेवले आणि अशा रीतीने सध्याच्या राष्ट्री पक्षांचे इतिहासप्रसिद्ध पूर्वज लोकमान्य बाळाजीपंत नातू, चिंतामणराव सांगलीकर, वगैरे भू-देवांचे स्वराज्यद्रोही कारस्थान परशुरामाच्या कृपेने तडीस गेले. बाळाजीपंत नातू याने कंपनी सरकारकडून जहागि-या मिळविल्या, अप्पासाहेब भोसल्याची दिवाणगिरी मिळविली, नौबदीचे अधिकार मिळविले, बाळा जोशी नावाच्या एका हलकट वाईकर ब्राम्हणाला त्याच्या `राष्ट्रीय’ खटपटीबद्दल जहागिरी बक्षिस दिली, आणि नातूचे परात्पर गुरु रेसिडेंट ओव्हन्स साहेब यांना मुंबई सरकारच्या शिफारसीवरून वार्षिक चारशे पौंडांचा जादा मलीदा सुरू झाला. सख्या थोरल्या भावाच्या सर्वस्व-घाताच्या रक्तांनी माखलेल्या अप्पासाहेब भोसल्याने १८ नोव्हेंबर १८३९ रोजी पणास राज्याभिषेक करून घेतला आणि रात्रौ दीपोत्सव करण्याच्या बाबतीत स्वराज्यद्रोही ब्राम्हणांनी कस्सून मेहनत घेतली.

बांधवहो! स्वराज्याच्या अधःपाताचा हा इतिहास मी पणास फारच थोडक्यात सांगितला आहे. हा इतिहास मी लवकरच ग्रंथरूपाने बाहेर काढणार आहे; त्यावेळी स्वराज्यद्रोहाच्या रंगपटावर आणखी शेकडो