हिंदवी स्वराज्याचा खून: Page 4 of 9

झाला. छत्रपतीच्या राजवाड्यातील अनेक प्रामाणिक नोकरांना पकडून, लाच देऊन, मारहाण करून नानाप्रकारचे खोटे दस्तऐवज पुरावे तयार केले, व रेसिडेंटापुढे खोट्या जबान्या देवविल्या. काही नातूच्या कारस्थानास बळी पडले व काही स्वामिनिष्ठेला स्मरून आनंदाने तुरुंगात खितपत पडले. बाळकोबा केळकर या कुबुद्धिमान गृहस्थाने बनावट सह्या शिक्के बनविण्याचे राष्ट्रीय कार्य हाती घेतले. प्रतापसिंह छत्रपति हा ब्राम्हणांचा भयंकर छळ करतो, या नाटकाची उठावणी चिंतामणरावाने आपलेकडे घेतली होती आणि या कामी त्यांनी शंकराचार्याच्या नरडीवरसुद्धा गुडघा देऊन खोटी आज्ञापत्रे बळजबरीने लिहून घेण्यास कमी केले नाही.

राजकारणाच्या बाबतीत छत्रपतीच्या गळ्यात कंपनीसरकारविरुद्ध गुप्तकटाची राजद्रोहाची घोरपड लटकविण्याचे पुण्य कार्य मात्र खुद्द महात्मा नातूंनी आपल्या हाती ठेवले होते. या कामी बनावट राजद्रोही पत्रे, खलिते, अर्ज्या या निर्माण करण्याच्या कामी हैबतराव व आत्माराम लक्ष्मण उर्फ अप्पा शिंदकर या दोघा ब्राम्हणेतर पात्रांना हाती धरून बाळाजी काशी किबे आपल्या कल्पनकतेची कसोशी करीत होता. अखेर नातू कंपूचे सर्व कारस्थान शिजून तयार झाले. गोव्याच्या पोर्जुगीज सरकारकडे प्रतापसिंहाने गुप्त संधान बांधून त्यांच्या मदतीने इंग्रजांना हुसकून देण्याच्या बनावट कटाबद्दल कंपनी सरकारच्या गव्हर्नराची `वेदोक्त’ खात्री पटली. ब्राम्हणांच्या छळाविषयी कंपनीसरकारने जरी कानावर हात ठेविले – कारण धार्मिक, सामाजिक बाबतीत तोंड न बुचकळण्याचा त्यांचा निश्चय जगजाहीरच – तरी पण छत्रपतीविरुद्ध स्वराज्यद्रोहाचा आरोप बळकट करण्याच्या कामी चिंतामणरावांचा राष्ट्रीय शंखध्वनी अगदीच काही फुकट गेला नाही. प्रतापसिंहास या सर्व गोष्टी कळत नव्हत्या, अशातली गोष्ट नव्हती. परंतु त्या वेळी घरभेदेपणा अतोनात माजल्यामुळे, आणि नातूच्या राष्ट्रीय पक्षाकडूनफंदफितुरीचा भयंकर सुळसुळाट झाल्यामुळे महाराजांच्या आत्मविश्वाने कच खाल्यास त्यात नवल ते काय? तथापि, काय वाटेल ते होवो आपण जर कोणाचे वाईट करीत नाही, सत्य मार्गाने जात आहोत आणि कंपनी सरकारशी कोणत्याही प्रकारे दुजाभावाने वागत नाही, तर माझे कोण काय वाकडे करणार? अशा प्रामाणिक समजुतीवर महाराजांनी नातुकंपूच्या वावटळीस तोंड देण्याचा निश्चय केला.

चिटणिसाची अचानक उचलबांगडी झाल्यामुळे त्यांचा धीर बराच खचला. सरतेशेवटी दैवावर हवाला ठेवून सत्यासाठी येतील ती संकटे निमूटपणे सहन करण्याचे त्यांनी ठरविले. ता. २२ ऑगस्ट १८३९ रोजी मुंबईचे गव्हरनर सर जेम्स कारनॅक आपल्या लवाजम्यानिशी नातूकंपूने शिजवून ठेवलेली गुप्त कटाची हांडी फोडण्यासाठी साता-यास येऊन दाखल झाले. महाराजांना निमंत्रण जाताच दुपारी तीन वाजता ते त्यांच्या भेटीस गेले. त्यावेळी त्यांचे झालेले संभाषण सारांशाने असे होते. –

सर जेम्स :- तुम्ही आमच्या विरुद्ध गुप्त कट चालविलेला आहे, आणि त्याचा सर्व पुरावा माझ्यापाशी आहे.

महाराज :- काय? आपल्याविरुद्ध मी गुप्त कट केला आहे? अगदी बनावट गोष्ट! आपण या बाबतीत वाटेल तर माझी उघड चौकशी खुशाल करावी.

सर जेम्स :- त्यात काय चौकशी करायची. ख-या गोष्टी मला सर्व माहीत आहेत. याउपर चौकशीची यातायात करण्याची आम्हाला जरूर नाही. आता आपल्या एकच मार्ग मोकळा आहे, आणि तो हाच की, मी सांगतो या जबानीपत्रकावर आपण मुकाट्याने सही करावी. घासाघीस करायला मला वेळ नाही.

महाराज :- आपल्याला वेळ नसेल तर मी सर्व कागदपत्र ओव्हन्स साहेबाला दाखवून त्यांची खात्री पटवून देईन. माझ्यावरील किटाळाचा समतोल बुद्धीने उघड न्याय व्हावा हीच माझी इच्छा आहे. कंपनी सरकारशी दुजाभावाने मी कधीही वागलो नाही. इंग्रज सरकारच्या मैत्रीसाठी मी विहिरात उडी घ्यायलाही कमी करणार नाही. परंतु माझ्या कल्पनेतही कधी न आलेल्या ज्या घाणेरड्या गोष्टी केल्याचा आरोप माझ्यावर आलेला आहे, त्याबद्दल माझा प्राण गेला तरी मी कबुलीजबाब देणार नाही. सत्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर!

सर जेम्स :- महाराज, मी काय म्हणतो ते मुकाट्याने करा. त्यात तुमचा फायदा आहे. नाहीतर तुमचे राज्य राहणार नाही हे लक्षात ठेवा.

महाराज :- मी राज्याची कधीच अपेक्षा केलेली नाही. इंग्रज सरकारच्या दोस्तीचा मात्र मी चाहता