हिंदवी स्वराज्याचा खून: Page 2 of 9

प्रतापसिंह महाराजांनी हाती घेऊन दीनदुनियेला ब्राम्हणांच्या कारस्थानी भिक्षुकशाही बंडापासून मुक्त करण्याचा विडा उचलला. ब्राम्हणेतरांच्या अज्ञानावर मनमुराद चरण्यास सोकावलेल्या पेशव्यांच्या अभिमानी भिक्षुकांना महाराजांची ही चळवळ कशी बरे सहन होणार? ती हाणून पाडण्यासाठी भिक्षुकशाहीने कमरा कसल्या. त्यावेळी या कंपूचे पुढारपण स्वीकारण्यासाठी पुढे झालेले त्यावेळचे `लोकमान्य’ म्हटले म्हणजे पापस्मरण बाळाजीपंत नातू हे होत. इंग्रजांकडून मिळणा-या जहागिरीच्या लचक्याला लालचटलेल्या ज्या अधमाने स्वजातिवर्चस्वाच्या शनवारवाड्यावर इंग्रजांचा बावटा फडकवायला मागेपुढे पाहिले नाही तो चांडाळ, छत्रपतीच्या ब्राह्मणेतर संघाला उन्नतीचा एक श्वास देखील कसा घेऊ देईल? असले हे लोकमान्य नातू शेंडी झटकून पुढे सरसावताच त्यांच्या पाठीमागे चिंतामणराव सांगलीकर, बाळाजी काशी किबे, बाळंभट जोशी, बाळकोबा केळकर, नागो देवराव, भोरचे पंत सचिव, कृष्णाजी सदाशिव भिडे, सखाराम बल्लाळ हाजनी, महादेव सप्रे, भाऊ लेले, (एक मावळा – अर इचिभन! हत बी भाऊ लेल्या?) असले हे अस्सल ब्राम्हण वीर प्रतापसिंह छत्रपतीची चळवळ आमूलाग्र उखडून टाकण्यासाठी कमरा कसून सिद्ध झाले. परंतु ही सर्व सेना जातीची पडली ब्राम्हण, एकरकमी चित्पावन, अस्सल राष्ट्रीय. तेव्हा आपल्या पक्षाला `सार्वजनिकत्व’ आणण्यासाठी बाळाजीपंतांना एखाद्या फुल्याची गुंजाळाची किंवा औट्याची फारच जरूर भासू लागली. लवकरच परशुरामाच्या कृपेने बाळाजीपंतांच्या या राष्ट्रीय चळवळीत एक बिनमोल ब्राम्हणेतर प्यादे हस्तगत झाले. ते कोणते म्हणाल, तर खुद्द प्रतापसिंहांचे धाकटे भाऊ आप्पासाहेब भोसले.

खुद्द राजघराण्यातलाच असला अस्सल मोहरा राष्ट्रीय चित्पावनी मंत्राच्या जाळ्यात सापडताच नातूच्या राष्ट्रीय कटाला सार्वजनिकपणाचे स्वरूप तेव्हाच आले आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या बगलेत शिरून या राष्ट्री नातूकंपूने इंग्रजांच्या हातून छत्रपतीच्या सिंहासनाचे परस्पर पावणेतेरा करण्याची आपली कारवाई सुरू केली. या कामी त्यानी एकदोन शंकराचार्यसुद्धा बगलेत मारले. नातूंनी विचार केला, की हा मरगट्टा छत्रपति ब्राह्मणेतरात धार्मिक आणि सामाजिक जागृती करून आम्हा भूदेवांचे वर्चस्व कढीपेक्षाही पातळ करणार काय? थांब लेका! तुझ्या सिंहासनाच्या खालीच माझ्या चित्पावनी कारस्थानाचा बांब गोळा ठेवून, कंपनी सरकारच्या हातूनच त्याचा स्फोट करवितो, मग पहातो तुझ्या ब्राम्हणेतरांच्या उन्नतीच्या गप्पा! बांधवहो, कोल्हापुरच्या श्रीशाहू छत्रपतींना `स्वराज्यद्रोही’ ठरविण्याची केसरीकारांची राष्ट्रीय चतुराई आणि प्रतापसिंहाला गुप्त कटाच्या फासात अडकवून जिवंत गाडण्याची नातुशाही या दोन्ही गोष्टींचा मसाला एकाच राष्ट्रीय गिरणीचा आहे, इतके आपण लक्षात ठेवले म्हणजे झाले. नातूकंपूत सामील झालेल्या या सर्व पंचरंगी राष्ट्रीयांनी कंपनीसरकारच्या गव्हर्नरापासून तो थेट सातारच्या रेसिडेंटापर्यंतच्या सर्व पात्रांच्या नाकात आपल्या कारस्थानाची वेसण `खूप शर्तीने’ घातली. अर्थात् सर जेम्स कारनाकपासून तो थेट रेसिंडेट कर्नल ओव्हान्सपर्यंत सगळी बाहुली लोकमान्य नातूंच्या सूत्राच्या हालचालीप्रमाणे `लेफ्ट राइट’ `लेफ्ट राइट’ करू लागली.

या पुढचा इतिहास अत्यंत भयंकर आणि मानवी अंतःकरणास जाळून टाकण्यासारखा आहे. पंरतु तो प्रत्यक्ष घडवीत असताना मात्र बाळाजीपंत नातू किंवा चिंतामणराव सांगलीकर यापैकी एकाचेही अंतःकरण चुकूनसुद्धा कधी द्रवले नाही. राष्ट्रीय अंतःकरण म्हणतात ते हे असे असते. अनुयायांची गोष्ट काय विचारावी? जेथे खुद्द आप्पासाहेब भोसले, राज्यलोभाने सख्या भावाच्या गळ्यावर सुरी फिरविण्यास सिद्ध झाला, तेथे आपल्य सद्सद्विवेक बुद्धीची मुंडी पिरगळताना इतरांना कशाची भीती? प्रतापसिंह महाराजांनी भिक्षुकशाहीचे बंड मोडून ब्राम्हणेतरांना धार्मिक व सामाजिक स्वातंत्र्य देण्याची चळवळ हाती घेताच, बाळाजीपंत नातूच्या उपरण्याखाली जे राष्ट्रीय कुत्र्यांचे सार्वजनिक मंडळ जमा झाले, त्याला एवढीही कल्पना भासू नये काय, की आपल्या या उलट्या काळजाच्या कारस्थानामुळे श्रीशिवछत्रपतीच्या हिंदवी स्वराज्याचे सिंहासन आपण जाळून पोळून खाक करीत आहोत? महाराष्ट्राच्या मानेवर सुरी फिरवीत आहोत? जाणूनबुजून क्षुल्लक स्वार्थासाठी फिरंगी आपल्या घरात घुसवीत आहोत? आजला त्याच हरामखोर नातूचे सांप्रदायिक जातभाई करवीरकर छत्रपतींना `स्वराज्यद्रोही छत्रपति’ म्हणून शिव्या देण्यास शरमत नाहीत. या वरून एवढेच सिद्ध होते की, बाळाजीपंत नातूचा स्वराज्यद्रोही संप्रदाय अजून महाराष्ट्रात जिवंत आहे. आम्हाला जर स्वराज्य मिळवावयाचेच असेल, आमचे उद्याचे स्वराज्य चिरंजीव व्हावे अशी जर तुमची इच्छा असेल, तर प्रतापसिंहाच्या