बावला-मुमताज प्रकरण: Page 2 of 19

अगर सर्वश्रुत असो ; इतकी गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे की, महाराजांनी तिला सर्व रीतीने प्रत्यक्ष राणीप्रमाणेच वागविली. एखाद्या राणीवर जितका विश्वास टाकावा, तितक्याच विश्वासाने लाखो रुपयांचे जडजवाहीर तिच्या स्वाधीन केले. पण ती अधम य़वनी अखेर आपल्या जातीवर गेली ! आणि महाराजांच्या विश्वासाचा दुरूपयोग करुन त्यांना पत्नी या नात्याने दिलेल्या वचनांशी बेइमान झाली. बावलाला या सर्व गोष्टी माहीत असूनही त्याने तिने फसविले आणि तिच्याशी विषयलपट बनून जो व्यभिचार केला त्यामुळे तो महाराजांचा प्रत्यक्ष गुन्हेगारच झाला, आणि त्याला योग्य तोच दंड झाला. व्यभिचारी मुमताजला सुद्धा देहांत दण्डच व्हायला पाहिजे होता, पण ती बचावली. पूर्वीचा काळ असता तर असल्या एका महाराजाच्या गुन्हेगाराला कोणत्याही साम्राज्यांत थारा मिळाला नसता आणि त्यासाठी भयंकर रणसंग्राम झाला असता. परंतु आता काळ बदलला आहे आणि वरील सबबींवर जर या गुन्हेगारांना ताब्यात देण्याबद्दल होळकर महाराजांनी ब्रिटिश सरकारकडे मागणी केली असती, तर केव्हाही न्याय आणि वाजवीच ठरली असती.

प्राचीन राजेमहाराजे आणि बादशहांचे जीवनवृत्तांत आणि त्यांच्या जनानखान्यांतील रहस्यें वाचणा-यांनी हे लक्षांत ठेविले पाहिजे कीं, महाराजांची परिणित पत्नि काय किंवा त्यांच्या जनानखान्यांतल्या नाटकशाळा काय, त्यांना परपुरूषाकडे केवळ नजर टाकल्याबद्दल देहांत शिक्षा मिळाल्याची उदाहरणे इतिहासात अनेक आहेत. स्वत:च्या उपभोगाकरितां ठेविलेल्या रखेल्यांनी दुस-यांशी व्यभिचार कर्म करु नये एवढ्याकरिता त्या निर्दोष असतांहि त्यांच्या कत्तली झाल्याची उदाहरणे आपणास माहीत आहेत. या गोष्टी जरी गतकालीन असल्या तरी विचारार्ह आहेत. स्वत:ची स्त्री, सून, बहीण किंवा मुलगी यांच्या शीलाची किंमत त्या काळी अमूल्य गणली जात असे. पण हल्ली सुधारलेल्या युगांत त्याची किंमत कवडीमोल झालेली आहे. वरील गोष्टी सर्वच आम्हांस संमत नसल्या तरी महाराजांच्या प्रीतीला पात्र झालेल्या एखाद्या वस्तूची-त्यांतल्यात्यांत अनर्व्य अशा स्त्रीरत्नाची किंमत काही विशेष असते, हे सिद्ध आहे. वाचकांनी याची कल्पना स्वत:च करावी. एखाद्याने एखाद्या स्त्रीवर प्रेम केले, आणि स्वत:च्या अर्धांगीप्रमाणे तिला प्रीति पात्र आणि विश्वासपात्र मानून तिला सर्वस्व अर्पण केले आणि अशा स्त्रीने त्याचा त्याग करुन दुस-याचा आश्रय घेतला, तर त्याच्या मनाची स्थिति काय होईल? अशा त-हेचा मनुष्य जरी शांततेचा आणि दयाळूपणाचा जरी मूर्तिमंत पुतळा असला तरी, त्याच्या अंगात जर मर्दानी रक्त सळसळत असेल तर, तो रक्तपाताचा प्रसंग आणल्याखेरीज खास राहणार नाही.

वाचक, लेखक, वक्ते आणि वर्तमानपत्राचे संपादक लिहितेवेळी, वाचतेवेळी, किंवा सभेमध्ये भाषण करतेवेळी अशा एखाद्या राजामहाराजावर अशा त-हेचा प्रसंग आला असतां, त्याची मन:स्थिति कशा त-हेची झाली पाहिजे, याचा थोडा सुद्धा विचार कसे करीत नाहीत? मुंबईसारख्या शहरांत दिवसा ढवळ्या हा खून करणारे किंवा करवणारे सापडले आहेत की अजून पडद्यामागेच आहेत, आणि दिवसा ढवळ्या मुंबईत खून तरी कसा होतो, असल्या ऐदी शंका विचारणारांना असा प्रश्न विचारता येईल की, दिवसाढवळ्या बावलाचाच खून कां झाला? इतर हवाखाऊ स्त्रीपुरूषांपैकी एखाद्याचा का झाला नाही ? परंतु बावलाच्या पापाचे माप असेच भरावयाचे होते, त्याला कोणाचा काय इलाज? सिंहासारखा वनचर प्राणी, पण त्याच्या शिकारीवर रोख धरुन येणा-या बलवत्तर प्राण्याचाही तो संहार केल्याशिवाय राहत नाही आणि येथे तर एका महाराजाच्या प्रीतिपात्र अशा राणीच्या दर्जाला चढविलेल्या स्त्रीशी बावला उघडउघड व्यभिचार करतो; अर्थात त्याला झाली हीच शिक्षा योग्य. आम्हाला तर असे वाटते की, असले कर्म करणा-याला असलीच शिक्षा व्हावयास पाहिजे.

अफाट लोकसंख्येच्या या आपल्या देशांत असले किती तरी प्रकार झालेले आपण नेहमी ऐकतो, वाचतो. पण त्या संबंधाने कोणी ब्रही काढीत नाही. बावला तर प्रत्यक्ष गुन्हेगार होता. आजपर्यंत निर्दोष लोकांचे किती तरी खुन झाले असतील, पण त्यावेळी वर्तमानपत्रकारांची तोंडे बंद का राहतात ? स्वत:च्या शीलाचा यत्किचितही भंग होऊ नये म्हणून आजपर्यंत कित्येक निर्दोष राण्यंनी व साध्वी स्त्रियांनी बंदुकीच्या गोळ्यांचा सत्कार केला,