बावला-मुमताज प्रकरण: Page 6 of 19

नाटक शाळेचा मान मिळाला. तेव्हा ती रखेली होती. पण तिने बावलाकडे प्रयाण करताच ती उघडाउघड वेश्या बनली. हाहि एक गुप्तकटच दिसतो. बावला सारखी एक श्रीमान परंतु क्षुद्र वर्तनाची व्यक्ती ती काय आणि त्याच्या खुनामुळे वर्तमानपत्रात चाललेली बोंबाबोंब केवढी ! हा सर्व प्रकार पाहिला की बावला हा या पत्रकारांचा कोणी थोर पूर्वज, मुंबईचा प्राण, ब्रिटिश राजसत्तेच्या दण्डधारी, हिंदु मुसलमानांचा जगतगुरु, श्रीराम पैगंबराचा अवतार की कोण ? असा प्रश्न उदभवतो. एवढा मोठा लोकप्रिय कलेक्टर जॅकसन ठार मारला गेला आणि व्हाइसरॉय लॉर्ड हार्डीजवर बॉबचा मारा झाला, त्या वेळी सुद्धा मुंबईच्या पत्रांनी-व विशेषत: मराठी पत्रांनी-एवढा गुजराथी ऊर बडवून घेतल्यचे आठवत नाही. तेव्हा चाललेला हा सारा प्रकार म्हणजे ब्रिटिश राज्यातला एक काही तरी गुप्तकट असावा असे आम्हास वाटते. त्या शिवाय या क्षुद्रसामान्य गोष्टीचा एवढा गाजावाजा भिक्षुकी व इस्लामी पत्रांनी करण्याचे काहीच कारण दिसत नाही. बॉम्बे क्रॉनिकल सारख्या स्वराज्यपक्षीय पोशींद्या इस्लामी पत्राने या शंखध्वनीत विशेष अहमहमिकेने भाग घेतला आहे आणि मुंबईच्या बहुतेक सर्व भिक्षुकांनी आपापल्या पत्रांत दररोज बावलाचे पितृवत् तर्पण चालविले आहे. या सर्व भानगडी जरी वरवर सत्यशोधनाच्या व लोकशाहीच्या इस्लामी व भिक्षुकी बुरख्याने आपादमस्तक लपेटलेल्या दिसतात, तरी तो बुरखा इतका विरळ व पारदर्शक आहे की या सर्व एडीटरांच्या लेखणीच्या दो-या कोणी पटाइत गुप्तकटवालेच हालवीत आहेत, असा दाट संशय आल्याशिवाय रहात नाही. नुकतेच हैदराबादच्या निझामसाहेबांविरुद्ध गुलबर्गा प्रकरणावरुन खालसातले हिंदु जनमत खवळले होते व आजहि ते तसेच आहे. बावला खुनाच्या क्षुद्र परांचा कावळा करुन इंदोर प्रकरणावर आग पाखडण्याचा क्रॉनिकली उपव्द्याप म्हणजे निजाम निंदेच्या इस्लामी सुडाचा एक आडाखेबाज डाव नाही कशावरुन ? खिलापत चळवळीचा इतिहास ज्यांच्या स्मरणात ताजा असेल आणि सध्या संघटनाविरुद्ध मौलाना मौलवीचे जे लहान मोठे उघड गुप्त प्रयत्न धडाक्याने सुरु आहेत, त्यांकडे ज्यांचे अवमान असेल, त्यांना आमच्या या म्हणण्याचा गूढार्थ विशेष स्पष्ट करून सांगितलाच पाहिजे असे नाही. गुलबर्गा प्रकरणाने खवळलेल्या हिंदुजनमसात निजामचे हैद्राबाद कोपरखळीला विशेष कणखर लागल्यामुळे त्या बाबतीतील चर्चा चातुर्मास्यांतल्या पुराणाइतकीच अल्पायुषी झाली; परंतु इंदोर संस्थान जात्याच मवाळ हिंदु प्रवृत्तीचे असल्यामुळे भिक्षुकी व इस्लामी प्रवृत्ती असलेल्या पत्रकारांच्या कोपरखळीला तेथील माती विशेष मवाळ व भुसभुशीत लागल्या त्यावर सध्या आपल्या थैमानाची शिकरत करण्यास वृत्तपत्री कटवाल्यास मुळीच कठीण जात नाही. इस्लामी आडाख्याने इंदोर संस्थानच्या छातीत क्रॉनिकली जंबियाचा वार येनकेन प्रकारेण जेर झालाच तर संस्थानद्वेष्ट्या भिक्षुकी पत्रकारांनासुद्धा ती एक इष्टापत्तीच होईल. परस्पर पावणेतेरा हा भिक्षुकी कटांचा नेहमीचाच एक आडाखा आहे. १८९६ सालच्या होळकर प्रकरणांत खालसांतल्या भिक्षुकी पत्रकारांनी इंदोरस्थ गुप्तकटवाल्यांच्या प्रेरणेने कोणता भाग घेतलेला होता, हे मागील अंकी कै. धनुर्धारी यांच्या शद्वानेच आम्ही स्पष्ट दाखविले आहे. आजसुद्धा होळकरांच्या निंदेवर आपला आयुष्यक्रम रेटणारी भिक्षुकी पत्रे इंदोरस्थ कटवाल्यांचेच हस्तक आहेत व सांप्रतचा त्यांचा शिमगा १८९६ सालच्या इतिहासाचीच पुनरावृत्ती आहे असे कोणास वाटल्यास तो तर्क चुकीचा ठरणार नाही. स्वदेशी संस्थानाविरुद्ध लोकशाहीच्या बुरख्याखालीं भिक्षुकीपत्रकारांनीं केलेले अत्याचार ही एक अखंड परंपराच आहे. या परंपरेच्या तपश्चर्येच्या फलश्रुतीचा काळ जवळ आहे कीं लांब आहे, हें सांगणें कठीण आहे. तथापि, त्या दिशेचा भिक्षुकांचा निष्काम कर्मयोग इस्लामी संघटन-द्वेषाइतकाच करड्या निश्चयाचा आहे. हें किंचित विचाराअंती सर्वांस पटेल. खालसाप्रमाणेंच संस्थानांतूनही गुप्तकटांचे अड्डे असतात. या कटवाल्यांत पळीपंचपात्रीं खडबडविणा-या भिक्षुकांपासून तों पदच्युत केलेल्या एखाद्या दिवाणापर्यंत किंवा राजोपाध्यापर्यंत सर्व दर्जांच्या असंतुष्ट माणसांचा समावेश होतो. त्यांत ‘ लग्न होय कीं कुंवार अजुनी ’ असल्या संशयांत बळी पडलेल्या सुंदराबाईपासून तों एखाद्या अडसुळाच्या कामाग्नींत भाजून निघालेल्या जिजाबाई पर्यंत सर्व दर्जाच्या स्त्रिया असतात. खालसांतील राजनीति देवदूतांची आणि संस्थानांतील मात्र सैतानांची असें नाहीं. राजनीतीच्या ठरावीक सरळ सोसाट्यांत जखमी झालेल्या गुन्हेगारांची मनें