बावला-मुमताज प्रकरण: Page 10 of 19

तर आरोपीला ब्रिटीश पोलीसांच्या हवाली करणें किंवा साफ नाकारणें त्या राजाच्या खुषीवर असते. आरोपींना पकडण्यासाठीं सुटलेलीं एक्स्ट्राडिशन वारंटें म्हणजे इंग्रेजांकडून होळकर सरकारच्या मानेला लावलेला जरबेचा चाप, अशी कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे. होळकरांना वाटलें असतें तर हीं वारंटें गेलीं तशीं फेटाळून लावणें त्यांना मुळींच कठीण नव्हतें. गोवा पांदीचरी सारख्या प्रदेशांत किंवा संस्थानी हद्दींत आरोपी आश्रयाला पळून जातात ते याच आधारावर, कीं वेळ आली तर तेथें कांहीं तरी धडपड करून ब्रिटीश हद्दींतील वारंटें फेटाळून लावता येतात; निदान तहनाम्याच्या अटींचा कीस काढीत महिना दोन महिनें सहज डांगळत ठेवतां येतात. संस्थानी हद्दींत ब्रिटीशांचा वाटेल तो उघड किंवा गुप्त पोलीस बिगर परवानगी जाऊन वाटेल त्याला पकडूं म्हणेल किंवा वाटेल त्याची झडती घेंऊ म्हणेल तर तें शक्यच नाहीं. इंदोरासच हें ‘ आव जाव घर तुम्हारा ’ काय म्हणून ? हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचाच विवेकानें नीट विचार केला पाहिजे. मुंबईचीं पकड वॉरंटे घेऊन पोलीस इंदोरास जातांच महाराजानीं ताबडतोब त्यांना वाटेल ती चोकशी करण्याची सर्रास परवानगी दिली. आरोपी असतील त्यांना पकडा आणि चालते व्हा, असाहि निर्बंध त्यांनीं घातला नाही. ओळख पटविण्यासाठीं ले. सीर्गाटला पोलीसनें नेलें तेव्हांहि शहरभर वाटेल तेथें फिरण्याची व वाटेल त्याविषयीं विचारपूस करण्याची त्यांना सवलत दिली. आपले सीएडी लोक, इन्स्पेक्टर जनरल व मोटारी त्यांच्या मदतीला दिल्या. इतकेंच नव्हे तर अडज्युटंट जनरल फणसे या पोलीसांना तीन दिवस सांपडले नाहींत; तेव्हां खुद्द महाराजांनीं शोधून काढून त्याला पकडून स्वत: मुंबई पोलीसांच्या हवालीं केलें. महाराजांच्या बेजबाबदार टीकाकारांना फणसे किंवा दिघे यांची आज कांहीं किंमत वाटत नसली, तरी फणसे अडज्युटंट जनरल व दिघे कॅपटन एअर फोर्स असे मोठे जबाबदार अधिकारी होते. जे होळकर महाराज मुंबई सरकारची मागणी होतांच असले मोठेमोठे जबाबदार जागेवरील अधिकारी आपण होऊन बिनतक्रार मुंबई पोलीसांच्या हवाली करतात, ते न्यायाला मदत व्हावी म्हणून ? कां खुनाच्या कटाचे आद्याप्रवर्तक म्हणून ? याचा विवेकानेंच विचार केला पाहिजे. महाराजांवर शिखंडीपणाने खुनाचा आरोप लादूं पहाणा-या शहाण्यांनीं या त्यांच्या वर्तनाचा विचार केला तर भिक्षुकी व कारस्थानी पत्रांनीं त्यांच्या मनांत कालविलेला खुनाशीपणाचा अंमल खास कमी झाल्याशिवाय राहणार नाहीं. आजहि मुंबई पोलीसाला इंदोरचे दरवाजे सताड मोकळे ठेवलेले आहेत. ‘ या, वाटेल तो तपास वाटेल तसा करा आणि जा. ’आम्हांला असें वाटतें कीं न्यायाच्या बाबतींत इतकी मुबलक सवलत व इतकी खास मदत देशी संस्थानिकाकडून मिळाल्याचें हे पहिलेंच उदाहरण आहे. आपल्या राज्यांतील अपराध्यांना फांशीची शिक्षा ठोठावण्याचाहि ज्यांचा अधिकार, त्या होळकर महाराजावर एका क्षुद्र इसमाच्या खुनाचा आरोप करणारांनीं आपलें विचार यंत्र कोणत्या विकारांनीं गंजड बनलें आहे, याचा नीट तपास करून घ्यावा, यापेक्षां बेजबाबदार खुनशी प्रवृत्तीला आणखी कोणत्या सौम्य शब्दांत प्रार्थना करावयाची ? कटवाल्यांचें स्मारक तरी करा. बावला खुनाच्या पराचा कावळा करुन होळकर सरकारच्या रक्तानें आपली राजक्रांतीची रुधिरलालसा शांत करुं इच्छिणा-यांना आणि ‘ बावलायन ’ रचून रामायणाची किंमत फाटक्या पायतणाची ठरविणा-या बुद्धिभ्रष्टांना आमचा एकच सवाल आहे. डोकेबाज (clear headed ) महामाया मुमताज, नऊ आरोपी, गाडाभर साक्षीदार, अडव्होकेट जनरल किंवा न्यायमूर्ती यांपैकी एकानेंहि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, हळूं किंवा मोठ्यानें, जिभघसरीनें किंवा नारोशंकरी घंटानादाने ‘ मुमताज ही महाराजांची रखेली होती ’ यापलीकडे अधिक कोणताहि संदर्भ महाराजांविषयीं केव्हाहि व्यक्त केलेला नाहीं. खुद्द फणशे म्हणतो कीं, ‘ मी हा सर्व व्युह माझा मित्र जो शंकरराव गावडे त्याच्या हितासाठीं व माझ्या भाग्योदयासाठीं रचला. ’ तोहि महाराजांचें नांव घेत नाही. किंवा त्यांचा कसलाहि संबंध दर्शवीत नाहीं. आज या सर्व आरोपींच्या माना फासावर लटकल्या आहेत. काळ त्यांच्यापुढें आ पसरून उभा आहे. त्यांच्या सर्व आयुष्याची