बावला-मुमताज प्रकरण: Page 11 of 19

महत्त्वाकांक्षांची व संसाराची आज राखरांगोळी झाली आहे. मृत्यूच्या दाढेंत मान अडकली असतांहि ते अजून महाराजांचा कोणत्याहि रीतीनें नामनिर्देष करीत नाहींत. त्यांच्या दयेच्या अर्जालाहि ( भिक्षुकी पत्रांच्या निर्दय भाषेंत बोलायचें तर ) ‘ वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या .’ आम्ही सर्व महाराजांच्या प्रेरणेंनें किंवा त्यांच्यासाठीं केलें, असा अस्पष्ट जरी एखादा सूर त्यांच्या दयेच्या अर्जांत निघतां तरी त्यांच्या फासावरच्या माना सुटल्यास पुष्कळच आशा होती. पण तेंहि त्यांनीं केलें नाहीं. महाराजांची या दृष्कृत्याला कांहीं सूचना, प्रेरणा, प्रत्यक्षाप्रत्यक्ष मदत, चिथावणी किंवा मूक संमति होती, असें गृहीत धरलें, तर आरोपींच्या या वर्तनाची वासलाद कशी लावतां येणार ? याला एकच मार्ग आहे. एक तर हे खूनी आरोपी कट्टे राजनिष्ठ स्वार्थत्यागी ( martyrs ) तरी असावे किंवा भिक्षुकी पत्रकारांचा महाराजांवरील खुनाचा आरोप शुद्ध बेजबाबदार पाजीपणाचा आणि जाणून बुजून केलेल्या बदनामीचा असावा; यापैकीं कोणता तरी एक मार्ग होळकरांच्या दुष्मनांनीं पत्करल्याशिवाय गत्यंतरच नाहीं. आपल्या मालकाच्या नांवासाठीं जान देण्यास तयार झालेल्या नेताजी पालकर, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, खंडो बल्लाळ, बाजी प्रभू देशपांडे या ऐतिहासिक स्वार्थत्याग्यांच्या पंक्तीला ही खुनी कटांतली मंडळी martyrs म्हणून बसविण्यास ‘ बावलायन ’ वाले भिक्षुक व हिंदुद्वेष्टे आंग्लपत्रकार तयार आहेत काय ? असल्यास त्यांनीं त्यांचें एक मोठें देऊळ, मशीद किंवा चर्च क्रॉनिकल किंवा टाईम्स ऑफिसानजीक उभारण्याचा फंडगुंडी स्मारकयत्न करून, या बावलाघातकी देवांचे बडवे, अथवा होळकर महाराजांच्या निष्कारण बदनामीबद्दल बिनशर्त माफी मागावी. या दोहोंपैकीं कोणता मार्ग हे शहाणे पत्कारतात तेवढें लवकरच दिसून येईल. केवढी ही सत्यशोधनाची निष्ठा ! टाईम्स क्रॉनिकल डेलीमेल वगैरे पत्रें लोकमत निदर्शक म्हणून समजण्याचा एक आंधळा संप्रदाय आहे. साधारण बहुजनसमाजाला हीं पत्रें म्हणजे मोठी देवबाप्पा वाटतात. या पत्रांत प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजू प्रांजलपणें मांडल्या जातात असा लोकांत एक (गैर) समज आहे. खरी वस्तुस्थिति फार निराळी आहे. इतर धांदोट्या चिंधोट्या प्रमाणेंच हीं बडीं धेंडें आपल्या ठराविक धोरणा विरुद्ध मतांची गळचेपी करण्याचें मुर्दाड काम करीत असतात. या कामीं ‘ असोसिएटेड प्रेस ’ ही बातम्या पुरविणारी प्रतिष्ठित संस्था सुद्धां वारंवार भिक्षुकी वळणाचे फेफरें आणतें. बावला प्रकरणावर या तीनहि पत्रांतलीं विधानें, बातम्या व इतर पत्रव्यवहार यांचा खोडसाळपणा दाखविणारीं इंदोरस्थ अनेक जबाबदार व प्रतिष्ठित नागरीकांचीं पत्रें त्यांनीं न छापतां धुडकाऊन दिल्याचें आम्हांस समजतें. खुद्द आमच्याही दोन पत्रांना स्वांनीं दिलगिरीचें लिंबलोण लाऊन परत केलीं. हा सर्व मुस्कटदाबीचा प्रकार पाहिला कीं या पत्रांचा एका विशिष्ट धोरणानें कांही ठराविक उद्देश साधण्याचा गुप्त कटच झाला आहे की काय असें मानणें प्राप्त पडतें. सत्यशोधनाची, न्यायप्रियतेची आणि कोणत्याही एका पक्षाचा पक्षपात न करणा-या निस्पृहतेची या पत्रकाराची मिजास किती खोटी व दांभिक आहे, हें या त्यांच्या अरेरावी वर्तनावरून सहज दिसून येईल. विचार-प्रकटीकरणाच्या मार्गांत आपल्या एडिटरकीच्या अधिकाराची धोंड टाकून विवक्षित उद्देशांचाच टेंभा मिरविणारे हे पत्रकार लोकशाहीचे प्रवर्तक का झब्बुशाहीचे मुर्दाड कटवाले, याचा विवेकी सज्जनांनींच विचार करावा. मुमताझ प्रकरणांत या दीर्घशहाण्यांना सत्यशोधनाचा जर इतका घोसरा लागलेला आहे, तर दोनहि बाजूचें स्पष्ट विचार आपल्या पत्रांत प्रसिद्ध करतांना यांची निस्पृहता व सत्यप्रियता बिनचूक कशी व्यंभिचारी बनते ? सारांश, होळकरांची होळी करूं पहाणा-या या सर्व इंग्रजी मराठी पत्रकारांचे खावयाचे व दाखवायचे दांत अगदी वेगवेगळे आहेत ; आणि बाह्यात्कारीं जरी तीं राजकारणी भुसाड गोष्टींच्या वादांत निरनिराळ्या पक्षभेदाचीं मुखपत्रें शेपुटपत्रें दिसतात, तरी असल्या प्रसंगीं ते सर्व एकजिनसी उदेदशाचे जानीदोस्त कटवाले बनतात, हेंच स्पष्ट सिद्ध होते. देशी संस्थानाधिपतींची मुस्कटदाबी. खालसांतल्या पत्रकारांनी वाटेल तितकी बीभत्स निर्भत्सना केली तरी हे राजे स्वस्थ कां बसतात ? आज होळकर सरकारांविषयीं उघड काढलीं जाणारीं घाणेरडी बेअब्रूकारक व अपमानपूर्ण लेख व चित्रें, खालसांतल्या एखाद्या आडूमाडू