बावला-मुमताज प्रकरण: Page 9 of 19

म्हणजे व्यभिचारिणी बायकोचा खून करून येणा-या नवरोबाला मुंडासें घोंगडें पांघरुन त्याचा गौरव करणा-या पेशवाईला हसायला जागाच उरत नाहीं ! आणि काय म्हणतात ? ‘ या बाबतींत कोणी कितीहि मोठ्या दर्जाचा मनुष्य असला तरी त्याचाहि सरकारनें मुलाजा राखतां कामा नये.’ याचा असा ध्वनि निघतो कीं या खुनाच्या मुळाशीं खुद्द इंदोराधिपति श्रीमंत तुकोजाराव होळकर आहेत. पण तसें स्पष्ट कोणी कां बोलत नाहीं ? स्पष्टवक्तेबाजीची घमेंड असणा-यांनीं वास्तविक हा आरोप स्वत: पुढें येऊन धैर्यानें उघड करावा आणि आपल्या विधानाचा पुरावा पटविण्यासाठीं सरकारला खुशाल उघड मदत करावी. तसें न करतां भाषाबाजीचे हे पारदर्शक शिखंडी डांवपेच कशाला ? या डांवपेचांमुळे मुंबईच्या धूर्त व धाडसी पोलीस अधिका-यांनीं आतांपर्यंत केलेल्या श्रमांवर निष्कारण काळीमा फांसला जात आहे. इतकेंच नव्हे तर त्यांनी चोर सोडून संन्याशांना फांसावर लटकविण्याचा घोर अपराध केला आहे, असा अप्रत्यक्ष आरोप त्यांच्यावर सिद्ध होऊं पहात आहे. याबद्दल योग्य त्या रीतीनें आपला निषेध व्यक्त करण्यास तें खातें खंबीर आहे. या बाबतींत संस्थानद्वेष्ट्या भिक्षुकी पत्रकारांनीं, हिंदुद्वेष्ट्या इस्लामी पत्रकारांनीं आणि टैम्स सारख्या हिंदद्वेष्ट्या आंग्रेजी पत्रांनीं लोकमत इतकें बेफाम भडकविलें आहे कीं आज त्याला विवेकाचा कांहीं बंधच उरलेला नाहीं. जागृतिकार म्हणतात त्याप्रमाणें हें लोकमत नसून लोकमताचा उकीरडा आहे. या उकीरड्याला फुंकण्याइतका गाढवपणा करणारे कोण सज्जन पुढें येतात तेंच पाहणें आहे. ज्यांची विवेकाची दृष्टीच फुटली त्यांना सारासार तारतम्य विचार तरी कसचा सुटणार ? स्वराज्याच्या नांवाखालीं देशांत जो भयंकर सांवळा गोंधळ राजकारणी पुढा-यांनीं माजविला आहे, त्याची फलश्रुति सध्यां एवढीच दिसते कीं देशांत एक प्रकारचा खुनशीपणा मात्र बेफाम बोकाळला आहे. इंग्रजी सत्तेच्या नरडीचा चावा घेतल्याशिवाय या खुनाशी प्रवृत्तीचें समाधान होणार नाहीं. डोळ्यावर खून चढलेला मनुष्य जसा आपपर भेदाला पूर्ण पारखा होतो, तीच रुधिरलालसा भिक्षुकीपत्रांनी प्रस्तुत प्रकरणांत उत्पन्न केलेली आहे. ब्रिटिश सत्तेच्या सिंहासनाच्या ठिक-या होतील तेव्हां होतील ; पण सध्यां एका देशी संस्थानाचें वाटोळें करण्याची खरी खोटी कच्ची पक्की संधी आली आहे ती तरी कां हातची दवडा ? या शिवाय सध्यांच्या लोकमताचें आणखी निराळें स्वरूप काय आहे ? या असल्या खुनाशी लोकमतानें पाघळण्याइतकें ब्रिटिश सरकार आजच इतकें नादान बनलें असेल असें आम्हांला वाटत नाहीं. एका उलट्या काळजाच्या छिनाल रांडरु पायीं एका विषय लपट खुशाल चेंडूचा खून होतो काय आणि त्यासाठीं गुन्हेगार लोकांची सर्व तपासणी सुनावणी शिक्षा वगैरे पद्धतशीर कायद्यानें होऊन, पुन्हां इंदोराधिपतीलाहि तोफेच्या तोंडी दिल्याशिवाय आमच्या जिवाची तळमळ शांत होणार नाहीं, असा लोकमताचा रंग भिक्षुकीपत्रें व्यक्त करतात काय, याची वास्तविक लोकांनाच चिळस आली पाहिजे. वाटेल त्या खोडसाळ भावनांचा रंग चोपडून लोकमत जर असें बेजबाबदार रीतीनें व्यक्त होऊं लागले, अगर कोणी तें तसें करण्यास धाडसी यत्न करील, तर त्याचा वेळींच बंदोबस्त लोकांनींच न केला तर लोकमत म्हणजे वाटेल त्या कटवाल्याचें एक मोफत मिळणारें भांडवल होऊन बसेल, याची विवेकी सज्जनांनीं वेळींच दक्षता ठेवावी, अशी प्रार्थना आहे. विवेकानें सर्व स्थिती पहा. खुनशी मनोवृत्तीचें क्षेत्र सोडून शांतपणानें व विवेकानें सर्व स्थिति पाहिली तर काय निष्कर्ष निघतो तो पाहिला पाहिजे. खून होतांच मुंबई पोलीस खात्यानें झटपट सर्व धागेदोरे जमऊन इंदोरकडे मोर्चा वळविण्यासाठीं पकड वारंटें मिळविली. इंदोर संस्थान हें ब्रिटिशांच दोस्तराष्ट्र आहे. त्या राष्ट्राधिपतीची परवानगी मिळाल्याशिवाय मुंबई पोलीसाला तेथें पाऊलहि टाकतां येणार नाहीं. न्यायाला मदत व्हावी म्हणून एकमेकांच्या हद्दींतील आरोपी एकमेकांस द्यावें असे परस्पर करारमदार झालेला असेल, तरी पुढें केलेल्या ( prima facie ) पुराव्यावरून अमुक एक आरोपीवर गुन्हा शाबीत होऊं शकतो कीं नाहीं हें ठरविण्याचें काम त्या राष्ट्रांतल्या मॅजिस्ट्रेटाचे व आधिपतीचें आहे ; आणि त्यांच्या मनानें आरोप सिद्ध होण्याइतका पुरावा नसेल