बावला-मुमताज प्रकरण: Page 3 of 19

त्याची कोणी कल्पना तरी केली आहे काय ? ‘ धीरांना दे प्रसंग हिंमत ’ हेच खरे. शेकडो गुप्त अनाचार, गुप्त वध, गुप्त पापा चरणे सर्व देशभर पडद्याआड गुप्त घडत असली तरी त्याची कोणी दखल करीत नाही. आणि हा तर उघडउघड अपराधाचा गुन्हा ! पण त्याच्या बाबतीत केवढा हलकल्लोळ ! वाटेल त्या शंका कुशंका काढून वाटेल त्या उच्च दर्जाच्या माणसाला खाली केचण्याची खटपट करणे हीच या सुधारणेच्या काळाची विचित्रता म्हटली पाहिजे. वरील विवेचनावरुन असे कोणी समजू नये की या भानगडीत महाराजांचा हात किंवा प्रेरणा आहे, असे आम्ही म्हणतो. आम्हाला इतकेच सांगावयाचे आहे की, काही बेजबाबदार वर्तमानपत्रवाले सांगतात त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्यांचा काही संबंध असला तरी देखील तो दोष ठरत नाही. बावला आणि मुमताज या दोघांनाहि पकडून आणण्याची महाराजांनी इच्छा केली असती तरी ते त्यांना शक्य होते.

५०।६० लाख रुपयांच्या जवाहिराची उचापत करणारी स्त्री, एके काळी स्वत:च्या पत्नीच्या दर्जाला पोचलेली होती, एवढे एकच कारण तिला पकडून नेण्यास पुरेसे होते. तिच्यावर सर्व सत्ता व मालकी महाराजांचीच होती, आणि तीला पकडण्याच्या बाबीमध्ये ब्रिटिशसरकारला कोणत्याहि प्रकारची हरकत घेता आली नसती आणि या दर्जाच्या स्त्रीशी व्यभिचार करणारा बावला हा देखिल महाराजांचा गुन्हेगारच ठरत होता. परंतु जी स्त्री वचनभ्रम झाली, निमकहराम बनली आणि शेवटी आपल्या जातीवर गेली, अशा स्त्रीला परत बोलावून त्या भ्रष्ट स्त्रीला-राणीपदाचा अवमान करणा-या जारिणीला घरी पोसून ठेवायची, हे महाराजांना धर्मविरूद्ध कर्म वाटल्यास त्यात काय चूक ? बाजारबसवी बनलेल्या स्त्रीवर महाराज थुंकणार देखिल नाहीत. अर्थात, अशा स्त्रीला महाराज परत बोलावतील ही गोष्टच खोटी आहे. याचा पुरावा कोरुन उकरुन जर काढलाच तर तो त्यांच्या एवढ्याच हेतूत कदाचित सापडेल की, मुमताजने उचापत करुन लांबविलेले लाखो रुपयांचे जवाहीर परत कसे मिळवावे ? ही इच्छा महाराजांनी कधी काळी व्यक्त केली असेल, ती त्यांच्या भोवतालच्या मंडळींच्या कानावर आली असेल आणि मुमताजच्या ताब्यात असलेले लाखो रुपयांचे जवाहीर मुमताजला परत आणून आपल्या मालकाला परत मिळवून द्यावे आणि त्याचा फायदा करावा ही इच्छा कोणाच्या मनात उत्पन्न झाली असल्यास नवल नाही. व यावरुन महाराजांची प्रेरणा कोणी गृहीत धरली तर ते कदाचित् शोभून दिसेल. वास्तवीक इंदोराधिपती श्रीमन्महाराज तुकोजीराव होळकर हे इतके दयाळू आणि नीतिपरीयण आहेत की, त्यांनी स्वत:चा भयंकर गुन्हा करणारांनाहि सोडून दिले आहे. अशा स्तितीत, जी एके काळी आपली प्रीतिपात्र असून आता बेइमान झाली अशा एका क्षुद्र स्त्रीला महाराज हवी ती भयंकर शिक्षा करण्याचे मनात आणतील, ही गोष्टच अशक्य दिसते. आम्हाला असेही वाटते की, हल्ला करणा-या लोकांच्या मनात बावलाचा खून करण्याचे मुळीच नव्हते. परंतु बावलाच्या जवळ पिस्तुल होते. आणि त्याने गोळीबार केल्यानंतरच स्वत:चा जीव बचवावा आणि अंगीकृत कार्य तडीस न्यावे, ही इच्छा बलवत्तर झाल्यामुळे त्यांच्या मेंदूचा समतोलपणा ढळून त्यांनीहि गोळीबार केले आणि बावलाला जखमी केले. गोळीबार करुन बावलाला जखमी करावे, हाही त्यांचा इरादा नसावा; पण स्वत:चा जीव वीचविण्याच्या धांदलीत मनुष्याचे डोके ठिकाणावर राहणे कठीण आणि सुटलेल्या गोळीने मनातल्या इच्छेप्रमाणे परिणाम करावा, हीही गोष्ट माणसाच्या हातची नाही.

मारामारीच्या वेळी निशाणबाजी अचूक होत नाही व अशा त-हेने सुटून गेलेल्या गोळीमुळे हा प्रकार घडला असावा. ज्यांच्यावर खुनाचा आरोप आला आहे, त्यापैकी कोणाचाही मुमताजशी स्नेहसंबंध किंवा जातिविशिष्ट कसलाही संबंध नव्हता की, त्यांनी स्वत:चे प्रीतिपात्र दुस-याच्या तावडीतून पकडून आणण्यासाठी प्राणघातकी हल्ला केला असेल. त्या लोकांची इच्छा इतकीच असली पाहिजे की आपल्या महाराजांच्या लाखो रुपयांच्या जवाहिराची उचापत करणा-या आणि महाराजांचा विश्वासभंग करणा-या स्त्रीला पकडून महाराजांच्या स्वाधीन करावी. त्यापैकीच एखाद्याच्या मनात त्या जवाहिरापैकी काही आपण पचवावे, ही इच्छा आली असेल नसेल देव जाणे !