हिंदवी स्वराज्याचा खून: Page 6 of 9

चालू घटकेलासुद्धा पुण्याची राष्ट्रीय भिक्षुकशाही व कोल्हापूरचे श्री शाहू छत्रपति यांच्या झगड्यात किती सापेक्ष रीतीने सिद्ध होत आहेत, याचा आपणच नीट विचार करा. या हिंदुस्थानात मराठ्यांचे किंवा एखाद्या ब्राह्मणेतरांचे एकही राज्य कोठे शिल्लक राहू नये, जिकडे तिकडे सारी भटभिक्षुकशाही माजावी, ब्राम्हणेतरांवर ब्राम्हणांची सनातन कुरघोडी असावी, यासाठी या राष्ट्रीय गुंडांची केवढी धडपड चाललेली असते, हे जर आपण जरा लक्षपूर्वक विचारत घ्याल, तर राष्ट्रीयांच्या स्वराज्याच्या गप्पा म्हणजे ब्राम्हणभोजनाच्या खरकट्या पत्रावळी असे जे मी म्हणतो, त्याचा तुम्हाला तेव्हाच उलगडा होईल. तागडीच्या जोरावर सबंध हिंदुस्थानभर तंगड्या पसरणा-या कंपनी सरकारालासुद्धा छत्रपतीसारखा पाणीदार राजा व त्याचे संस्थान शिल्लक ठेवणे जिवावरच आले होते. तशात स्वदेशातलेच ब्राम्हण लोक जर एकमुखाने स्वदेशी राजाला जिवंत गाडण्याची चळवळ करीत आहेत, तर त्या चळवळीचा फायदा घेऊन परस्पर पावणे तेरा या न्यायाने नातूकंपूने शिजविलेल्या बनावट राजद्रोहाच्या हांडीने छत्रपतीचा कपाळमोक्ष होत असल्यास कंपनी सरकारला ते हवेच होते.

म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी नातू कंपूने कंपनी सरकारला व कंपनी सरकारने नातकंपूला परस्पर मिठ्या मारण्यात व्यभिचारी राजकारणाचे बेमालूम डावपेच दोघेही खेळले, हाच इतिहासाचा पुरावा आहे. असो. कंपनीसरकार आपले काही ऐकत नाही, न्यायाचा प्रश्नसुद्धा ते विचारात घेत नाही, उलट हरामखोर ब्राम्हणांच्या पूर्ण पचनी पडून पदभ्रष्ट करण्याच्या धमक्या देत आहेत, अशा परिस्थितीत केवळ सत्यावर भरवसा ठेवू, परमेश्वरी इच्छेच्या हातात आपल्या दैवाचा झोला सोडून, प्रतापसिंहाने निःशस्त्र सत्याग्रह करण्याचे ठरविले. कंपनी सरकारच्या सैन्यबळापुढे छत्रपतीचे सैन्यबळ जरी काहीच नव्हते, तरी छत्रपतीच्या तक्तासाठी रक्ताचा थेंब न् थेंब खर्ची घालणारे मावळे-मराठे व ब्राम्हणेतर लोक वेळ पडल्यास मधमाशीच्या झुंडीप्रमाणे भराभर बाहेर पडण्यास कमी करणार नाहीत, याची जाणीव कंपनी सरकारला होती. नातूनेसुद्धा छत्रपतीचे उच्चाटन करण्यासाठी इंग्रजी सैन्याची जय्यत तयारी करण्याचा मंत्र रेसिडेंट ओव्हन्सच्या कानात फुंकला होता. आणि त्याप्रमाणे तोफखाना, घोडेस्वार यांसह ग्रेनेडिअरची पंचविसावी पलटण ३१ ऑगस्ट १८३९ रोजी पुण्याहून निघून ४ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता साता-यास येऊन थडकली, ग्रामण्याच्या तंत्रमंत्राने, राजकारणाच्या कागदी बुजगावण्याने किंवा, मुंबईच्या गव्हर्नरच्या तोंडी धमकावणीने प्रतापसिंहाचा प्रताप जेव्हा केसभरसुद्धा डळमळला नाही, तेव्हा इंग्रजी सैन्याच्या हिंमतीवर छत्रपतीला अचानक पकडून हद्दपार करण्याचा बळजबरीचा बेत नातूकंपूने ठरविला. या बेताची कुणकुण महाराजांना लागताच, त्यांनी या जय्यत तयारीला तोंडघशी पाडण्याचा निश्चय केला. त्यांनी विचार केला की, जर मी सर्वस्वी निष्कलंक आहे, तर कंपनी सरकारच्या सशस्त्र प्रतिकाराची मी कशाला पर्वा ठेवू? ज्यांनी आपल्या न्यायबुद्धीचाच खून पाडलेला आहे; सांगलीकर, नातू, किब्यासारख्या राज्यद्रोही हरामखोरांना जहागिरीचा मलीदा चारून माझ्याविरुद्ध उठविलेले आहे, त्यांनी माझ्यावर शस्त्र चालवून माझा घात केला. तर त्यात काय आश्चर्य? ताबडतोब महाराजांनी सेनापती बाळासाहेब राजे भोसले, यांच्याकडून स्वतःच्या सैन्याची कवाईत करविली, आणि आपण स्वतः सैनिकांच्या हातातली सर्व शस्त्रे काढून घेतली.

बाळासाहेब सेनापतीच्या कमरेची समशेर काढून घेऊन त्याला निःशस्त्र केले. राजवाड्यातल्या पटांगणातल्या सर्व तोफातील दारू काढून त्या पाण्याने धुऊन रिकाम्या केल्या आणि सर्व सातारा शहरभर निःशस्त्र सत्याग्रहाचा जाहिरनामा पुकारला. प्रजाजनांना आपल्या गळ्याची शपथ घालून महाराजांनी असे विनविले की आज रोजी कंपनीसरकारच्या गो-या सोजिरांनी जरी तुमची घरेदारे लुटली, तरी कोणीही आपला हात वर करता कामा नये. बांधवहो, निःशस्त्र सत्याग्रहाची मोहीम महात्मा गांधींच्याही पूर्वी शंभर वर्षे आपल्या प्रतापसिंह छत्रपतींनी एक वेळ या खुद्द साता-यात आणि तीही अशा काळात की हुं म्हणताच कंपनीच्या साथीदारांची व सैन्याची एकजात कत्तल करण्याची धमक मावळ्यांच्या मनगटात रसरसत होती, अशा स्थितीत शक्य करून दाखविली, हे ऐकून अंतःकरणात कौतुकाचा व अभिमानाच दर्या खळबळणार नाही, ते अंतःकरण मर्द मावळ्याचे नसून कारस्थानी भटाचेच असले पाहिजे. ता. ४ सप्टेंबर १८३९ ची संध्याकाळ झाली. आज बाळाजीपंत नातूच्या कारस्थानामुळे, सातारच्या राजधानीत शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा भर