हिंदवी स्वराज्याचा खून

या लेखात तत्कालीन ब्राम्हणी कारस्थानामुळे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्यावर ओढवलेली परिस्थिती प्रबोधनकारांनी कथन केली आहे. दिनांक २९ एप्रिल १९२२ रोजी सातारा येथे श्री शिवजयंतीच्या प्रसंगी प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलेले हे व्याख्यान ‘विजयी मराठा’मध्ये प्रसिद्ध झाले होते.

भगिनीबांधवहो, आज पण पुण्यश्लोक श्रीशिवाजी महाराज यांचा जन्मदिवस साजरा करण्याकरिता जमलो आहो. आजचा दिवस अत्यंत मंगल, अत्यंत पवित्र आणि स्फूर्तिदायक असा आहे. या दिवशी गुलाम महाराष्ट्राला स्वतंत्र करणारा, नामर्द मराठ्यांना मर्द बनविणारा आणि नांगरहाक्या अनाडी शेतक-यांतून भीष्मार्जुनकर्णापेक्षाही सवाई भीष्मार्जुन निर्माण करणारा राष्ट्रवीर जन्माला आला. अर्थात अशा मंगल प्रसंगी `शिवरायास आठवावे’ या विषयानुरुप शिवचरित्राबद्दल मी काही विवेचन करावे, अशी आपली अपेक्षा असणे साहजिक आहे व तसा माझाही उद्देश होता. परंतु पाडळीला मोटारीत बसून मी साता-याकडे येऊ लागताच माझा तो बेत बदलला.

शिवरायास आठवता आठवता सबंध शिवशाहीचा चित्रपट माझ्या अंतचक्षुसमोर भराभर फिरू लागला; आणि सातारच्या या निमकहराम स्वराज्य द्रोही राजधानीत मी येऊन दाखल होताच, शिवाजीने स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अंतकाळचा भेसूर देखावा मला स्पष्ट दिसू लागला. बांधवहो, आपण सातारकर असल्यामुळे आपल्याला साता-याचा अभिमान असणे योग्य आहे. क्षमा करा, मला तितका त्याचा अभिमान नाही. सातारा ही पापभूमी आहे. सातारा ही हिंदवी स्वराज्याची –हासभूमी आहे. रायगडावर उदय पावलेल्या हिंदवी स्वराज्याचा सूर्य या साता-यास अस्त पावला. रायगडाला जन्माला आलेल्या स्वराज्याच्या नरडीला नख देऊन भिक्षुकशाहीने या साता-यास त्या स्वराज्याचा मुडदा पाडला. दिल्लीच्या मोंगल बादशाहीच्या सिंहासनाला गदगदा हलवणारा, इतकेच नव्हे, तर अटकेपार रूमशामच्या बादशाही तक्ताचा थरकाप उडविणा-या हिंदवी स्वराज्याचे रक्त या साता-याच्या पापभूमीवर सांडलेले आहे. शिवछत्रपतीच्या विश्वव्यापी मनोरथाचा ज्या भूमीत नायनाट झाला, त्याच भूमीवर उभे राहून आजच्या मंगल प्रसंगी पुण्यश्लोक शिवरायाचे गुणगायन करण्यापेक्षा, आमचे हिंदवी स्वराज्य का नष्ट झाले, त्याच्या गळ्याला कोणकोणत्या अधमांनी नख लावले आणि भिक्षुकशाहीने कोणकोणती घाणेरडी कारस्थाने करून आमच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा मुडदा या साता-यात पाडला, त्याचा आज जर आपण इतिहासाच्या आधाराने विचार केला, तर सध्याच्या स्वराज्योन्मुख अवस्थेत आपल्याला आपल्या कर्तव्याची पावले नीट जपून टाकिता येतील.

स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असली तात्त्विक पुराणे सांगणारे टिळकानुटिळक आज पैशाला खंडीभर झाले आहेत. परंतु त्याच जन्मसिद्ध हक्कावर रखरखीत निखारे ठेवण्यास ज्या हरामखोरांची मनोदेवता महाराष्ट्रद्रोहाचा व्यभिचार करण्याचे कामी किंचितसुद्धा शरमली नाही, त्यांचा खराखुरा इतिहास उजेडात आणणारे मात्र आपल्याला मुळीच भेटणार नाहीत. आज स्वराज्य शब्दाचे पीक मनमुराद आलेले आहे. फंडगुंडांच्या पोतड्या भरण्यासाठी स्वराज्य हा एक ठगांचा मंत्र होऊन बसला आहे. परंतु स्वराज्य म्हणजे काय याची व्याख्या मात्र कोणीच स्पष्ट करीत नाही. अशा प्रसंगी आपले हिंदवी स्वराज्य आपण का गमावले, याचा नीट विचार केल्यास सध्या महाराष्ट्रभर धुमाकूळ घालीत असलेल्या राष्ट्रीय गुंडांच्या स्वराज्यविषयक चळवळीत ब्राम्हणेतर संघाने किती जपून वागले पाहिजे याचा खुलासा तेव्हाच होईल. राष्ट्रीयांची स्वराज्य-पुराणे म्हणजे गांवभवानीची पातिव्रत्यावरील व्याख्याने आहेत; कारस्थानी वेदांत आहे; ठगांची ठगी आहे; स्वार्थसाधूंचा मायाजाल आहे. शिवरायास आठवावे; गोष्ट खरी! परंतु आज शिवछत्रपतींचे स्मरण होताच त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या -हासाचे पृथक्करण करण्याकडे आपली स्मरणशक्ती वळते, त्याला इलाज काय? तेव्हा आपण आता छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या कारकीर्दीकडे वळू. प्रतापसिंह हे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीचे करवीरकर शाहू छत्रपती होते. १८१८ साली रावबाजीचे व त्याबरोबर पुण्यातल्या पेशवाईचे उच्चाटण पापस्मरण बाळाजीपंत नातूंनी केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने प्रतापसिंह महाराजांना त्यांच्या पूर्वजांच्या सिंहासनावर स्थापन केले. यापूर्वी याच अजिंक्यता-याच्या किल्ल्यावर प्रतापसिंह महाराजांना निमकहराम कृतघ्न पेशव्यांनी सहकुटुंब सहपरिवार अनेक वर्षे कैदेत ठेवलेले होते.

सिंहासनाधिष्ठित होताच, महाराजांनी राजकारणाची यंत्ररचना ठाकठीक बसविल्यानंतर, ब्राम्हणेतरांच्या सामाजिक व धार्मिक उन्नतीचा प्रश्न हाती घेतला. थोडक्यात सांगायचे म्हणजे ब्राम्हणेतरांच्या उन्नतीचा जो प्रश्न करवीरकर छत्रपतींनी सध्या हाती घेतलेला आहे, तोच प्रश्न