बावला-मुमताज प्रकरण: Page 5 of 19

निंदा हा यवनएडवर्ड किंवा म्लेच्छ टाईम्स कोण करणार ? तुम्ही आमच्या शिवाजीला एक शिवी द्याल, तर त्या ऐवजी आम्ही एक लाख शिव्यांचा मारा तुमच्यावर करु. एवढाच या सोवळ्या शिवभक्तांची उसाळी व तळमळ दिसते. टाईम्सला काय ? दाणे टाकून कोंबड्या झुंजविण्यासाठीच त्याने मुंबईला जन्म घेतलेला ! ब्राम्हणेत्तरांनी भिक्षुक पत्रकारांवर व पुढा-यांवर सत्यवादीत्वाचा आरोप करणे जितके मूर्खपणाचे आहे, तितकेच अखिल हिंदुजनांनी टाईम्स क्रॉनिकल डेलीमेल प्रभृतीवर हिंदवी हितवादाचा विश्वास ठेवणे बेअक्कलपणाचे लक्षण आहे. शिवाजीने आठ रखेल्या ठेवल्या असे गृहीत धरले तरी त्याने काय कांदेचाडींतल्या जमनाजी गमनाजी घरात आणून ठेवल्या ? का कोणाच्या लग्नाच्या बायका पळविल्या ? का इंग्लडच्या आठव्या हेनरीप्रमाणे एकामागून एकेक राणीचा खून करुन सहासात बायलांचा दादला बनला ? काही संशोधक म्हणतात की एडवर्डस साहेबांनी आकड्यांचा घोटाळा केला आहे. शिवाजीला सहा राण्या व दोन राखा होत्या. दोन राखा काय किंवा दोनशे काय, आकड्यांचा प्रश्न महत्त्वाचा नाही. शिवाजीने राखा ठेवल्या तर त्यात अनीति कोठे घुसली आणि त्याचे चारित्र्य कलंकीत झाले कसे ? हाच वास्तवीक महत्तवाचा मुद्दा आहे. शिवाजीचा एक ‘ रक्षापुत्र ’ मदनसिंग राणी येसूबाईबरोबर दिल्लीस गेल्याचा दाखला इतिहासात आहे. रक्षेशिवाय रक्षापुत्र आला कोठून ? तेव्हा शिवाजीला रक्षा मुळीच नव्हती या मुद्द्यावरचा वाद केवळ वितंडवाद होय. रखेली ठेवण्याच्या मुद्दयावर अनीतिचा शिक्का मारण्यास धादावलेले कांदेपंडित रखेली आणि रांड यातला मुख्य भेद विचारात घेत नाहीत. रखेली राख किंवा रक्षा ही पत्नीप्रमाणेच संबंधांपूर्वी अक्षतायोनी असावी लागते. तिचा यजमानाशी प्रत्यक्ष विवाह लागला नसला, तरी तिला ‘ कायदेशीर पत्नि ’ पदाचे सर्व हक्क मिळतात. हिंदु लॉ मध्ये अवरुद्ध स्त्री, उपपत्नि, भोगस्त्री, दासी यांचे हे हक्क पूर्ण मानण्यात येतात. मात्र विवाहबद्ध पत्नी इतकेच अखंड पातिव्रत्य रक्षेला सुद्धा चालवावे लागते. अशा उपपत्न्या ठेवण्याची चाल प्राचीन काळापासून हिंदु मुसलमानांत अनिरुद्धपणे चालत आली आहे आणि या उपपत्न्यांची मुले आपल्या बापाच्या राज्याचे जहागिरीचे किंवा इस्टेटीचे मालक झाल्याचीहि शेकडो उदाहरणे इतिहासात आहेत. बाजीराव पेशव्याची मस्तानी ही काही वेश्या नव्हे ; ती श्रीमंताच्या गोपिकाबाई इतक्याच अधिकाराची ( पण विवाहविधीशिवाय पत्नी बनलेली ) पट्टराणीच होती. रक्षा म्हणजे वेश्या नव्हे. शिवाय वेश्या असलेली स्त्री रक्षा म्हणून कोणी स्वीकारीत नाही. आजचे तंजावर घराण्यातले भोसले रक्षावंशज आहेत ; त्यांना कोणी वेश्यापुत्र म्हणणार नाही. राणी की रखेली हा प्रश्न विचारणा-यांना हे कळले नाही की, राणी ही विवाहबद्ध पत्नी असली, तरी विवाहविधीच्या चर्पटपंजरीशिवाय केवळ एकनिष्ठेच्या भावनेवर रखेली ही सुद्धा राणीपदाचाच मान अनुभवीत असते. आजपर्यत राजे महाराजे जहागिरदार यांनी रखेल्या ठेवल्या त्या पत्नि भावनेनेच ठेवल्या व त्यांच्या पोटच्या पुत्रकन्यांना औरसा इतकाच मान देऊन त्यांचेहि वंश वेलविस्तार वाढविले. यांत अनीति कोठे आली ? विवाहविधीचे मंत्र म्हटले की, नीतीची विमापॉलिसी उतरली असे थोडेच आहे ? लग्न रजिष्टर केले म्हणजे तरी काय होते ? पुरुषाने म्हणायचे ‘ मी हिचा पती या जगी असे ’ आणि स्त्रीने म्हणायचे ‘ मी यांची पत्नि होऊ इच्छिते ’ व रजिष्टराने दोघांच्या सह्या घेऊन ‘ तथास्तु ’ म्हटले की झाले. रजिष्टराच्या पुढे केलेली प्रतिज्ञा तेवढी सोवळी आणि परस्पराकर्षि जोडप्याने परस्परांनाच साक्ष ठेऊन केलेला विवाह तेवढा ‘ तस्साच ’ हे त्रयराशिक चालू घडीच्या विवेक वादाला सुद्धा मान्या नाही; मग पूर्वीच्या रक्षापद्दतीत अनीति कशी ? सारांश रक्षा ठेवणे म्हणजे वेश्या ठेवणे नव्हे. हे एक तत्त्व नीट पटले तर शिवाजीविषयी उत्पन्न झालेल्या वादाला ठिकच्याठिकाणी मोक्ष मिळणे फारसे कठीण नाही. मुमताझ प्रकरणांतहि टीकाकारांनी हा भेद अवश्य लक्षात घेतला तर होळकरांवर होणारा निंदेचा मारा अयोग्य असल्याचे त्यांना दिसून येईल. मुमताझ कुमारी ( virgin ) असतानाच तिला होळकरांच्या