बावला-मुमताज प्रकरण: Page 8 of 19

जास्तींत जास्त गंधाचे रोळे व सुगंधी तेलें विकणा-या कंपूपलीकडें मुळींच नाहीं, असले लोक स्वत:चा दर्जा विसरून जेव्हां मोठमोठ्या अधिका-यांवर एडिटरकीच्या घमेंडिनें अद्वातद्वा कलमकसायीपणा गाजवतात, तेव्हां त्यांना कोणी भुंक-या कुत्र्याची उपमा दिली तर त्यांत चुकलें कोठें ? आज महाराष्ट्रांतल्या अनेक पत्रांचे एडीटर ‘ मागता येईना भीक तर एडीटरकी शीक ’ याच उत्पत्तीचे आहेत, हे ब्रिटिश सरकारच्या, सीएडी खात्याला पूर्ण माहीत आहे. महाराष्ट्रीय वृत्तपत्रांच्या कोल्हेकुईला सरकार मुळींच वचकत नाहीं याचें कारण हेंच कीं तें या कलमकसायांच्या बेजबाबदार चारित्र्याला पूर्ण पार खून बसलें आहे. आणि जनतेलाहि या एडीट-या व्यक्ती काय शिलामोलाच्या आहेत हें माहीत नसतें एसेंहि नाहीं. स्वाध्यायशील, विवेकी, नीतिमान् व जबाबदारींने जनमताला सात्विक वळण देण्याची पात्रता कमविलेले आचार विचार संपन्न लोक महाराष्ट्रीय जरनॅलिझलच्या क्षेत्रांत मोजूं म्हटलें तर एकाच पंजाची बोटें खास पुरतील. बाकी जिकडे पहाल तिकडे अनधिकारी कलमकसायांचा सुळसुळाट ! इतर क्षेत्रांप्रमाणेंच या थोर दर्जाच्या क्षेत्रांतहि भटाभिक्षुकांच्या बेकार बाजारबुणग्यांनीं बेगुमान बेरडगिरी माजविली आहे. प्रथम पासूनच हें क्षेत्र भिक्षुकांनीं सर केलेलें, त्यांत आतां राजद्रोहाच्या, सत्याग्रहाच्या, गुप्त कटांच्या, खोट्या चेकांच्या वगैरे अनंत अपराधांनीं डागळून लोकव्यवहारांत जवळजवळ बहिष्कृत पडलेल्या भिक्षुक तरुणांचा अमर्याद सुळसुळाट झाल्यामुळें, महाराष्ट्रीय जरनॅलिझम म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्यांचा पांजरापोळच म्हटला तरी चालेल. अशा या बेजबाबदार क्षुद्र व्यक्तींनीं इंदोराधिपति होळकरासारख्या स्वतंत्र व स्वयंनिर्णयी नृपतीची वाटेल त्या विभत्स रीतीनें निर्भत्सना करण्यास उद्युक्त व्हावें, हा नि:संशय नैतिक अध:पात होय. कोठें होळकर आणि कोठें हे पत्रकार ! काय पत्रकार झाला, म्हणजे ब्रह्मदेव झाला, का गव्हर्नर झाला, कां व्हाईसराय झाला, का बादशहा झाला ? रस्त्यावरचा टाळाचावीवाला जरा अरे म्हणतांच खाडकन खेटरानें तोंड रंगवून लहर लागली तर ‘ कारे ’ म्हणतो आणि हे पत्रकार इंहोराधिपतीच्या निर्भत्सनेंत एकहि नवी जुनी शिवी शिल्लक ठेवीत नाहींत ! ‘ कुत्तर भुकत वाको भुकवा दे ’ असें म्हणून हत्ती जरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, तरी भुंकण्याचा एकच हलकल्होळ उडाला म्हणजे सहजच जाणारा येणा-याला एखादा सणसणीत टोला त्या कुतरड्याच्या टाळक्यांवर हाणणें भाग पडतें. असले हे बेजबाबदार भिक्षुकपत्रकार म्हणे राजकरणी चर्चा करणार आणि देशाला स्वराज्य मिळवून देणार ! ज्यांना देशी संस्थानधिपतींच्या अधिकाराची व योग्यतेची जाणीवच नाहीं, त्यांनीं राजकारणीपणाची पोरकट मिजास तरी मिरवूं नये. इंदोर कोल्हापूरचे महाराज म्हणजे मुंबईचे व्हिक्टोरीयावाले, का पिठे फोडून देशभक्ती गाजविणारे असहकारवादी ? काय समजतात काय, हे पोटभरू पत्रकार ? गो-या सार्जंटाच्या गो-यामो-या चेह-याच्या कदरीखालीं शिस्तीचे पाठ घेत आयुष्य कंठणा-या क्षुद्रांनीं देशी संस्थानाधिपतींच्या राज्यकारभारावर किंवा त्यांच्या अधिकारावर बेजबाबदार टीका करण्यापूर्वी स्वत:च्या लायकीची अजमावणी केल्यास निदान माणुसकीचा तरी आपणांस अभाव नाहीं, एवढें तरी त्यांना कळेल. ब्रिटिश साम्राज्यांत देशी संस्थानिकांचा दर्जा काय आहे व त्यांना कोणत्या व कोणच्या कायद्यांचे बंधन आहे किंवा नाहीं, हे ब्रिटिश मुत्सद्दी व पार्लमेंट जाणून आहेत. कटवाल्या चिंधोट्या धांदोट्यांची कोल्होकुई ऐकून ते जर ढुंगाचें डोक्याला गुंडाळून नाचूं लागले, तर ते काय भिक्षुक आहेत होय ? ज्यांना स्वदेशीयांच्या अधिकाराची व योग्यतेची चाड नाहीं, त्यांना या जगांत कोण किती किंमत देणार व काय लायकीचे लेखणार याचा विचार झालेला बरा. खुनशीपणाची परासीमा. बावला खुनीचा खटला सेशन कोर्टाच्या शेवटच्या शिगेला जाऊन कटवाल्यांचा लागायचा तो सोक्षमोक्ष लागला. तरी म्हणे या कंटातले पुढारी अजून सांपडले नाहींत आणि सरकारने या बाबतींत आणखी कसून चौकशी करावी. मग आतांपर्यंत झालें तें काय ? कटाचा पुढारी फणशे यानीं कटाचा उद्देश व त्याबद्दलची सर्व जबाबदारी व प्रेरणा आपली स्वत:ची, असा स्पष्ट व सडेतोड जवाब देऊन जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षाहि पत्कारली. तरी म्हणे पुढारी सांपडलाच नाहीं. असला आंधळ्या कोशिंबिरीची खेळ ब्रिटिश रियासतींत हाच पहिला दिसतो. हा पाहिला