बावला-मुमताज प्रकरण: Page 4 of 19

पण बहुतेक लोक आपल्या धन्याशी निमकहलालीनेच वागत होते. मोठमोठे हुद्देदार आणि मानकरी या बाबतीत सामील होते, यावरुनही हेच सिद्ध होते. आम्हास असे वाटते की ज्यांच्या हातून खून झाला ते लोक निर्दोष आहेत, आणि स्वत:च्या अन्नदात्या वरची भक्ती, प्रीति आणि एकनिष्ठा ही प्रदर्शित करीत असता अकस्मात बावलाचा खून त्यांजकडून घडला. याबद्दल एकाद दुस-या वर्षाची शिक्षा देऊन त्यांना सोडून द्यावे. बावलाचा खून झाला ही गोष्ट अत्यंय दिलगिरीची आहे. पण त्याच्या पापानेच, अर्थात् एका महाराजाचा भयंकर गुन्हा केल्याच्या पापानेच ही आकस्मिक आपत्ति त्यावर कोसळली, असे तरी का म्हणू नये ? गुन्हेगाराला शिक्षाच व्हावी, हे तत्त्व जर अंमलात आणायचे असेल, तर या बाबतीत कोणीहि शिक्षेस पात्र ठरणार नाही. वर्तमानपत्रे ओरडतात त्याप्रमाणे महाराजांची या कार्याला प्रेरणा जरी असली तरी ती अयोग्य ठरत नाही. या निमकहलाल लोकांच्या बचावाकरिता महाराज पुढे सरसावले तर ती गोष्ट त्यांना भूषणावहच होईल. कोणाची प्रेरणा नसली तरी आपल्या राजाच्या राज्ञीपदाला पोहोचलेली स्त्री व्यभिचारिणी आणि विश्वासघातकी बनली, हे सहन करणे शक्य न होऊस, स्वत:ची राजनिष्ठा व्यक्त करण्याच्या भरांत त्याच्या हातून असा भयंकर गुन्हा घडून गेला. अशा स्थितीत त्यांचा बचाव करणे त्यांच्या धन्यास योग्यच आहे. एखादा राजा किंवा राजसत्ताधारी यांच्या बाबतीत ब्रिटिश कायदा सुद्धा मर्यादित आहे. राजांच्या धार्मिक किंवा संसारिक व्यवहारांत ब्रिटिश कायदा ढवळाढवळ करू शकत नाही.

होळकर सरकारशी असे स्पष्ट सांगावे की, “ मुमताजसारख्या स्त्रीशी आमचा संबंध होता. ती स्त्री खराब आणि विश्वासघातकी वर्तनाची निघाली. तिला पकडून आणण्यासाठी आमचे निमकहलाल लोक गेले तर त्याची जबाबदारी आमचेवर पडते. पण ते लोक निर्दोष आहेत आणि त्यांना काहीही शिक्षा ठोठावण्यापूर्वी ब्रिटिश सरकारने होळकर सरकारशी झालेला कौलकरार विचारांत घ्यावा.” आम्हा हिंदु प्रजेला आणि हिंदुपत्रकारांना माहीतच आहे की, कांही कांही संस्थानातून अनेक कारस्थाने चालत असतात. किती तरी बनावट कुलंगडी उपस्थित होत असतात की जी ऐकून कोणाच्याही अंगावर रोमांच उभे राहातील. परंतु पुष्कळ वेळा या बाबतीत मौन धरणेच योग्य असते. या बाबतीत तर आकस्मिकरीत्या घडलेल्या एका गुन्ह्याबद्दल एका महाराजावर तुटून पडणे आणि त्याला खाली खेचू पाहाणे हे आपले कर्तव्य नव्हे. ज्या ज्या श्रीमंत आणि सुखी कुटुंबातील माणसे फासावर चढविण्यास पात्र झाली आहेत, त्यांच्याविषयी मायाळू अंत:करण करून त्यांच्या बचावाविषयी खटपट करणे हेच योग्य. जर ही गोष्ट मुसलमान राजा आणि हिंदु युवती यांच्या संबंधाची असती, आणि फाशी जाणारे लोक हिंदु असते, तर त्या बाबतीत मुसलमान पत्रकारांचे विचार कसे असू शकते, याचा विचार प्रत्येक हिंदूने आणि न्यायी हिंदु पत्रकारांनी करणे जरुर आहे -ता २० जून १९२५ संपादकीय स्फुट विचार. प्रबोधन मासिक, जून १९२५. शिवाजीच्या रखेल्या मुंबईचे माजी पोलीस कमिशनर व विद्वान इतिहास संशोधक मि. एस. एम. एडवर्डस I.C.S. यांनी विलायतेस नुकतेच कोठेसे प्रसिद्ध केले की, ‘ शिवाजी महाराजांनी आठ रखेल्या ठेवल्या होत्या. ’ व्रणार्थ पशुच्या शिरावरि वनी उभे काकसे असे जे मुंबईचे टाईम्सकार त्यांना ही बातमी म्हणजे आकाशांतल्या बापाच्या पुत्रोत्सवाइतकीच वाटून, त्यांनी आपल्या नेहमीच्या हिंदु द्वेष्ट्या प्रवृत्तीला अनुसरुन शिवाजीवर ‘ अष्टपैलू अष्टावधानी, ’ इत्यादि उपहासात्मक कोट्यांचा भडीमार करणारे लेखक जातीने इंग्रजच असतात असे मात्र कोणी समजू नये. हिंदुजनांची निंदा करण्यासाठी टाईम्स कचेरीत पुष्कळ भाडोत्री हिंदु लेखक ‘ केवळ पोटासाठी ’ असला शिखंडीपणा गाजविण्यास नेहमीच सज्ज असतात. टाईम्सने शिवाजीच्या कुचाळ्या करण्यास सुरूवात करतांच, आमचे सर्व हिंदु पत्रकार लेखक आपापल्या लेखण्यांची टोके पाजळून टाईम्सवर शिव्यांचा तोफखाना झाडू लागले. हे सगळेच लेखणीबहाद्दर गोलंदाज म्हणजे इतिहासपंडित आहेत किंवा असतात असे मुळीच नाही. ज्या शिवाजीला आम्ही आता अगदी देव मानून सोवळ्या पंढरपुरी भावनेने देवळे उभारुन पूजीत आहो, त्या देवाची