हिंदवी स्वराज्याचा खून: Page 3 of 9

वेळी भिक्षुकशाहीने या साता-यात रायगडच्या स्वराज्याचा जसा मुडदा पाडला, तसाच उद्याच स्वराज्य मिळविण्यापूर्वी महाराष्ट्रांत शिल्लक उरलेल्या स्वराज्यद्रोही नातू संप्रदायाचा आपणास प्रथम बीमोड केला पाहिजे. नव्हे, असे केल्याशिवाय तुम्हांला स्वराज्यच मिळणे शक्य नाही.

बाळाजीपंत नातूचे चरित्र भ्रूणहत्या, स्त्रीहत्या, गोहत्या, राजहत्या, स्वराज्यहत्या, आणि सत्यहत्या असल्या कल्पनातीत महापातकांनी नुसते बरबटलेले आहे. अर्थात जोपर्यंत हा नातू, किबे केळकर अँड को. चा संप्रदाय महाराष्ट्रातून हद्दपार होणार नाही, तोपर्यंत आपल्याला खरेखुरे स्वराज्य लाभणार नाही. या संप्रदायाच्या स्वराज्यद्रोही लीला जर नीट विचारात घेतल्या नाहीत, तर तुमच्या पदरात पडणारे स्वराज्य म्हणजे ब्राम्हणभोजनातल्या खरकट्या पत्रावळी हे खूब ध्यानात ठेवा. छत्रपति प्रतापसिंहाने ब्राम्हणेतरांची सुरू केलेली चळवळ हाणून पाडण्यासाठी खुद्द त्यालाच पदभ्रष्ट करून मुळातलाच काटा उपटण्याची बाळाजीपंत नातूच्या राष्ट्रीय कंपूची जी तयारी झाली, तिकडे आपण आता वळू. हरप्रयत्नाने घरभेद करून फोडलेल्या अप्पासाहेब भोसल्याला ता. २४ मार्च १८३९ रोजी नातूने रेसिदंट ओवन्सच्या चरणांवर नेऊन घातले व त्याच्या झेंड्याखाली सर्व स्वराज्यद्रोही गुप्तकटवाल्यांची मर्कटसेना भराभर जमा केली. कंपनी सरकारच्या गव्हर्नरापर्यंत सर्वांना प्रतापसिंहाविरुद्ध चिथावून देऊन, हा राजा इंग्रजांचे राज्य उलथून पाडण्याचा गुप्त कट करीत आहे, आम्ही सर्व पुरावा आपल्याला देतो, माबाप कंपनी सरकारची आम्हाला पूर्ण मदत असावी, असा मंत्र फुंकून रेसिदंट ओवन्सला नातू कंपूने आपले तोंड बनविले. राजकीय बाब ओवन्सच्या मार्फत अशी पेटवून दिली, तो इकडे (अ) धर्ममार्तंड चिंतामणराव सांगलीकर यांनी वेदोक्त पुराणोक्त तंटा उपस्थित करून छत्रपतीच्या विरुद्ध, कंपनी सरकारकडे धार्मिक जुलमाबद्दल फिर्यादीच्या अर्जाची भेंडोळी रवाना करण्यासाठी आपली ब्राम्हणसेना जय्यत उभी केली. आज ज्याप्रमाणे ब्राम्हणेतरांविरुद्ध व विशेषतः सत्यशोधकांविरुद्ध अत्याचारांच्या खोट्यानाट्या फिर्यादीची दंगल उडालेली हे, त्याचप्रमाणे चिंतामणरावांच्या ब्राम्हणसैन्याने आपला शंखध्वनीचा संप्रदाय मोठ्या नेटाने चालू केला.

हे राष्ट्रीय ब्राम्हण नुसत्या कागदी अर्जाच्या कारस्थानावरच अवलंबून बसले नाहीत. निरनिराळ्या वेळी कंपनी सरकारच्या मोठमोठ्या अधिका-यांच्या छावण्यांपुढे हजारो ब्राम्हणांनी जमून जाऊन प्रतापसिंहाच्या विरुद्ध धार्मिक व सामाजिक अत्याचारांची अकांडतांडवपूर्वक कोल्हेकुई करण्याची सुरुवात केली. चिंतामणरावाने तर नातूचे व्याही कुप्रसिद्ध नीळकंठ शास्त्री थत्ते यांच्या अर्ध्वयुत्वाखाली ब्राम्हणेतरांना, विशेषतः मराठ्यांना व कायस्थ प्रभूंना `शूद्राधम चांडाळ’ ठरविणारे (अ)धार्मिक ग्रंथ लिहून प्रसिद्ध करण्याची एक मोठी गिरणीच सांगलीला काढली. छत्रपतीकडून होणा-या ब्राम्हणांवरील अत्याचारांच्या बनावट हकीकती जिकडे तिकडे बेसुमार पसरविण्याच्या कामगिरीने त्यावेळच्या ब्राम्हण स्वयंसेवकांनी अद्भूत `राष्ट्रीय’ कामगिरी बजावली. विशेष चीड येण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी या कृतघ्न ब्राम्हणांच्या बापजाद्यांची जानवेशेंडी रक्षण केली, त्याच शिवाजीचा अस्सल वंशज प्रतापसिंह छत्रपति हा `हिंदूच नव्हे, हा हिंदु धर्माचा वैरी आहे,‘ अशा अर्थाचे मोठमोठे जाहीरनामे चिंतामणराव सांगलीकराने शहरोशहरी व खेडोखेडी सर्व हिंदुस्थानभर फडकविण्यात बिलकूल कमतरता केली नाही! इतके झाले तरी नातूकंपूच्या मार्गात एक मोठा काटा अजून शिल्लकच होता, आणि तो मात्र कसल्याही लाचलुचपतीला बळी न पडण्याइतका भक्कम व सडेतोड होता. तो कोण म्हणाल, तर ज्याला आद्य छत्रपति शिवाजी महाराज `बाळाजी माझा प्राण आहे’ असे म्हणत असत, त्या बाळप्रभू चिटणिसाचा अस्सल वंशज बळवंतराव मल्हार चिटणीस हा होय. बळवंतराव जर आपल्या चिटणीशीवर चुकूनमाकून कायम राहता, तर त्याच्या चिटणीशी लेखणीच्या घोड्यांनी नातूकंपूच्या घरादारांवर गाढवांचे नांगर फिरविले असते! परंतु चित्पावनी काव्याची पोच जबरदस्त!

बळवंतरावांचा पराक्रम नातू जाणून होता. चिटणीस कायम असेपर्यंत छत्रपतीचा रोमही वाकडा होणार नाही, ही त्याची पुरी खात्री होती. चिटणीशी लेखणीपुढे परशुरामाच्या वरप्रसादाची पुण्याई वांझोटी ठरणार हा अनुभव त्याच्या डोळ्यांपुढे होता. म्हणून हा चिटणीशी कांटा उपटण्यासाठी नातूने कर्नल ओवन्सकडून बळवंतराव चिटणिसाला एकाकी अचानक पकडून बिनचौकशीचे पुण्याच्या तुरुंगात फेकून दिले. बिनचौकशीने अटक करण्याच्या ब्रिटिश नोकरशाहीच्या पद्धतीविरुद्ध `अन्याय’ `अन्याय’ म्हणून कोलाहल करणा-या राष्ट्रीयांनी आपल्या संप्रदायाच्या पूर्वजांचे हे हलकट कृत्य विचारात घेण्यासारखे आहे. चिटणीसाचा काटा अशा रीतीने उपटल्यावर नातूचा मार्ग बिनधोक