बावला-मुमताज प्रकरण: Page 13 of 19

पोटी जन्मलेल्या गर्भमृत ( still-born ) मुलीचे एक मोठे नाजूक कलम घुसडून त्यावर भावनाप्रधान नाजूक लेखांचा व काव्यांचा स्तुतीपाठकांनी मोठा खच पाडला आहे. महामाया म्हणते “ माझे बाळ जन्मल्यावर मेले असे मला सांगण्यात आले.” ते मेले किंवा अर्धमेल्या स्थितीतच जन्मले, तेव्हां ते काय जिवंत आहे म्हणून तिला सांगायचे ? “मूल मेल्यामुळे मला इंदोरचा तिटकारा येऊ लागला.” शक्य आहे आईचेच आतडे ते ! पण इंदोरास राहून आणखी मुले झाली नसती कशावरुन ? त्यासाठी तिटका-यांचा त्रागा करुन मुंबईच्या गावभवान्यांची पागा बसविण्याचीच काही जरुर नव्हती ! मुमताझचे अनन्य भक्त असे लोकांना भासवति आहेत की हे पोर महाराजांनी ठार मारविले. सुटका करणारी लेडी डॉक्टर व नर्सेस म्हणतात की मूल अर्धमेल्या अवस्थेत जन्मले व ताबडतोब मेले. मुमताझभक्त म्हणतात महाराजांनी मारविले. मुमताझला मुलगी झाली होती. आम्ही म्हणतो की मुलगा झाला असेच गृहीत धरले तरी त्यामुळे महाराजांवर व इंदोरच्या गादीवर त्यामुळे अशी काय मोठी आपत्ती गुदरणार होती की त्यासाठी महाराजांनी त्या बालकाचा जन्मतांच जीव घ्यावा ? मुमताझच्या पोटी संततीच होऊ नये अशी जर महाराजांची इच्छाच असती तर तसा शास्रीय किंवा औषधीय बंदोबस्त आगाऊच करायला त्यांना कोणती अडचण पडती ? तोंडातून शब्द निघायचा अवकाश तर ती व्यवस्था करायला अत्युच्य पदवीधर व पटाईत शास्त्रज्ञ सर्जन व डॉक्टर काय त्यांच्या दिमतीला हजर नव्हते ? बरे ती मुलगी किंवा मुलगा जगलाच असता तर तो काय युवराजाविरुद्ध होळकरांच्या गादीचा वारसा भांडत बसता ? मुलगा जगता तर रक्षापुत्र म्हणून मानात रहाता. काय असे कोणी कर्तबगार रक्षापुत्र देशी राज्यांत कोठेच नाहीत ? का त्यांचा तेथे काही मान नाही ? का त्यांना जहागिरी नाहीत ? आणि ही तर होती मुलगी तिला मारण्यात महाराजांना काय मिळाले ? का ती राज्यावर हक्क सांगणार होती ? का तीला पोसायचे महाराजांना सामर्थ्य नव्हते ? महाराजद्वेष्टे लोक काय कारण समर्थनार्थ देतात ? रखेलीला सुद्धा राणी बनवून तिच्या पोटच्या मुलाला राज्याचा वारस ठरविण्याच्या खटपटी करणारी एक दोन संस्थाने जेथे आज प्रत्यक्ष अस्तीत्वात आहेत, तेथे मुमताझच्या मुलीची हत्या करण्यात महाराजांना काय मिळवायचे होते, याची विवेकमान्य कारणमिमांसा निंदकांनी पुढे मांडली तर बरे होईल. तोपर्यंत असल्या बेजबाबदार आरोप बरळणा-या क्षुद्रांच्या विचारक्षुद्रतेची कीव करण्यापेक्षा अधिक काय करता येईल ? प्रस्तुतच्या मुमताझ प्रकरणामुळे एक मात्र फायदा असा झाला आहे की देशभक्तीच्या पांघरुणाखाली वर्तमानपत्राचा प्रतिष्ठित धंदा करणा-यांत साव किती आणि बेरड चोर किती याचा अंदाज करता येणे सोपे झाले आहे. एवढा पैसा कोठून आला ? इंदोराधिपति होळकर सरकारच्या रक्तासाठी तान्हेलेल्या भिक्षुकी व हिंदद्वेष्ट्या आंग्रेजी पत्रकारांना आता एक असा मोठा जिव्हाळ्याचा पेच येऊन पडला आहे की मुमताझ कटांतल्या आरोपींनी डिपेन्सची कायदेबाजी लढवायला एवढा पैसा आणला कोठून ? जणू काय हा प्रश्न जर नीट सुटला नाही तर टाईम्स प्रभृति पत्रकारांच्या सत्यान्वेषणी अकलेवर वैधव्याचा दावाग्नी कोसळणार आहे. यदाकदाचित् आरोपी जर नुसते खाका बगला वर करुन कोर्टात उभे राहते, तर हे आंग्रेजी व भिक्षुकी पत्रकार आपापली घरेदारे गहाण ठेऊन त्यांच्या बचावासाठी पैशाच्या थैल्या घेऊन थांबले असते, असे मात्र कोणी समजू नये. शंका एवढीच येते की बॉम्बे क्रॉनिकलवर धारवाड गोळीबाराच्या बाबतीत पेंटर कलेक्टरने बेअब्रूची फिर्य़ाद लावली, तेव्हा त्या कज्जेदलालीला लागणारा खर्च झेपण्याइतकी कलेक्टरांची सांपत्तिक स्थिति वास्तविक असते काय ? आणि जर ती नसते, तर तो खर्च पेंटर साहेबांनी कसा झेपला ? कोठून आला एवढा पैसा ? हे प्रश्न विचारण्याची त्या वेळी एका तरी आंग्रेजी व भिक्षुकी पत्रकारांची छाती झाली काय ? फंडगुंडांची व अखंड चालवून त्यावर आपला तळीराम थंडगार करणा-या काही लुच्या भिक्षुकी पत्रांनीहि