हिंदवी स्वराज्याचा खून: Page 7 of 9

मध्यरात्री मुर्दा पडणार, या कल्पनेने अस्तास जाणारा सूर्यनारायण रक्ताची अश्रु टपटपा गाळीत रक्तबंबाळ होऊन सह्याद्रीच्या शिखराआड नष्ट झाला. स्वराज्यद्रोही आप्पासाहेब भोसला, आणि महाराष्ट्राच्या मानेवर सुरी फिरविणारा कसाब बाळाजीपंत नातू या दोघांच्या अधिपत्याखाली गो-या सोजिरांच्या पलटणी सातारा शहराची सर्व नाकी अडवून उभ्या राहिल्या. रेसिडेंट ओव्हन्स साहेबांची अश्वारूढ स्वारी इकडून तिकडे भरा-या मारू लागली. पण साता-यात त्यावेळी काय होते? जिकडे तिकडे सत्याग्रह! शुद्ध स्मशानशांतता! प्रतिकाराची उलट सलामी छत्रपती देतील, ही नातूची कल्पना फोल ठरली. प्रजाजनांनी आपापली भोजने उरकून यथास्थितपणे निद्रेची तयारी केली. खुद्द छत्रपती भोजनेत्तर आपल्या महालात खुशाल झोपी गेले.

निष्कलंक मनोवृत्तीला निद्रादेवी कधीही बिचकत नाही, याचे प्रत्यंतर येथे दिसले. शनिवार वाड्यावर झेंडे फडकविणारे राष्ट्रीय पक्षाचे ब्राम्हण वीर लोकमान्य नातू मध्यरात्रीच्या सुमारास ओव्हन्सच्या कानाला लागले. राजवाड्याला सोजिरांचा गराडा पडला. घरभेद्या आप्पासाहेब पुढे, पाठीमागे रेसिडेंट ओव्हन्स आणि चार पाच गोरे सोजीर, अशी ही चांडाळ चौकडी, आज आपण ज्या राजवाडयासमोर जमलेले आहोत त्या राजवाड्याच्या छातीतला प्राण हरण करण्याकरिता यमदूताप्रमाणे आत घुसली. त्यांनी देवघराचे पावित्र्य पाहिले नाही, त्यांनी झनान्यातील राजस्त्रियांच्या अब्रूकडे पाहिले नाही. ते खाडखाड बूट आपटीत छत्रपतीच्या शयनमंदिराकडे गेले. आप्पासाहेबांनी `हे आमचे दादा’ असे बोच करून दाखविताच त्यावेळचा महाराष्ट्राचा ओडवायर कर्नल ओव्हन्स झटदिशी पलंगाजवळ गेला आणि गाढ निद्रेत घोरत असलेल्या छत्रपतीला त्याने मनगटाला धरून खसकन पलंगावरून खाली ओढले आणि `तुम हमारे साथ चलो’ असे म्हणून तो त्यांना खेचू लागला. सत्याग्रही छत्रपति काहीही प्रतिकार न करिता मुकाट्याने चालू लागले. त्यावेळी ते फक्त एक मांडचोळणा नेसलेले होते. त्याशिवाय अंगावर दुसरे काहीही वस्त्र नव्हते. छत्रपतींची अशी उघड्याबोडक्या स्थिती उचलबांगडी झालेली पाहून झनानखान्यात हलकल्लोळ उडाला. चाकर माणसे भयभीत होऊन हातात दिवट्या घेऊन सैरावैरा धावपळ करू लागली. एकच आकांत उडाला. सर्व लोक निःशस्त्र, त्यातच खुद्द छत्रपतींची सत्याग्रहाची शपथ, यामुळे कोणाचाच काही उपाय चालेना. महाराजांच्या दंडाला धरून ओव्हन्सने त्यांना राजवाड्याबाहेर आणले, आणि तयार असलेल्या पालखीत त्यांना कोंबले. जवळच उभे असलेल्या बाळाजीपंत नातूच्या डोळ्याचे पारण फिटले. परशुरामाचा वर पूर्ण झाला. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे प्रेत भिक्षुकशाहीच्या तिरडीवर चढलेले पाहून रेसिडेंट ओव्हन्सला स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला.

आप्पासाहेब भोसल्याचा घरभेदपणा कचकाऊन फळफळला. एक मिनिटाच्या आत सोजिरांच्या पहा-याखाली सत्याग्रही छत्रपतीची पालखी चालू लागली. प्रजाजन भराभर जमा होऊ लागले. मध्यरात्रीची वेळ, तरीसुद्धा सातारचा राजरस्ता नरनारींनी गजबजून गेला. आपला छत्रपति असा उघडा बोडका पकडून नेताना पाहून त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचे धबधबे वाहू लागले. पण करतात काय? महाराजांची सत्याग्रहाची शपथ अक्षरशः पाळणे जरूर होते. इतक्यात कोणी एकाने धावत धावत येऊन, आपल्या घरातील एक शाल आणून महाराजंच्या अंगावर घातली. सातारच्या ब्राहणेतर प्रजेने छत्रपतींना अखेरचा मुजरा ठोकला आणि क्रिस्टॉल नावाच्या सोजिराच्या आधिपत्याखाली पालखी साता-याच्या हद्दपार झाली. इतक्यात आप्पासाहेब भोसल्याच्या चिथावणीवरून सेनापती बाळासाहेब भोसल्यांना काही सोजिरांनी पकडून धावत धावत छत्रपतीच्या पालखीजवळ नेले व ते सेनापतीचे पार्सल धाडकन त्याच पालखीत फेकून दिले. बाळासाहेबाने ताडकन पालखीच्या बाहेर उडी मारली आणि त्वेषाने म्हणाला, ``खबरदार, ज्या छत्रपतीच्या पायाला स्पर्श करण्याची आजपर्यंत कोणाचीही ताकद झाली नाही, त्यांच्या बरोबरीला बसून छत्रपतीच्य तक्ताची मी अवहेलना करू काय? मी जरी निःशस्त्र असलो तरी अशाही स्थिती मी पाच पन्नासांना लोळवायला कमी करणार नाही हे लक्षात ठेवा.’’ इंग्रजांच्या लोकविश्रुत पॉलिसीप्रमाणे छत्रपतींचा हद्दपारीचा शेवटला मुक्काम कोणालाही कळणे शक्य नव्हते. पहिल्या दिवशी क्रिस्टॉल कंपूने आठ मैलाची मजल मारून निंबगावात मुक्काम केला. त्या ठिकाणी गाई म्हशी बांधण्याच्या गोठ्यात, जेथे शेण आणि मूत्र सर्वत्र पसरलेले आहे, उंदीर, झुरळे, चिलटे, पिसवा वगैरेंचा सुळसुळाट आहे, अशा जागेत छत्रपतींना आणून बसविले. बांधवहो! या वेळची छत्रपतींच्या मनःस्थितीची आपणच कल्पना करावी हे बरे.